मानवी हक्क...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2021   
Total Views |
camel  _1  H x
१० डिसेंबर, ‘जागतिक मानवी हक्क दिना’च्या पार्श्वभूमीवर मुक्या जनावरांच्या हक्कांबद्दल काय? सध्या सौदी अरेबियामध्ये ‘किंग अब्दुलअजीज कॅमल फेस्टिव्हल स्पर्धा’ सुरू आहे. ही स्पर्धा जिंकणार्‍या उंटाला तब्बल ६.६ कोटी मिळणार आहेत. या स्पर्धेतूनसध्या ४०उंट बाद करण्यात आले. कारण, यावर्षी अधिकार्‍यांना असे आढळून आले की, डझनभर उंट पाळणार्‍यांनी उंटांची शेपटी वाढवण्यासाठी हार्मोन्सचा वापर केला.
 
 
उंटांचे डोके आणि ओठ मोठे होण्यासाठी त्यांना ‘बोटॉक्स’चे इंजेक्शन दिले जात होते. हे सगळे का? उंटांच्या स्पर्धेतउंट सौंदर्यस्पर्धा जिंकावेत यासाठी. बिचारे उंट! ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समावेश झालेल्या या स्पर्धेत जगभरातून उंट आणले जातात. काही मापदंडांनुसार उंटांचे सौंदर्य मोजले जाते. ज्यामध्ये चेहरेपट्टी, नाक ओठ, मान, कुबड, शारीरिक ठेवण पाहिली जाते. सजावट, वेशभूषा पाहिली जाते. या सगळ्यांमध्ये उंटांनी जिंकावे, यासाठी या मुक्या जनावरांवर औषधांचा प्रयोग करण्यात आला. मुक्या प्राण्यांच्या हक्कांचे काय?
 
 
असो, ‘मानवी हक्क दिना’च्या अनुषंगाने जगभरात मानवी हक्कांचे काय चालले आहे? चीन, अफगाणिस्तान, म्यानमार आणि पाकिस्तान या देशांमध्ये सध्या मानवी हक्कांवर मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे. चीनमध्ये तर कम्युनिस्ट राजवटीनुसार प्रत्येक धर्माच्या माणसाने वागलेच पाहिजे, अशी भूमिका आहे. त्यामुळे माणसाला धर्म, श्रद्धा आणि आपल्या आवडीने समाजजीवन जगणे दुरापास्त झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये तर तालिबानी सत्तेत आल्यापासून ‘ए माणुसकी क्या होती हैं?’ असा सवालच उपस्थित झाला आहे.
 
 
म्यानमारमध्ये तेथील सैन्यानेच हैदोस घातला. तिथे नुकतीच एक भयंकर घटना घडली. म्यानमार सैनिकांनी तेथील गावांतील ११ नागरिकांना मुलाबाळांसोबत बांधले. मग त्यातील काहींवर गोळ्या झाडल्या आणि मग बांधलेल्या सर्वांना पेटवून दिले. पाकिस्तान तर याबाबतीत सगळ्यांचा बापच. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कचरा वेचणार्‍या चार महिलांना अक्षरशः नग्न करून मारहाण करण्यात आली. त्यांचा गुन्हा काय? तर त्यांनी एका हॉटेलवाल्याकडे पाणी पिण्यास मागितले.
 
 
तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्या तहानलेल्या महिला चोर वाटल्या. त्यामुळे चोर समजून त्यांना नग्न करून मारहाण करण्यात आली. त्यावेळी अनेकजण या घटनेचा व्हिडिओही बनवत होते. किती ही निर्दयता, अमानुषता! चोर समजून किंवा गुन्हेगार समजून महिलांना मारले. मात्र, पाकिस्तानात ही घटना घडल्यामुळे या घटनेच्या क्रूरतेविरोधात कारवाई कशी आणि कधी होईल, याबद्दल न विचारलेले बरे! काही दिवसांपूर्वीच श्रीलंकन नागरिक प्रियांथा कुमारची 900 लोकांनी मिळून हत्या केली.
 
 
१० डिसेंबर ‘मानवी हक्क दिना’च्या अनुषंगाने या घटना पाहिल्या की वाटते, खरेच जगात मानवी हक्क म्हणून काही असते का? बरं, या सगळ्या घटनांचे समर्थनही त्या-त्या देशाचे सत्ताधारी करताना दिसतात. कधी उघडउघड, तर कधी आडवळणाने. उदाहरणार्थ - प्रियांथा कुमारची हत्या झाली. मात्र, पाकिस्तानच्या वजिर-ए-आझम इमरान खानचे म्हणणे की, “ही घटना भारतीय प्रसारमाध्यमे सातत्याने प्रसारित करत आहेत.
 
 
असे करून भारत पाकिस्तानची प्रतिमा खराब करत आहे.” याचाच अर्थ आपल्या पायाखाली काय जळते आहे, याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून दुसर्‍याच्या घरात काय चालले आहे हे वाकून बघण्याची सवय पाकिस्तानने चांगलीच जोपासली आहे. काहीही झाले की, भारताला दोषी ठरवायचे. पण श्रीलंकन नागरिकाची निर्दयी हत्या ईशनिंदा केली म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी केली. त्यामुळे दोषी कोण आणि का आहेत, हे उघडच आहे.
 
 
आता या परिप्रेक्षात आपल्या देशात मानवी हक्क वगैरेचे आवाज कुठे उठवले जातात? एखाद्या नक्षल्यांवर किंवा दहशतवाद्यावर कायदेशीर कारवाई झाली की, मानवी हक्क वगैरे बोलणार्‍या काही ठराविक लोकांचे कोंडाळे जागे झालेलेदिसून येते. हे लोक भारतीय नागरिकांच्या भल्यापेक्षा देशविरोधी कृत्य करणार्‍यांच्या हक्कासाठी बोलताना दिसतात. जणू काही यांचा मानवी हक्क म्हणजे देश आणि समाजविघातक शक्तींना समर्थन देणे हेच असते की काय? तर थोडक्यात, मानवी हक्कच नव्हे, तर एकंदर निसर्गातील सर्वच घटकांच्या हक्कासाठी जागृती करणे गरजेचे आहे. कारण, जीव आणि संवेदना सगळ्यांची सारखीच आहे...
@@AUTHORINFO_V1@@