मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील एक महान 'कोच' (प्रशिक्षक) म्हणून प्रसिद्ध असलेले तारक सिन्हा यांचे शनिवारी ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ७१ वर्षीय तारक सिन्हा हे भारतीय क्रिकेटला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या तब्बल १२ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच, त्यांचे १००हुन अधिक विद्यार्थी हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. त्यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तारक सिन्हा यांना त्यांच्या अमूल्य कामगिरीबद्दल द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले रिंदर खन्ना, रंधीर सिंह, रमन लांबा, मनोज प्रभाकर, अजय शर्मा, केपी भास्कर, अतुल वासन, आशीष नेहरा, संजीव शर्मा, आकाश चोप्रा, शिखर धवन आणि ऋषभ पंत हे १२ खेळाडू भारतीय संघाकडून खेळले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीनं १९८५-८६ साली रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती.
पुरुष क्रिकेटच नव्हे तर महिला क्रिकेटमध्येही तारक सिन्हा यांनी अनेक खेळाडूंना घडवले आहे. महिला क्रिकेटमध्ये अंजूम चोप्रालाही त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्याचबरोबर २००१-०२ या कालावधीत ते भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.