विद्यार्थ्यांनाच दैवत मानणार्‍या शुभदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2021   
Total Views |

माणसं _1  H x W

‘शिक्षकी पेशा हे वरदान व विद्यार्थी हे दैवत’ हे व्रत घेतल्याने शुभदा खटावकर यांनी दैनंदिन अध्यापन विद्यार्थी केंद्रित व्हावे म्हणून अभ्यासपूरक व अभ्यासांतर्गत असे अनेक स्वयंप्रेरित, कल्पक आणि उत्तमोत्तम उपक्रम कार्यान्वित केले. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास...
 
 
शुभदा खटावकर यांचा जन्म २९ जून, १९४७ रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण येथे झाला. डॉ. भंडारे दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेल्या शुभदा यांचे बालपण अत्यंत सुसंस्कारित समृद्ध झाले. गावी सातवीनंतर शिक्षणाचे दरवाजे बंद होते. सातवीनंतर त्यांच्या वडिलांनी पुढाकार घेऊन काढलेल्या विद्या विकास मंदिर येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या साडेसोळाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे सासरे सातारा जिल्ह्यातील नामांकित शिक्षक व देशभक्त होते. त्यांचे चुलत सासरे १९४२च्या गोळीबारात देशासाठी हुतात्मा झाले आहेत. त्यामुळे देशभक्त असलेले कुटुंब असाच त्यांचा सर्वत्र लौकिक आहे. त्यांचे सासरे शिक्षणप्रेमी असल्याने त्यांच्या प्रेरणेने शुभदा खटावकर यांनी उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला.


शुभदा यांनी तीन महिन्याचा मुलगा, घर-प्रपंच, सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या, खेड्यातील कार्यप्रणाली सांभाळून, प्रसंगी नावातील बदल, महाविद्यालय बदल, नवर्‍याची नोकरी बदल असे सर्व बदल आणि संकटे-अडचणींवर मात करून उच्च शिक्षण जिद्दीने व खूप कष्टांनी पूर्ण केले. शुभदा यांनी शिवाजी विद्यापीठाची बी.ए. हिंदी ऑनर्स, पुणे विद्यापीठाची बी.एड् (प्रथम श्रेणी), मुंबई विद्यापीठाची एम.ए. (प्रथम श्रेणी) या पदव्या मिळवल्या आहेत. मुंबई विद्यापीठातून त्यांनी पी.एचडी केली आहे. ‘महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन’ हा त्यांच्या पी.एचडीसाठीच्या प्रबंधाचा आहे. विशेष म्हणजे, त्या महादेवी वर्मा यांना प्रत्यक्ष भेटल्या आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांना मिळाल्या आहेत.

शुभदा या १९७१ मध्ये डोंबिवलीच्या रहिवासी झाल्या. डोंबिवलीत आल्यानंतर त्यांना लगेचच उल्हासनगर येथील ‘सरस्वती सर्टिफाईड स्कूल’मध्ये नोकरी मिळाली. त्या ‘सर्टिफाईड’ विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकी पेशाला समृद्ध केले आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. जून १९७३ ते जून २००० या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी आदर्श विद्यालय, रामनगर डोंबिवली येथे सेवा दिली आहे. १९७३ ते १९८३ साहाय्यक शिक्षक, १९८३ ते २००० पर्यवेक्षक व २००० ते २००५ मुख्याध्यापिका असा चढता प्रवास त्यांनी केला. ‘शिक्षकी पेशा हे वरदान व विद्यार्थी हे दैवत’ हे व्रत असल्याने त्यांनी दैनंदिन अध्यापन विद्यार्थी केंद्रित व्हावे म्हणून अभ्यासपूरक व अभ्यासांतर्गत अनेक स्वयंप्रेरित, कल्पक आणि उत्तमोत्तम उपक्रम कार्यान्वित करून, आपला पेशा व विद्यार्थ्यांचे अध्ययन अत्यंत उच्च पातळीवर नेले.

शुभदा खटावकर यांनी १८ बालनाट्ये लिहून स्वदिग्दर्शित केली आहेत. ‘गडकरी’, ‘दामोदर’, ‘कलासंस्कार’, ’आकाशवाणी’, ‘बाल दरबार’, ‘गंमत-जंमत’, मुंबई येथे सादर करून सुमारे २५० ते ३०० बाल कलाकारांना रंगमंचावरील अभिनयाची सुवर्णसंधी प्राप्त करून दिली. उत्कृष्ट लेखनाचे त्यांना १२ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना अभिनयाचे अनेक पुरस्कार मिळवून दिले. अखिल भारतीय कला, क्रीडा व साहित्य अकादमी, अक्षरमंच व आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या ८५ तास सलग ‘काव्यवाचन’ या विश्वविक्रमी कार्यक्रमात एका सत्राचे अध्यक्षपद भूषविले आहे व काव्यवाचनही केले आहे.

१९८७-८८ ही दोन वर्षे त्यांनी डोंबिवली साहित्य सभेचे अध्यक्षपद भूषविले आहे. या दोन वर्षांत त्यांनी राजा गोसावी, नरेंद्र जाधव, रवींद्र पिंगे, नारायण सुर्वे अशा अनेक दिग्गज साहित्यरूपी हिरे-माणकांच्या साहित्याची मेजवानी रसिकांना दिली. शालेय सेवा काळात राष्ट्रीय संकटाच्या प्रत्येक वेळी, भूकंप, पूरग्रस्त अथवा अन्य प्रकारचे निधी संकलन विद्यार्थ्यांकडून करून आपल्या राष्ट्रीय कार्याची त्यांनी पूर्तता केली. गेली २५-३० वर्षे त्या सा. ‘विवेक’ मुंबई व पुणे-डोंबिवली येथील दोन-तीन प्रकाशकांचे हिंदी-मराठी अनुवादाचे, लेख लिहून देण्याचे, मुद्रित शोधनाचे कार्य करून साहित्यिक क्षेत्रात योगदान देत आहेत. त्यांच्या निवडक पाच एकांकिकांच्या संग्रहाला म्हणजेच ‘फुलपाखरू झाले सुरवंटाचे’ याला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

सेवानिवृत्तीच्या काळात अधिकाधिक वेळ समाजसेवेत जावा व काही चांगले कार्य हातून घडावे, यासाठी गेली दहा-पंधरा वर्षे त्या अनेक शाळा-महाविद्यालयांमधून जवळ जवळ ३०-३५ विषयांवर व्याख्यान देत आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये त्यांनी सुमारे ५० विषयांवर संत साहित्य परिपाठ, अन्य विषयांवर अनेक सामाजिक संस्था, मंदिरे, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, शैक्षणिक संस्था येथे प्रवचने दिली आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या त्या भक्त आहेत. श्री गोंदवलेकर महाराज यांच्या मातोश्री परमपूज्य गीतामाई-मंदिर कलेढोण येथे त्या विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्या विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, नरेंद्र जाधव, राजा गोसावी, नारायण सुर्वे, अमरीश पुरी, विक्रम गोखले, अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, दशरथ पुजारी अशा अनेक दिग्गजांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी शिक्षिका आणि नाट्यलेखिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.







@@AUTHORINFO_V1@@