आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदिवसीय सामन्याचे नेतृत्व सलामीवीर रोहित शर्माकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. ‘बीसीसीआय’च्या या निर्णयानंतर आता माजी कर्णधार विराट कोहलीला खेळाडू म्हणून संघात कायम राहावे लागणार आहे.
विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर समाजमाध्यमांवर याबाबत काही चाहत्यांनी नाराजी दर्शविली, तर रोहित शर्माची निवड केल्याबद्दल अनेक चाहत्यांनी ‘बीसीसीआय’ची पाठराखणही केली. समाजमाध्यमांवर क्रिकेटप्रेमींनी याबाबत आपली मतमतांतरे व्यक्त जरी केली असली तरी ‘बीसीसीआय’च्या या निर्णयावर काही जागतिक दर्जाच्या क्रिकेट समीक्षकांनी केलेले विश्लेषण फार महत्त्वाचे आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघात अनेक यशस्वी कर्णधार होऊन गेल्याचा इतिहास आहे. माजी कर्णधार कपिल देव, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या कर्णधारांच्या कारकिर्दीत, तर भारताने विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. महेंद्रसिंह धोनीच्या कारकिर्दीत भारतीय संघाने २८ वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरण्यात यश मिळविले होते. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये परदेशी दौर्यावर भारतीय संघ उत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्यानंतर धोनीने २०१४ साली अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विराट कोहलीकडे कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला. विराट योग्य नेतृत्व करत असल्याचे समजल्यानंतर धोनीने २०१७ सालच्या अखेरीस एकदिवसीय आणि ‘टी-२०’ संघामधूनही कर्णधारपद स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतला. कर्णधारपद सोडल्यानंतर खेळाडू म्हणून धोनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जवळपास दोन वर्षे संघात कायम होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ज्यावेळी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपविण्यात आले, त्याही वेळेस धोनी खेळाडू म्हणूनच संघात कायम राहिला. धोनीच्या या खिलाडू वृत्तीच्या स्वभावाची आजही जगभरात प्रशंसा होते. त्यामुळे विराट कोहलीने आता हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आगामी काळात क्रिकेट खेळले पाहिजे, असे अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे. विराट कोहलीने आगामी काळात उत्तम खेळ केल्यास त्याला अनेक दिग्गजांचे विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. त्यामुळे विराटने खेळाडू म्हणून आगामी काळात उत्तम प्रदर्शन केल्यास त्याच्याच कारकिर्दीसाठी हे लाभदायक ठरू शकते, असा सल्लाही समीक्षकांनी दिला आहे.
अभी नही तो कभी नही!
महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडतानाच जी महत्त्वाची घोषणा केली होती, त्याचा उल्लेख वारंवार क्रिकेट समीक्षक करतात. विराट कोहली हा सध्या कर्णधारपदासाठी योग्य असून त्याच्याकडे कर्णधारपद सोपविण्याची ‘हीच योग्य वेळ’ असल्याचे धोनीने २०१७ साली एकदिवसीय आणि ‘टी-२०’ संघाचे कर्णधारपद सोडताना म्हटले होते. आता जर विराटला कर्णधारपद बहाल केले नाही, तर कदाचित फार उशीर होईल, असेही धोनी त्यावेळेस सांगण्यास विसरला नव्हता. एकदिवसीय अथवा ‘टी-२०’संघापैकी एखादे कर्णधारपद धोनीला आपल्याकडे सहजपणे ठेवता आले असते. परंतु, धोनीने तसे केले नाही. सफेद चेंडूसाठी एकच कर्णधारपद हवा, असे मत व्यक्त करत धोनीने निवड समितीसह ‘बीसीसीआय’ला विराट कोहलीकडेच संघाचे नेतृत्वपद सोपविण्यास सांगितले होते. विराट कोहलीला भारतीय संघाचे नेतृत्वपद बहाल करण्यात आल्यानंतर भारतीय संघाने समाधानकारक कामगिरी केली. परंतु, ‘आयसीसी’च्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये बाद फेरीत उत्तम कामगिरी करण्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अपयशी ठरत होता. कटू असले तरी हे वास्तव आहे. त्यामुळेच ‘बीसीसीआय’ने विराटऐवजी रोहितकडे संघाचे नेतृत्वपद सोपविण्याचा निर्णय घेतला. रोहितही यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. ‘आयपीएल’मध्ये त्याच्या नेतृत्वात खेळणार्या ‘मुंबई इंडियन्स’ संघाने आतापर्यंत पाचवेळा या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. त्या तुलनेत विराट कोहलीच्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ संघाने एकदाही ‘आयपीएल’ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविलेले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अनेक मालिकांमध्ये यशस्वी कामगिरी केल्याची नोंद आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ लहान असला, तरी त्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या विजयी कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रोहित शर्मा हा सध्या ३४ वर्षांचा आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविणे, हे योग्यच आहे. आता जर त्याला नेतृत्व करण्यास संधी दिली नसती, तर आगामी काळात कदाचित फार उशीर झाला असता. म्हणूनच रोहितकडे सफेद चेंडूच्या सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी आणि विराटला लाल आणि गुलाबी चेंडूच्या सामन्यांसाठी नेतृत्वपदी कायम ठेवत भारतीय संघाने सुवर्णमध्य साधला आहे.
- रामचंद्र नाईक