पक्ष्यांना नवजीवन देणारा महेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2021   
Total Views |

News 1 _1  H x
दिवाळीत अनेक जण फटाके फोडतात. त्यांची हौस होते. मात्र, त्यामुळे पक्षी जखमी होतात. त्या पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम कल्याणमधील पर्यावरणप्रेमी महेश बनकर करीत आहेत.
 
 
महेश बनकर यांचा जन्म उल्हासनगरमध्ये झाला. त्यांचे सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण उल्हासनगरमध्येच झाले. २०००साली ते कल्याणमध्ये स्थायिक झाले. त्यामुळे सातवीपासून पुढील शिक्षण त्यांनी कल्याणच्या ओक हायस्कूल येथून पूर्ण केले. सध्या ते कल्याणमधील आधारवाडी येथे राहत आहेत. मुथा महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
 
कोहिनूर महाविद्यालयातून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे धडे गिरविले. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात त्यांनी भारतात तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर ते सिंगापूर येथे गेले. जापनिज किचनमध्ये त्यांनी काम केले. पुन्हा भारतात आल्यावर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार ‘रोसो कॅफे’ म्हणून त्यांनी सुरुवात केली. कल्याणमध्ये त्यांनी २०१५ साली कॅफेला सुरुवात केली. ‘कॅफे कन्सेप्ट’ सुरू करणारे महेश पहिले मराठी व्यावसायिक होते. कल्याणमध्ये तोपर्यंत ‘कॅफे’ ही कन्सेप्टच लोकांना माहीत नव्हती. ‘कॅफे’ म्हणजे कॉफी, चहा मिळण्याचे ठिकाण, अशीच लोकांची धारणा आहे.
 
 
‘फूड कन्सेप्ट’ महेश यांनी सुरू केली. त्यामध्ये इटालियन, मेक्सिकन, नाचोस यांचा समावेश होता. कोरोनाकाळात महेश ज्या ठिकाणी ‘कॅफे’ चालवित होते, त्या ठिकाणी मालकाने कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना पुन्हा जागा शोधण्यापासून सुरुवात करण्याची वेळ आली. त्यांना जागा शोधेपर्यंत तीन महिने गेले. पण जागा कमी असल्याने त्यांनी ‘कॅफे’चं ‘केक शॉप’मध्ये रूपांतर केले. आता कल्याणमधील फडके मैदान या ठिकाणी त्यांचा ‘केक शॉप’ सुरू आहे. ‘लॉकडाऊन’नंतर आता ‘केक शॉप’ पुन्हा सुरू केला.
तसेच ‘लॉकडाऊन’मध्ये पिझ्झा, बर्गर घरी बनवित होते. लोक फार बाहेरचे पदार्थ खात नव्हते, त्यामुळे ‘केक शॉप’ सुरू करण्यामागे कारण होते. २००० साली महेश यांच्या वडिलांची कंपनी बंद झाली होती. त्यामुळे अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण त्यांनी घेतले. पेपर टाकणे, दूध घरोघरी पोहोचविणे, अशा परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महेश वनवासी पाड्यात आता शैक्षणिक साहित्य देतात. कोरोना काळात माणुसकी म्हणून सोशल मीडियातून आवाहन करून, त्यातून ११ हजार ५०० नागरिकांना जेवणवाटप आणि ७०० कुटुंबीयांना अन्नाचे कीट वाटप केले होते. महेश यांचा व्यवसाय बंद होता. तरी त्यातून ते पुन्हा उभे राहिले. कोरोना काळात त्यांच्या पत्नी गर्भवती होत्या. त्यांच्या घरातील चौघांनाही कोरोना झाला होता. पत्नीला पाणी द्यावे, अशीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे स्वखर्चाने त्यांनी ‘लालचौकी कोविड सेंटर’च्या बाहेर एक महिना पाणीवाटप केले.
 
 
महेश हे पर्यावरण आणि पक्षिमित्र म्हणून गेल्या दहा-बारा वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांच्या घरच्या बाहेर नैसर्गिक वातावरण होते. त्यामुळे घराबाहेर विविध प्रकारचे पक्षी, चिमण्या येत असत. महेश शाळेतून घरी आल्यानंतर दुपारच्या झोपेच्या वेळी चिमणीच्या चिवचिवाटाने त्यांची झोपमोड होत असे. आपले बालपण चिऊ-काऊच्या गोष्टी ऐकतच सुरू असते. पण, दोन वर्षांनी त्यांना चिऊचा आवाज ऐकू येणे बंद झाले होते. या चिऊ गेल्या कुठे? असे वाटू लागले. पक्ष्यांबद्दल एक आकर्षण महेश यांना होते. पक्षी दिसत नाही म्हणून शिक्षकांशी ते बोलले. मग मोबाईल टॉवरमुळे त्यांच्या प्रजननावर परिणाम होतो, हे त्यांनी सांगितले. कॉलेजमध्ये आल्यावर मित्रांशी बोलून त्यांनी काय करता येईल, असा विचार केला. सुरुवातीला कल्याणमध्ये वाडा संस्कृती होती.
 
सिमेंट काँक्रीटच्या जंगलाची सुरुवात झाली. जंगलतोड सुरू झाली आणि त्यांमुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली. शहरात शोभेची झाडे खूप आहेत. देशी झाडे नसल्याने पक्ष्यांना फळे, फुले मिळत नाहीत. तिथूनच पर्यावरण वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी शाळाशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. चौकात जनजागृती केली. जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. प्रत्येक सण हा निसर्गाशी जोडला गेला आहे. दसर्‍याला आपट्याची पाने तोडतो. ती झाडे पुन्हा लावली गेली पाहिजे. लोकांमध्ये त्यांच्याविषयी जनजागृती केली. एखादा पक्षी जखमी सापडला, तर त्याला ‘रेस्क्यू’ करून घरी आणण्याचे ते काम करतात. त्यांच्यावर औषधोपचार करतात. डॉ. धर्मराज रायबोले हे त्यासाठी स्वत:चे शुल्क घेत नाहीत. औषधोपचार संस्थेला करावे लागत आहेत.
 
 
सर्पमित्र दत्ता बोंबे हे त्यांना मदत करतात. ‘इको ड्राईव्ह यंगस्टार्स’ या संस्थेच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. यंदाच्या दिवाळीत अजून तरी पक्षी जखमी झाल्याचे फोन आले नाहीत. दिवाळीनंतर एका आठवड्याने फोन यायला सुरुवात होते. पक्ष्यांच्या डोळ्यावर किंवा डोक्यावर रॉकेट फुटले आहे. पक्षी जखमी झाले आहेत, असे फोन महेश यांना येतात. पक्षी बरा झाल्यावर त्याला पर्यावरणात सोडले जाते. गवत कुठे असल्यास फटाके फुटून इतर ठिकाणी जाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे वणवा पेटण्याची शक्यता असते. रॉकेटमुळे ते परिणाम जास्त जाणवतात. फटाक्याच्या आवाजाने इतर पक्षी आणि प्राणी स्थालांतर करतात. त्यांना आवाजाचा त्रस होतो. मागील दिवाळीत कोरोनामुळे फारसे कुणी फटाके फोडत नसल्याने दोन पक्षी जखमी भेटले होते. पण, दोन वर्षांपूर्वी दहा ते १२ पक्षी आणि प्राणी जखमी भेटले होते. कोरोनामुळे मागील वर्षी जखमी प्राणी व पक्ष्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे.

अनाथ आणि वयोवृद्धांसाठी काहीतरी करण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाची धडपड अनेक जण करीत असतात. पण, परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. तसेच, अनाथ आणि वृद्धांसाठी एखादी वास्तू तयार करण्याची धडपड सुरू आहे, असे महेश सांगतात. पर्यावरण वाचविण्यासाठी धडपडणार्‍या या अवलियाला दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.



@@AUTHORINFO_V1@@