भारतीय समाजाचे वैभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2021   
Total Views |

Manasa 2_1  H x



रामजी ओम मिना हे पश्चिम रेल्वेच्या ‘फायनान्स डिपार्टमेंट’चे हेड तसेच ‘भारतीय आध्यात्मिक संस्कृती’च्या संपन्नतेची ‘डॉक्युमेंटरी फिल्मस्’ बनवणारे ध्येयवेडे कलाकार. त्यांच्या ध्येयाचा घेतलेला मागोवा...





दि. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे ‘आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’ आहे. यामध्ये ‘भारत प्रकृती का पालक’ या डॉक्युमेंटरीची निवड झाली. या डॉक्युमेंटरीचा विषय हा भारतीय वैभवशाली इतिहासाची गाथा गातो. ही ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ ज्यांनी बनवली त्यांचे नाव आहे रामजी ओम मिना. भारतीय अध्यात्म, धर्म आणि संस्कृती यानुसार त्यांनी ११ डॉक्युमेंटरी फिल्म बनवल्या. त्यामध्ये भारतीय सांस्कृतिक इतिहासाचा वारसा त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मांडला आहे. ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ बनवण्याचे पद्धतशीर प्रशिक्षण त्यांनी ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ यांच्याकडून घेतले आहेच. पण हे प्रशिक्षण म्हणजे यांत्रिक-तांत्रिक शैक्षणिक प्रशिक्षण. या प्रशिक्षणातून केवळ आणि केवळ भारतीय संस्कृती आणि इतिहासावर ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ बनवण्याची आंतरिक प्रेरणा ही मात्र रामजी यांच्याकडे उपजतच. नव्हे नव्हे, या विषयाच्या ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ बनवाव्यात म्हणूनच त्यांनी हे प्रशिक्षण घेतले, असे म्हटले तर वावगे ठरू नये.‘भारत प्रकृती का पालक’ ही फिल्म बनवताना ती सत्य, ऐतिहासिक दस्तावेजांनी परिपूर्ण कशी होईल, याचा त्यांनी ध्यासच घेतला. फिल्मला ‘आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये स्वीकारले जाईल का, वगैरे यापेक्षाही ही फि ल्म जो कोणी पाहील, तो भारतीय ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभवाची सत्यता जाणेल, यासाठी त्यांनी फिल्म निर्माण केली. रामजींसारखे ध्येयवेडे कलाकार विरळेच असतात. तसे रामजी हे पश्चिम रेल्वेच्या ‘फायनान्स डिपार्टमेंट’चे ‘हेड’ आहेत. खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी. संपूर्ण पश्चिम रेल्वेमध्ये सहा ‘डिव्हीजन’ येतात. या सहाही ‘डिव्हीजन’चा आर्थिक डोलारा डोळ्यात तेल घालून सांभाळणे, हे जिकिरीचे काम. पण रामजी यांनी हीसुद्धा जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. कोरोना काळात रेल्वेचीही हानी झाली. या काळात पश्चिम रेल्वेच्या सहाही ‘डिव्हीजन’मध्ये तातडीने ‘ऑक्सिजन प्लांट’ बसवायचे होते. रामजी यांनी बैठकच मांडली. रात्ररात्रभर त्याचे आर्थिक नियोजन केले. ठरलेल्या मुदतीच्या आधीच प्रत्येक ‘डिव्हीजन’मध्ये ‘ऑक्सिजन प्लांट’ सुरू झाले. बोलण्यात मार्दव आणि प्रत्येकालाच प्रेरणा मिळेल, असे वक्तव्य. यामुळे रामजी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि त्यांच्या कलेच्या वर्तुळातही लोकप्रिय. आपल्या ‘डॉक्युमेंटरी’चा विषय जनमानसात पोहोचावा. त्या माध्यमातून जनतेमध्ये भारतीय आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वैभव सगळ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी रामजी प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्यांनी रा. स्व. संघ परिवारातील अनेक मान्यवरांशी संवाद आणि संपर्कही केला आहे.




हिंदू संस्कृती आणि समाज यांबद्दलचे त्यांचे समर्पण प्रेम पाहता वाटते की, या सगळ्या मागची प्रेरणा काय असावी? तर त्याची प्रेरणा म्हणजे बालपणी त्यांच्यावर झालेले संस्कार. राजस्थान-जयपूर जवळील तुंगा हे त्यांचे गाव. त्यांचे वडील बद्रीनारायण हे शेतकरी तर आई नारायणी देवी गृहिणी. रामजी यांचे आजोबा रामजींना पांडवांच्या कथा सांगायचे. पांडवांनी इतके दु:ख सहन केले. वनवास भोगला, संघर्ष केला, पण हार न मानता ते कौरवांना हरवून पुन्हा यशस्वी झालेच. हा त्या गोष्टींचा विषय असायचा. तसेच तुंगा गावात अनेक यात्रेकरू येत असत. एकदा एका भाविक यात्रेकरूने लहान रामजींना वैदिक गणित शिकवले. तेव्हापासून रामजी वैदिक काळ, उपनिषदे, वेद यांचा अभ्यास करू लागले. एका नाथपंथाच्या योग्याने त्यांना योगही शिकवला. बालपणापासून तो योग आज रामजी यांचा सोबती आहे. तर मुळ मुद्दा असा की, रामजी यांना भारतीय अध्यात्म, धर्म आणि संस्कृती यांचा लळा आणि ओढ लहानपणापूसनच लागली. तसेच तुंगा गावचे वातावरण म्हणजे विविध जातीपातीचे लोक गोळ्यामेळ्याने राहायचे. गावात प्रत्येक समाजाचे एकमेकांवरचे अवलंबित्व आणि सहकारिता, सहभागिता ही रामजी यांनी अनुभवलेली. पुढे रामजींना अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते घेता आले नाही. मग रामजी यांनी विज्ञान शाखेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचे ठरवले. पण लोक म्हणायचे किती शिकतोस? नोकरी कर. अशातच रामजी ‘युपीएसी’ची परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले. दु:ख वाटले पण सावरले. महाभारत, पांडव आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता त्यांना आठवते. निराश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात, “उत्तिष्ठ भारत. उठ, अर्जुना, निराशा सोड, कर्म कर.” हे सगळे आठवून रामजी यांनी फिरून ‘युपीएससी’ परीक्षा दिली. ते उत्तीर्ण झाले. सरकारी नोकरी लागली. आयुष्यात स्थिरता आली. भारतीय आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव जगासमोर मांडण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातूनच ते या विषयावर ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ बनवत आहेत. भारतीय समाजाच्या सांस्कृतिक एकतेबद्दल रामजी यांचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. रामजी म्हणतात, “पुढील आयुष्यात काही लोक मला भेटले जे म्हणायचे की, ‘ब्राह्मण बहुजन समाजाचे हक्क लुटतात. त्यावेळी मला आठवते. आमच्या गावात एकुलते एक ब्राह्मणाचे घर. आजूबाजूच्या गावातही असेच. गावातील एकटेदुकटे ब्राह्मण संपूर्ण गावाशी मिळून राहायचे-राहतात. बरं त्या एकट्याने ठरवले, तरी संपूर्ण गावाचे हक्क कसे लुटणार? ब्राह्मणांबद्दल निंदा करणार्‍या लोकांना मी माझे अनुभव सांगतो. पण ते ऐकूनही घेत नाही. त्यांचा समज कसा दूर करणार? माझी ‘डॉक्युमेंटरी’ त्याचे उत्तर आहे की, भारतीय समाज हा एक होता आणि वैभवशाली होता.”



भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीवर आयुष्यभर अभ्यास आणि कार्य करण्याचा रामजी ओम यांचा मनोदय आहे. रामजी ओमसारखी ध्येयप्रेरित व्यक्ती देश संस्कृतीचे वैभव आहेत हे नक्की!













@@AUTHORINFO_V1@@