राज्यात ५५०हून अधिक सरकारी रुग्णालयांत अग्निसुरक्षेची गरज! - राजेश टोपे

आग प्रतिबंधक यंत्रणाची जबाबदारी बांधकाम विभागाची- आरोग्यमंत्री टोपे

    08-Nov-2021
Total Views |
 rajesh tope_1  
 
 
 
 
 
 
 
मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेसंदर्भात आरोग्य विभागाची पाठराखण करत सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी टाकली आहे. आरोग्य विभागाने जून २०२१ मध्येच आग लागलेल्या नवीन इमारतीसाठी आग सुरक्षा प्रतिबंधक सुविधांच्या खर्चासाठी २ कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठवले होते.
 
 
 
मात्र पाठपुरावा करूनही अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही, असे सांगत टोपे यांनी राज्यातील सुमारे ५५० सरकारी रुग्णालयांच्या आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यासंदर्भात आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, आरोग्य विभागासाठी इमारत बांधताना केवळ निधी देण्यापुरती आरोग्य विभागाची जबाबदारी असते. इमारतीचे बांधकाम, तेथील सुविधा, आग प्रतिबंधक यंत्रणा याची सर्व जबाबदारी बांधकाम विभागाची असते.
 
 
 
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत अनेक मागण्या केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सरकारी रुग्णालयांच्या राज्यभर अनेक इमारती आहेत, या इमारतींमधील आग प्रतिबंधक सुविधांसाठी जिल्हास्तरावर एक आग प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करावा, सर्व सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जावे, सर्व जिल्हा रुग्णालयांत सीसीटीव्ही स्क्रीिनग रूम उभारून अंतर्गत व्यवस्थेवर देखभाल ठेवली जावी आदी मागण्या केल्याचे त्यांनी सांगितले.