नगरमध्ये जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये भीषण आग

आग विझवण्याचे काम सुरु असताना १० जण दगावल्याची भीती

    06-Nov-2021
Total Views |

ahmednagar_1  H
मुंबई : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. यावेळी विभागात जवळपास १७ जण असल्याची माहिती देण्यात येत आहे. ही आग आटोक्यात येईपर्यंत या विभागात उपचार घेत असलेले १० रुग्ण दगावल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच इतर रुग्ण जखमी झाले असून त्यांना पुण्यात हलवण्यात आले आहे.
 
 
जिल्हा रुग्णालयात असलेला अतिदक्षता विभाग रुग्णालयाच्या अत्यंत मध्यभागी आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आयसीयूमध्ये १७ रुग्ण उपचार घेत होते. शनिवारी सकाळी या विभागात आग पसरल्याने रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि धावपळ सुरु झाली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. बचावकार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे तसंच आगीमुळेही गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. . या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे होरपळून झाला की गुदमरुन झाला याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसंच मृतांच्या परिवाराला आवश्यक ती मदत केली जाईल.
 
 
 
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले की, मी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून मी काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होती. जे कोणी या घटनेमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तसंच मृतांच्या परिवाराला मदत देण्यात येणार आहे." आग लागल्यानंतर रुग्णालयात नर्स, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांनी रुग्णांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र चौकशीअंती आगीचं नेमके कारण समोर येईल.