‘त्यांनी’ घेतला ग्रामविकासाचा वसा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2021   
Total Views |


mohan bhagwat 2.jpg_1&nbs



‘संत ईश्वर फाऊंडेशन’, नवी दिल्ली (राष्ट्रीय सेवा भारती पुरस्कृत) या संस्थेतर्फे ‘संत ईश्वर विशिष्ट सेवा सन्मान’ पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते ‘विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली’ यांना नुकताच प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या निमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...



डोंबिवलीच्या ‘विवेकानंद सेवा मंडळा’ची १९९१ साली ऑक्टोबर महिन्यात दसर्‍याला औपचारिक स्थापना झाली. संघ स्वयंसेवक असलेले मामा देवस्थळी आणि ‘व्हीजेटीआय’चे प्राध्यापक सुरेश नाखरे यांनी या मंडळाची स्थापना केली. दोघांनीही आणीबाणीच्या काळात सत्याग्रहात सहभाग घेतला होता. नाखरे यांची ‘विवेकानंद केंद्रा’चे ‘जीवनव्रती’ म्हणून निवड झाली होती. परंतु, काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांना जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी अशी प्रतिज्ञाच केली होती की, आपण आयुष्यभर शिक्षकी पेशातून, आपल्या नियमित कामामधूनच कार्यकर्ते घडवायचे. त्याची सुरुवात कशी करायची? तर त्यांची सुरुवात ग्राहक संघाच्या छोट्याशा गोडाऊनमध्ये वाचनालय सुरू करून झाली. डोंबिवलीत त्याकाळात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. इंजिनिअरिंगची पुस्तके महाग होती. ती सर्वांना घेणे परवडत नसे. त्यामुळे इंजिनिअर्ससाठी एक वाचनालय सुरू करावे, अशी भावना होती. त्यातून मंडळाची मुहूर्तमेढ रोवली.




 
वाचनालयात एक पुस्तकांचे कपाट आणि एक सतरंजी होती. दहा ते बारा विद्यार्थी येत होते. हळूहळू वाचकसंख्या आणि पुस्तकसंख्याही चक्रवाढ व्याजाने वाढण्यास सुरुवात झाली. एका तरुण कार्यकर्त्याकडे एक रिकामा फ्लॅट होता. तो त्यांनी वाचनालयाला दिला. दोन-तीन वर्षांच्या काळात काम मोठ्या प्रमाणात वाढत गेले. त्यामुळे भाड्याने किंवा स्वत:ची जागा घेणे क्रमप्राप्त ठरले. आता वाचनालयातील विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांवर आहे. संघधुरिणांनी १९९३ मध्ये युवक कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग आयोजित केला होता. संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते दामूअण्णा दाते यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांचा पहिला अभ्यासवर्ग घेतला होता. त्या अभ्यासवर्गातून ‘विवेकानंद सेवा मंडळ’ हे केवळ नाव मंडळाला देऊन चालणार नाही, तर विवेकानंदांच्या विचारांनुसार सेवा करणेदेखील आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात आणले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. दामूअण्णांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी सेवा करण्याचा निश्चय केला. त्यातून संस्थेच्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला. ‘विवेकानंद’ संस्थेत ९९ टक्के तरुण आहेत. १५० हून अधिक कार्यकर्ते सामाजिक कार्य करीत आहे. दरवेळी अभ्यासवर्गात विवेकानंदांचे विचार मांडले जातात. युवामनांच्या संवर्धनाकरिता ही संस्था कार्यरत आहे. त्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रात नेतृत्वक्षम बनविण्यासाठी संस्था झटत आहे. व्यक्तिनिर्माण, शिक्षण, ग्रामविकास, सामाजिक उद्योजकता या चतु:सूत्रीवर संस्था काम करीत आहे.





स्वामी विवेकानंद यांनी ‘सेवा केली पाहिजे’ असा एक मंत्र दिला होता. त्यानुसार रा. स्व. संघाच्या ‘वनवासी कल्याण आश्रमा‘च्या माध्यमातून त्यांनी विहीगाव या खेडेगावाचा विकास करण्याचे काम हाती घेतले. गावाची परिस्थिती पाहून कार्यकर्त्यांचे मन हेलावले. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व काम त्यांनी गावात सुरू केले. ग्रामविकासासाठी काही कार्यकर्ते एक वर्ष गावातदेखील राहिले. ग्रामविकास, पाणीपुरवठा अशी गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारी सर्व कामे हाती घेतली. गावाचे काम अजूनही सुरू आहे. तसेच शहापूरजवळील अंदाड गावात ‘अंबरनाथ एज्युकेशन सोसायटी’ची एक शाळा आहे. त्या शाळेत आजूबाजूच्या परिसरातील साधारण दहा किमींवरून विद्यार्थी शाळेत येतात. त्या शाळेच्या विकासाचे काम संस्थेतर्फे केले जात आहे. ‘ज्ञानरचनावाद’ ही संकल्पना आपल्याकडे पूर्वीपासून आहे. त्याच पद्धतीने शाळेत संस्था काम करीत आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘कौशल्य विकासा’चे धडे शिकविले जात आहे. या विद्यार्थ्यांचा आर्थिक खर्च संस्था करते. शाळांमध्ये प्रयोगशाळा, संगणक वर्ग तयार केले आहेत. महिलांच्या हाताला काम हवे आहे, हे लक्षात आल्यानंतर मेणबत्या, वैद्यकीय पिशव्या, उटणे बनविणे अशी कामे त्यांना देण्यास सुरुवात केली. दोन गावांमध्ये दहा-अकरा महिला बचतगट उत्तम काम करत आहेत. संस्थेने या गावात ‘भारत विकास परिषद’, ‘टिळकनगर गणेशोत्सव मंडळ’ यांच्या सहकार्याने तीन धरणे बांधली. संस्थेचे पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम असलेल्या खोडदे गावात हे काम सुरू आहे. आतापर्यंत खोडदे गावात सौरदिवे, पाण्याचे पंप, सायकलचे पंप, ठिबक सिंचन इत्यादी देण्यात संस्थेला यश आले आहे.




 
दहा वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने संस्थेला ३० वर्षांच्या ‘लीज’वर एक जागा दिली. त्या जागेवर ‘बांधा आणि वापरा’ या तत्त्वानुसार आज संस्थेची दोनमजली इमारत उभी आहे. या इमारतीमध्ये वाचनालय अणि अभ्यास कक्ष सुरू आहे. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमात ‘नालंदा’ उपक्रम, उमंग, ज्ञानसेतू शैक्षणिक केंद्र, ‘पुस्तक मित्र’, छोटे ग्रंथालय आदी उपक्रम चालतात. संस्थेचा ‘नालंदा’ हा उपक्रम पाचपेक्षा अधिक शाळांमध्ये राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत अपुर्‍या शैक्षणिक सुविधांशी जुळवून घेत शिकणार्‍या वंचित मुलांसाठी वेळेत आणि नियोजनबद्ध मार्गाने मदत पोहोचविण्याचे ‘विवेकानंद सेवा मंडळा’चे उद्दिष्ट आहे. ‘जलशक्ती अभियान’, युवा सक्षमीकरण हादेखील संस्थेचा उपक्रम आहे. सामाजिक ऋणातून अंशत: मुक्त होण्यासाठी ऋणमोचन भेटीचे आयोजन संस्थेतर्फे केले जाते. या संकल्पनेअंतर्गत संघटनात्मक पातळीवर सामूहिकपणे कार्यकर्त्यांसाठी निरनिराळे उपक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांना उद्योगजगताची ओळख, योग्य करिअर, मार्गदर्शन आणि उचित रोजगारसंधी या मुद्द्यांवर काम केले जाते. तंत्रज्ञान केंद्र या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा उत्साह आणि व्यावसायिक कौशल्य यांचा मिलाफ साधून भविष्यात कुशल तंत्रज्ञ निर्माण करण्याचे दृष्टीने पोषक वातावरण देण्याचा प्रयत्न मंडळ करते. डोंबिवलीत महापालिकेच्या शाळा दत्तक घेतल्या आणि त्यांना सामग्री दिली. ‘कोविड’ काळात या संस्थेने खूप काम केले आहे. ‘कोविड’ काळात संस्थेने गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील जवळजवळ सहा हजार जणांना अन्नधान्य, औषधांचा वाटप केले. या कामासाठी संस्थेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. संस्थेच्या ३१ वर्षांच्या कार्यात हजारो विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचा लाभ घेतला आहे. गावागावांमध्ये प्रकल्प राबविणे, तसेच अधिकाधिक चांगले तरुण कार्यकर्ते घडविणे, यादृष्टीने सध्या संस्थेची वाटचाल सुरू आहे.








@@AUTHORINFO_V1@@