"कंटकाकीर्ण मार्गावरील दीपस्तंभ म्हणून अण्णाभाऊंचे स्थान अटळ"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2021   
Total Views |

RSS _1  H x W:

 
 
 
 
 
 
मुंबई (ओंकार देशमुख) : "अण्णाभाऊंच्या साहित्यात समाजातील संबंधांना तडे जातील असे एकही ठिकाण नाही, सत्य, करुणा, शुचिता, तपस्या हे गुण असल्यामुळे अण्णाभाऊ हे धार्मिक मनुष्य होते, असे मी मानतो, अण्णाभाऊंना आपल्या लोकांच्या उद्धाराची अनिवार्य ओढ होती; परंतु हा आपलेपणा एकाच गटासाठी नव्हता. त्यांचे लेखन भारतीय संस्कृतीच्या मूल्यातत्त्वांचा परिपोष करणारे होते. या देशाचा राष्ट्रीय विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता कंटकाकीर्ण मार्गावरचा दीपस्तंभ म्हणून अण्णाभाउंचे स्थान हे अढळ आहे, आणि ते त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवलेले होते." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. 'साप्ताहिक विवेक'च्या ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
 
 
उपस्थितांना संबोधित करताना डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, "'साप्ताहिक विवेक'आणि एम.जी.डी.तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे अण्णा भाऊ साठेंच्या व्यक्तिमत्त्वाचा मला परिचय झाला आहे, अशी माझी भावना आहे. साप्ताहिक विवेकने काढलेल्या या अंकामुळे मला अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र परिचय करून घेता आला. हा सुवर्णयोग माझ्या आयुष्यात आणून दिल्याबद्दल मी एम.जी.डी.मंच आणि साप्ताहिक विवेकला मनापासून धन्यवाद देतो. आजच्या संदर्भात अशा प्रकारच्या महापुरुषांचे चरित्र आणि तो विचार ज्याप्रकारे समाजापुढे यायला हवा, तो साप्ताहिक विवेकने केलेल्या या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे आलेला आहे.



आजच्या युगात प्रामाणिकता दुर्मिळ होत चालली आहे. ती मनापासून आणि दृढ असावी लागते, तेव्हाच ती जीवनाच्या धकाधकीमध्ये, कष्टामध्ये-संकटामध्ये, मोह-आकर्षणामध्ये अढळपणे टिकून राहते. लोकशाहीर, साहित्यरत्न स्व. अण्णाभाऊ साठे हे आजन्म प्रामाणिकतेने आयुष्य जगले. अण्णाभाऊंच्या प्रामाणिकतेतील एक शतांश प्रामाणिकपणा जरी आजच्या नेतेमंडळींमध्ये आला तर देशाच्या भाग्यामध्ये शंभर पटींनी वृद्धी होईल, असा मला विश्वास आहे. अण्णाभाऊ स्वतःशी आपल्या कामाशी आणि समाजाशी प्रामाणिक राहिले. त्याजोडीला त्यांच्यात जन्मजात असलेला कळवळा देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आयुष्यभर दुःख झेलले आहे. सामाजिक ते वैयक्तिक आयुष्यात खूप कमी सुखाचे क्षण अण्णाभाऊंच्या आयुष्यात आले. लौकिकार्थाने पहिले तर त्यांचे आयुष्य अपमान आणि अभावातच गेले. मात्र त्यामुळे ते कडवट बनले नाही , उलट यामुळे त्यांच्या मनात करुणा उत्पन्न झाली आणि आपले दुःख बाजूला सारून समाजाचे दुःख दूर व्हावे यासाठी त्यांनी आजीवन काम केले, ही थोर लोकांची निशाणी असते."
 
 
 
'अण्णाभाऊ साठे आणि सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात फरक नाही'


"अगदी किशोरवयापासून ते सत्याच्या बाजूला उभे राहिले. दारिद्र्य विषमतेशी त्यांना स्वतः लढावे लागले. समाजातील दारिद्र्य दूर करून समाजात सर्वत्र सर्वमंगल व्हावे यासाठी अण्णाभाऊंनी आपली उत्तुंग अलौकिक प्रतिभा झिजवली. सवंग लोकप्रियता आणि पुरस्कारांच्या मागे न लागता प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजप्रबोधनाकरिता त्यांनी आपल्या प्रतिभेचे चौफेर अविष्कार केले. माझ्या अभ्यासानुसार अण्णाभाऊंसारखे दुसरे व्यक्तिमत्त्व मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच वाटते. आपल्या अंगी असलेली सगळी प्रतिभा 'तू तेचि अर्पिली न मी कविता रसाला लेखा प्रति विषय तूंचि अनन्य झाला' प्रमाणे मातृभूमीच्या पायाशी वाहणारे सावरकर आणि दुःखीत्यांच्या-शोषितांच्या अडचणी दूर व्हाव्यात , ते संघटित व्हावेत, त्यांच्यातील विषमता असत्य नष्ट व्हावे आणि हा समाज समतायुक्त आणि शोषणमुक्त व्हावा, समाज वैभवाची आणि मंगळाची वाट चालावा या साठी आपली प्रतिभा खर्ची घालणारे अण्णाभाऊ यांच्यात मला फरक दिसत नाही. " असे डॉ मोहनजी भागवत यावेळी म्हणाले.
 
 
 
दुःखीतांसाठी सर्व काही असे व्रतस्थ आयुष्य जगणारे अण्णाभाऊ


"आपल्या वाट्याला आलेले दुःख, समाजातून होणाऱ्या प्रहारांची पीडा हे सर्व सहन करून म्हणजेच एकप्रकारे हलाहल पिऊन लोकांत शांती उत्पन्न करणाऱ्या शंकराची ही परंपरा आहे. आणि त्याप्रमाणे दुःखीतांसाठी सर्व काही असे व्रतस्थ आयुष्य जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणून मला अण्णाभाऊ साठे हे वाटतात." असे डॉ मोहनजी भागवत म्हणाले.
 
 
 
'अण्णाभाऊंचे साहित्य समाजातील प्रकृती आणि विकृती दाखविणारे'


अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याविषयी बोलताना डॉ मोहनजी भागवत म्हणाले की, 'अण्णाभाऊंनी एक आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन उत्तमरीत्या जगले. समाजात क्रांती घडवून आणतानाही जुन्या रूढी दूर करून शाश्वत आणि सदामंगल आहे ते जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अण्णाभाऊंचे साहित्य हे समाजातील तळागाळातील लोकांच्या दुःखाचे चित्रण करणारे आणि समाजातील प्रकृतीसोबतच विकृतीही ठळकपणे दाखविणारे आहे आणि समाजातील अन्याय ठसठशीतपणे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या साहित्यातून करण्यात आला," असे डॉ मोहनजी भागवत म्हणाले.
 
 
 
याप्रसंगी हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे, तसेच सह संपादक रवींद्र गोळे, ह. भ. प. बाबुराव वारे महाराज, उद्योगपती आनंद कांबळे, निवृत्त अधिकारी तुकाराम साठे आदी मान्यवर उपस्थित होते. अण्णाभाऊंनी वापरलेल्या वस्तूंचे संकलन करणारे कबीरदास, जागतिक दर्जाचे अभ्यासक डॉ. संजय देशपांडे आणि रुग्णसेवक डॉ. मधुकर गायकवाड यांना यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
 
 
 
'सर्व समाजपुरुष आमचे आहेत, या भूमिकेतून सा. विवेकने ग्रंथप्रकाशन केले, अण्णाभाऊंच्या जीवनापेक्षा त्यांच्या साहित्यावर या पुस्तकामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे, असे प्रतिपादन 'साप्ताहिक विवेक'च्या रवींद्र गोळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन आनंद कांबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.
 




 
 
@@AUTHORINFO_V1@@