
नवी दिल्ली : अमरावती, नांदेड आणि अन्य जिल्ह्यात हिंसाचार माजविणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी मागणी भाजप खासदार मनोज कोटक यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार, गृहखातं आणि पोलीस यांच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्न विचारल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.
"गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात सामाजिक एकोपा भंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती सारख्या भागात पूर्वनियोजित कट रचून हिंदू व्यापाऱ्यांची दुकाने, घरांवर हल्ले करण्यात आले. त्रिपुरात जी घटना घडलीच नाही, हिंसाचार झालाच नाही, त्या घटनेबद्दलचे खोटे फोटो दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.", असे ते म्हणाले.
"बहुसंख्य हिंदूंना टार्गेट करण्यात आले. तरीही या प्रकाराच्या घटनेत राज्य सरकार आणि पोलीसांची भूमिका संशयास्पद आहे. रझा अकादमी आणि पीएफआय सारख्या संस्थांची भूमिका संशयास्पद आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी. रझा अकादमी आणि तत्सम संघटनांवर बंदी आणायला हवी. ज्या प्रकारे पोलीसांनीही केवळ हिंदूंवर कारवाई केली. याचा अर्थ सरळसरळ एका विशिष्ट वर्गाला टार्गेट केले जात आहे. त्यामुळे तातडीने ही कार्यवाही करावी, असा प्रस्ताव खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत मांडला.
महाराष्ट्रातील अमरावती, नांदेडमध्ये त्रिपुराबद्दल खोटी अफवा पसरवून हिंदूंना टार्गेट करण्यात आले. हिंसाचार माजविला. संसदेत मी पोलीस आणि राज्य सरकारच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी व्हावी तसेच रझा अकादमी आणि पीएफआय सारख्या देशविघातक संस्थांवर बंदी प्रस्ताव मी संसदेपुढे ठेवला. - मनोज कोटक, खासदार, भाजप