ऑनर किलिंग : पोकळ जात्याभिमानाची सामाजिक विकृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2021   
Total Views |
honour killing.jpg_1 
  

औरंगाबादमधील वैजापूरमध्ये दि. ५ डिसेंबर रोजी एका युवतीची तिच्या भावाने आणि आईनेच अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या केली. या खुनाला, गुन्ह्याला नेहमीप्रमाणे ‘ऑनर किलिंग’चे नावही दिले गेले. पण, शेवटी खून म्हणजे खूनच! एखाद्याचा जीव घेऊन इज्जत कशी वाढू शकते? पोटच्या मुलीबाळीची हत्या करून समाजात सन्मान कसा मिळू शकतो? खोट्या प्रतिष्ठेपायी एखाद्याचा जीव घेणे ही भयंकर विकृती आहे. या विकृत मानसिकतेवर भाष्य करणारा हा लेख...



 
औरंगाबादमधील वैजापूरला ‘ऑनर किलिंग’ची नुकतीच एक भयंकर घटना घडली. बहिणीने आईवडिलांच्या आणि कुटुंबाच्या मर्जीविरोधात लग्न केले. त्यामुळे मुलीच्या आई आणि भावाने तिचा अत्यंत निर्दयीपणे खून केला. पण, त्या भावाला तिचा इतका क्रूरपणे खून करावसा का वाटला? खून केल्यानंतर आपण खूप महत्त्वाचे आणि जणू सत्कृत्य केले, असा जो आविर्भाव त्याच्या एकंदरीत वागण्या-बोलण्यात टिपला गेला, तो का होता? “मुलीचा खून केला. आता पोलिसांनी कायदेशीररीत्या आमच्यावर कारवाई करावी. फासावर द्या नाहीतर जन्मठेप द्या. आम्ही तयार आहोत,” ही मानसिकता त्या खुनी आई आणि भावाची का व्हावी? या घटनेनंतर महाराष्ट्राच नाही तर सगळा देश सुन्न झाला. या घटनेसंदर्भात समाजातील विविध स्तरातील लोकांशी चर्चा केली. त्यातले काही निष्कर्ष मांडण्याचा या लेखात केलेला हा प्रयत्न...
 
 
१) ७० टक्के लोकांचे म्हणणे होते की, आईवडील लाडाकोडात मुलींना वाढवतात. आपल्या मुलींसाठी काय चांगले, काय वाईट, हे त्यांना माहिती असते. त्यामुळे मुलींच्या विवाहासंदर्भातला निर्णय आईवडिलांना घेतला, तर तो त्यांचा हक्कच आहे. आयुष्याची १८ वर्षे ज्या आईवडिलांनी, घरातल्यांनी दुधाच्या सायीसारखे पोरीला जपले, त्या मुलीने परक्या मुलासाठी आईवडिलांना धोका देणे हे गैरच आहे. त्यामुळे मुलगी काय मुलगा काय, दोघांनीही सगळे काही आपल्या मर्जीने केले तरी चालेल, पण विवाह मात्र आईवडिलांच्या आणि घरच्यांच्या मर्जीने करावा.


२) ४० टक्के लोकांचे म्हणणे होते की, मुलगा-मुलगी समान आहेत. पण, मुलाने परजातीच्या मुलीशी लग्न केले, तर मुलगी आपल्या घरात येते. तिला आपण आपल्या मनाप्रमाणे, समाजरितीप्रमाणे नियम शिकवू शकतो. पण, जेव्हा आपली मुलगी दुसर्‍याच्या घरी जाते, त्यावेळी ती आपली इज्जत घेऊन जाते. समाजाबाहेर तिने लग्न केले म्हणजे तिने आपली आणि समाजाची इज्जत घालवली!


३) ६३ टक्के लोकांचे म्हणणे होते की, मुलीने घरच्यांच्या विरोधात लग्न केले तर आपण काय करू शकतो? कारण, कायद्याने तिला आपल्या मर्जीने लग्न करण्याचा अधिकार दिलाच आहे की! मात्र, आपल्या मर्जीविरोधात लग्न केलेल्या मुलींना शेवटची तरी समज द्यावी की, ‘तू हे जे काही केलेस, ते चांगले केले नाहीस. तू आमच्यासाठी मेलीस. यापुढे तुझे नशीब. पुन्हा म्हणून आमच्याकडे येऊ नकोस.’
 
४) ३७ टक्के लोकांचे म्हणणे होते की, मुलीला तिच्या मर्जीने विवाह करण्याचा अधिकार आहे. ती सुखी आहे ना बस!!!
 
 
आपल्याला तरी काय हवे, मुलीला तिला हवा तसा जोडीदार मिळाला की झाले. त्यांचा राजा-राणीचा संसार सुखाचा होवो.मुलीच्या परजातीतल्या लग्नाला विरोध आणि संमती देणार्‍या सगळ्याच व्यक्तींना विचारले की, परजातीतल्या मुलाशी लग्न केले म्हणून मुलींचा खून झाल्याच्या घटना होतात. त्याला कारण काय असावे? तर या सगळ्यांचेच उत्तर होते की, मुलगी तर लग्न करून जाते, पण त्यामुळे तिच्या आईबाबांची बेअब्रू होते. जातीबाहेर लग्न केलेल्या मुलींच्या भावा-बहिणींना जातीमध्ये स्थळं मिळताना पुढे अडचण होते. आईबापांनी मुलीला संस्कारच दिले नाही, अशी चर्चा होते. लोक हसतात. या अशा मुलींमुळे समाज बहिष्कृतही करतो. बहिष्कार केला, हे समोरासमोर कुणी बोलत नाही. मात्र, सामाजिक कार्यक्रमांत मुद्दाम न बोलवणं, दुर्लक्ष करणं, मुद्दाम मानसन्मान न देणं, कुलाचार-रितीरिवाजात डावलणं हे सगळं केलं जातं. या सगळ्यातून वाचायचे असेल तर मुलीच्या घरच्यांना सिद्ध करावेच लागते की, आम्ही मुलीच्या परजातीतल्या मुलाशी विवाह करण्याच्या निर्णयाविरोधात आहोत. याला पुरावा काय? तर मुलीचा आणि प्रसंगी तिच्या पतीचा खून करणे!

‘ऑनर किलिंग’संदर्भात समाजाच्या पंचायतीचे नेतृत्व करणार्‍या ज्येष्ठांना विचारलेतर त्यांचे म्हणणे की, समाजाचे काही नियम असतात. ठरावीक वैशिष्ट्ये असतात. पावित्र्य असते. दुसर्‍या जातीच्या घराचे सदस्यत्व स्वीकारून मुलगी त्या नियमांचा भंग करते आणि पावित्र्य भ्रष्ट करते. यावर मानसी पराडकर या सामाजिक कार्यकर्तीचे म्हणणे आहे की, “महिलांच्या बाबतीत लैंगिक संबंध आणि त्यातून उत्पन्न होणाारी संतती ही सगळी प्रक्रिया सजातीय संबंधातून असावी, असे समाजाला वाटते. त्यातच महिलांच्या बाबतीत योनीशुचिता हा दंडक आहे. त्यामुळे महिलांच्या लैंगिक भावनेशी परजातीच्या पुरूषाचा संबंध असणे, हे समाजनियमांना पटत नाही. त्यामुळे मुलींनी परजातीतल्या मुलाशी विवाह केला, तर काही वेळा तिच्या घरच्यांना आणि तिच्या समाजाला पटत नाही. आपल्या रूढी परंपरेतच आहे हे.” मात्र, वसुमती करंदीकर या संस्कृत साहित्याची विद्यार्थिनी असलेल्या युवतीचे म्हणणे आहे की, “आपल्या प्राचीन संस्कृती, संस्कृत साहित्यात येणार्‍या उल्लेखांमध्ये स्त्रियांना पती किंवा प्रियकर निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्या विवाहानंतरही प्रियकराला भेटू शकत होत्या. कालिदासाचे ‘मेघदूत’, ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ तसेच अन्य संस्कृत साहित्यामध्ये याचे वर्णन आलेले आहे. इतकेच काय ‘रामायणा’मध्येही सीतेचे स्वयंवरच होते. ‘कुमारसंभवा’मध्येही माता पार्वतीने भगवान शंकरांना स्वच्छेने वरले होते. एक ना अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आपल्याकडे पूर्वी स्त्रियांना त्यांचा नियोजित वर निवडण्याचे स्वातंत्र्य होते. ‘ऑनर किलिंग’चा आणि आपल्या भारतीय समाजसंस्कृतीचा काहीही संबंध नाही.”
 
ज्योती साठे या तरूण सामाजिक कार्यकर्तीचे म्हणते की, “आज आईवडिलांना मुलींचा प्रेमविवाह नाकारण्याचा अधिकार नाही. कारण, आईवडिलांची पिढी प्रेमाचे चित्रपट, मालिका आवडीने पाहते. त्यावर चर्चा करते. हे सगळे त्यांच्या मुलीसमोर घडते. तिच्यावर नकळत परिणाम होतच असतो की, आईवडिलांचा प्रेमप्रकरणाला विरोध नसेलच. त्यामुळे वयात येताच मुलींचे प्रेमसंबंध जुळले तर त्यात वावगे वाटत नाही. मात्र, गोष्ट जेव्हा विवाहापर्यंत येते, त्यावेळी त्यांना कळते की, आपल्या आईवडिलांना सिनेमा आणि मालिकेमधले प्रेम, गरीब दुसर्‍या जातीतल्या नायकाचे लग्न, श्रीमंत आणि उच्च जातीच्या नायिकांचे झालेले आवडते. पण, प्रत्यक्षात त्यांच्या मुलीने किंवा मुलाने जर असे केले तर त्यांना आवडत नाही. पण, मुलींना हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण, एकतर वयात आलेल्या मुलींना लिंगविरोधी आकर्षण असणे ही निसर्गसुलभ भावना असते. चित्रपट, मालिका, त्यावर घरात होणारी चर्चा यामुळे प्रेमविवाहाबद्दल सकारात्मक चांगली भावना असते. ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘जीव देईन पण तुझीच राहणार’ भावना, ‘तेरे लिये सारे दुनियासे लढूंगी’ वगैरे बंडखोरीही मनात पक्की रूजलेली असते. या मानसिकतेमुळे मुली आईवडिलांच्या विरोधात कोणत्याही किमतीवर लग्न करण्यास तयार असतात. मात्र, आपल्या मुलीच्या मनात हे काही असे येऊ शकते, असे आईबाबांच्या गावीही नसते. त्यामुळे त्यांच्या मर्जीविरोधात लग्न झाले की त्यांना आपण मुलींवर ठेवलेल्या विश्वासाचा भयंकर अपमान वाटतो.”




सन्मानासाठी, इज्जतीसाठी घरातील सदस्य त्यातील मुख्यत: महिला सदस्याची हत्या करणे याला सर्वसाधारपणे ‘ऑनर किलिंग’च म्हटले जाते. मग ‘ऑनर किलिंग’ची नक्की व्याख्या काय? इज्जतीसाठी आणि सन्मानासाठी केलेली हत्या का? वैजापूरमध्ये घडलेल्या या ‘ऑनर किलिंग’च्या घटनेने प्रत्येक संवेदनशील व्यक्ती आज अस्वस्थ झाली आहे. विषयांतर होईल, पण एक निरीक्षण नोंदवायला हवे की, डफली घेऊन आझादीचे रडगाणे मागणारे, न होणार्‍या अत्याचारांविरोधातही विद्रोह सांगणारे तथाकथित विद्रोही, शोषित-वंचितांच्या हक्कासाठी लढतो, असे सांगणारे मानवी हक्क-कार्यकर्ते या घटनेला विरोध करताना दिसले नाहीत. कारण, वैजापूरमध्ये सजातीय विवाह करणार्‍यांबाबत ‘ऑनर किलिंग’ घटना घडली होती. याच घटनेत मुलगा-मुलगी तथाकथित उच्चवर्णीय आणि तथाकथित मागासवर्गीय असते तर? तर आज यांच्या आझादी आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या डफल्या वैजापूरला पहिल्या गेल्या असत्या. असो.




‘ऑनर किलिंग’संदर्भात चर्चा करताना एक मुद्दा महत्त्वाचा होता तो म्हणजे घरच्यांची इज्जत केवळ मुलीच्या विवाहसंबंधात किंवा लैंगिक संबंधातच अडकलेली असते का? जेव्हा घरातली व्यक्ती स्त्रीही चोरी, बलात्कार, निष्पापांचे खून, समाजविरोधक किंवा देशविरोधी कृत्य यामध्ये गुंतलेली आढळते, त्यावेळी कुटुंबाची इज्जत वाढीस लागते का? यासंदर्भात कोणतीही दंडात्मक कारवाई समाज किंवा कुटुंबाकडून झालेली क्वचित आढळते. मग ‘ऑनर किलिंग’चे नेमके सत्य काय?२०१० साली ‘शक्तीवाहिनी’ या स्वयंसेवी संस्थेने ‘ऑनर किलिंग’संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निर्णय देताना प्रधान न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी २०१० साली निर्णय दिला होता की, दोन सज्ञान व्यक्तींनी आपल्या स्वेच्छेने विवाह केला असता तिसरा कुणीही व्यक्ती त्यात हस्तक्षेप करु शकत नाही. तसेच ‘हिंदू विवाह कायदा १९५५ (५)’ नुसार एकाच गोत्रामध्ये विवाह करण्यास बंदी नाही. पुढे ‘ऑनर किलिंग’ विरोधात ‘प्रीव्हेंशन ऑफ क्राईम इन द नेम ऑफ ऑनर बिल’ पारितही झाले. यानुसार सज्ञान व्यक्तींनी स्वेच्छेने केलेल्या विवाहाला त्यांचे मातापिता, कुटुंब किंवा त्यांची जातपंचायत विरोध करू शकत नाही. जर अशी तक्रार नवविवाहित दाम्पत्यांनी केली, तर विवाहास विरोध करणार्‍यांवर, दडपण आणणार्‍यावंर कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. अशावेळी आपण कोणताही विरोध किंवा दबाव टाकला नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या दोषी ठरवलेल्या व्यक्तीची आहे. तसेच कुटुंबाच्या किंवा जातीच्या विरोधात जाऊन विवाह करणार्‍या दाम्पत्यास कायद्याने संरक्षण दिले आहे. यासंदर्भात एक तथ्य हेसुद्धा आहे की, ‘ऑनर किलिंग’ झालेल्या घटनेमध्ये केवळ तीन टक्के विवाह हे सगोत्र होते. इतर कारणामुळे झालेल्या ‘ऑनर किलिंग’ची संख्या ९७ टक्के होती. याचाच अर्थ त्या त्या समाजातल्या व्यक्तीच्या परिस्थितीनुसार आणि मानसिकता तसेच आर्थिक दर्जानुसार ‘ऑनर किलिंग’च्या घटना समाजात दुर्देवाने घडत असतात.




‘ऑनर किलिंग’संदर्भात आपण जगाचा आढावा घेतला, तर मुस्लीम वर्चस्व असलेल्या देशात तर अशा घटनांची विचारता सोय नाही. इराणमध्ये पुरूषांना वाटले की, घरातल्या महिला सदस्याचे बाहेर कुणाशी प्रेमसंबंध आहेत किंवा त्यांना न सांगता ती महिला रात्री थोडा वेळ जरी बाहेर राहिली आणि याबाबत घरातील पुरुष सदस्यांना जरा जरी संशय आला आणि त्यातून त्यांनी त्या महिलेचा खून केला तर त्याला इराणचा कायदा शिक्षा देतो. पण किती? तर जास्तीत जास्त तीन वर्षे तुरूंगवास. अमेरिका वगैरे पाश्चिमात्य देशांतही श्वेत आणि अश्वेतवर्णीयांमध्ये भयंकर असमानता आहेच. तिथेही श्वेत-अश्वेतवर्णीय विवाह सहजासहजी पचनी पडत नाहीत. आफ्रिका खंडातील कितीतरी देशांत तर मुलींचा विवाह वयाच्या ७ ते ११ वर्षांपर्यत केला जातो. का? तर त्यांनी मोठे होऊन त्यांच्या मर्जीने दुसर्‍या गटातल्या पुरुषाशी लग्न करू नये म्हणून. थोडक्यात, ‘ऑनर किलिंग’च्या घटना अशा सार्वत्रिक आहेत. भारताबाहेर या गुन्ह्याला तसे कायदशीर जास्त महत्त्व नाही. पण, भारताततलेसंविधान तर पूर्णत: ‘ऑनर किलिंग’च्या विरोधातले आहे. भारतीय संविधानातले ‘अनुच्छेद १४’, ‘१५ (१)’, ‘१९’, ‘२१’ आणि ‘३९ (एफ)’ हे ‘ऑनर किलिंग’च्या विरोधातले आहेत. याबाबत एक सकारात्मक बाब अशी की, ‘ऑनर किलिंग’सारख्या घटनांची आकडेवारी तपासताना एक बाब जाणवते की, २०१५ साली संपूर्ण भारतात २५२ ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडल्या होत्या. त्यावर कायद्याने आणि समाजाने कारवाई केली. २०१९ साली ‘ऑनर किलिंग’च्या घटना २४ घडल्या. म्हणझे ‘ऑनर किलिंग’च्या घटना कमी घडत आहेत. पण, अशी एकही घटना घडली तरीसुद्धा ती आपल्या समाजाला काळीमा फासणारीच आहे.







 त्यामुळे ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडूच नये, यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी संविधानाने भारतीय नागरिक म्हणून एका स्त्रीला दिलेले समता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विवाहासंदर्भात आणि एकंदर माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेले अधिकार हे प्रत्येकाला कळायलाच हवे. चोरी, खून, दरोडा, बलात्कार वगैरे गुन्हा ठरतो. एखाद्याला जातिवाचक शब्द बोललो, तर ‘अ‍ॅट्रोसिटी कायदा’ आहे. ही जागृती समाजात झाली. तशीच जागृती ‘ऑनर किलिंग’ विरोधात व्हायला हवी. मुलींना आणि कुणालाही सज्ञान झाल्यानंतर आपल्या मर्जीने विवाह करण्याचा कायद्याने अधिकार दिला आहे. या विवाहाला विरोध करणार्‍यांना, ‘ऑनर किलिंग’करणार्‍यांना भारतीय कायद्याने गुन्हेगार ठरवून शिक्षा मिळू शकते, याची वस्ती पातळीवर जागृती होणे गरजेचे आहे. पण, ‘ऑनर किलिंग’मध्ये गुन्हेगार स्वत:ला न्यायी ठरवतो. समाजात सन्मान मिळेल, असे त्याला वाटते. मग तो कायद्याला कशाला घाबरेल, हेसुद्धा काही प्रमाणात खरे आहे. मात्र, ही मानसिकता बदलायची असेल, तर त्या व्यक्तीवर प्रभाव टाकणार्‍या समाज संस्थांची मानसिकता बदलायला हवी. कायद्याने नसलेल्या, पण समाजात आजही असलेल्या जातपंचायतींमध्ये ‘ऑनर किलिंग’विरोधात जागरण करायला हवे. त्यांना समता, स्वातंत्र्याचे संविधानातले कायदे सांगायला हवेत. त्याचबरोबर आपल्या धार्मिक संस्कृतीनेही मुलीबाळींना माणूस म्हणून विवाहाचे अधिकार पूर्वी दिले होते, हे जाणीवपूर्वक त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे. ते त्यांना माहिती नाही, असे नाही. पण, नव्या परिमाणाने ही मांडणी करायला हवी. ‘ऑनर किलिंग’सारख्या घटना आपल्या आजूबाजूला घडू नयेत, यासाठी माणूस म्हणून सजग राहायला हवे, ‘ऑनर किलिंग’ कुठेही घडू नयेच!!!
 
@@AUTHORINFO_V1@@