...फटाकेबंदीआधी

    04-Nov-2021
Total Views |

SC_1  H x W: 0
 

सगळ्या सुधारणा फक्त हिंदूंनाच करायला सांगितल्या जातात. अन्य धर्मीयांनी कितीही विचित्र वर्तवणूक केली तरी त्यावर कोणी शब्दही उच्चारत नाही. नववर्ष, नाताळमध्येही फटाके वाजवले जातात, पण आज दिवाळीतील फटाक्यांवर तुटून पडणारे तेव्हा कधीही तोंड उघडत नाहीत.



सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान फटाक्यांवर सरसकट बंदी घालणार नसल्याचा निर्वाळा दिला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने प्रदूषणाचे कारण देत दि. १ जानेवारी, २०२२ पर्यंत सर्वप्रकारच्या फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला होता, त्यालाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांचा मुद्दा अस्थायी असून प्रदूषणाचे मुख्य कारण पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांद्वारे केले जाणारे शेतातील पालापाचोळ्याचे दहन असल्याचे म्हटले. अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती रोशनी अलीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमध्ये दिवाळी/कालिपूजेवेळी फटाक्यांवर बंदीचा आदेश दिला होता. त्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेली. त्यावरही सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत कोलकाता उच्च न्यायालयाचा फटाकेबंदीचा आदेश रद्द केला.
 
 
 
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने समाधान न झाल्याने आपण पुन्हा एकदा कोलकाता उच्च न्यायालयात फटाकेबंदीसाठी याचिका दाखल करणार असल्याचे रोशनी अलीने म्हटले आहे. अन्य काही राज्यांनीही आपापल्या अधिकार कक्षेत फटाक्यांवर निर्बंध, नियम वगैरेंचे निर्णय घेतलेले आहेत. तसेच विविध बहुराष्ट्रीय कंपन्या, चित्रपट तारे-तारका आणि क्रिकेटपटूंनीही फटाक्यांवरून हिंदूंना ज्ञान पाजळण्याचे उद्योग केलेले आहेत. म्हणजेच दिवाळी आली की, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी फटाक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे आणि त्याविरोधात शासकीय स्तरावर, न्यायालयाच्या उंबरठ्यावर जाऊन आणि वैयक्तिक पातळीवर बोंबाबोंब करण्याचे प्रकार सुरू आहेत. पण, फटाक्यांच्या प्रश्नाकडे केवळ, आले मनात, केली मागणी आणि दिला बंदी आदेश या स्तरावर पाहता येणार नाही. फटाक्यांच्या मुद्द्यावर याहीपलीकडे जाऊन विचार करावा लागेल.
 
 
 
फटाक्यांच्या धुराने हवा आणि आवाजाने ध्वनिप्रदूषण होत नाही, असे नाही. दिवाळीत देशभरातील महानगरांतील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असता, त्यात अनेक विषारी वायूंचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर आणि आवाजाची तपासणी केली असता ध्वनिप्रदूषण १५० ते १७५ डेसिबलच्या पातळीवर गेल्याचेही अनेक सर्वेक्षणांतून समोर आलेले आहे. उल्लेखनीय म्हणजे, फटाके हिंदू वा भारतीय संस्कृतीचा प्रथमपासूनचा भाग नाहीत. संदर्भासह उपलब्ध माहितीनुसार भारतात 15व्या शतकात फटाक्यांचे आगमन झाले आणि त्यानंतर त्यांचा वापर दिवाळी, शुभकार्यातही केला जाऊ लागला. म्हणजेच, बदलत्या काळानुसार नव्याचा स्वीकार इथल्या जनतेने केला. त्याच धर्तीवर फटाके वाजवण्यात काही चुकीचे वाटत असेल, तर थेट बंदीऐवजी काळानुरुप दुरुस्त्या, सुधारणांचा विचार केला पाहिजे. त्यात विषारी व घातक रसायनांचा वापर करुन तयार केल्या जाणाऱ्या फटाक्यांऐवजी पर्यावरणपूरक फटाक्यांना अधिकाधिक उत्तेजन देता येईल. अर्थात, व्यापक स्तरावर त्याची निर्मिती आणि प्रसाराला वेळ लागेलच.
 
 
 
दरम्यान, अमेरिकेत घातक आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आहे, तिथे केवळ शोभेचे, विनाआवाजाचे फटाके वाजवण्याची परवानगी आहे आणि त्यासाठीही परवाना घ्यावा लागतो. आवाज करणारे फटाके वाजवायचे असल्यास त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. त्यावेळी अन्य कोणालाही धोका होणार नाही, अशा ठिकाणी मानवी वस्तीपासून दूर फटाके वाजवण्याची परवानगी दिली जाते. तसेच संबंधित ठिकाणाजवळ अग्निशमन दलाच्या उपस्थितीची खबरदारी घेतली जाते. असे काही उपाय योजले तर फटाक्यांची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. तसेच यासाठी व्यापक स्तरावर जनजागृतीचे कामही केले पाहिजे, पण जमिनीवर उतरुन, समाजात मिसळून. शासनाने निर्णय घेऊन, न्यायालयाने आदेश देऊन वा नट-नट्यांनी, क्रीडापटूंनी उंटावरून शेळ्या हाकून फटाक्यांचे प्रमाण कमी होणार नाही. कारण, हा मुद्दा पुन्हा पुन्हा समोरच्या बाजूकडून उचललाच जाणार. म्हणूनच यासाठी न्यायालयात जाणाऱ्या रोशनी अली वा इतरांना आपला थाट सोडून समाजसुधारकाची भूमिका आत्मसात करावी लागेल.
 
 
 
भारतात पूर्वापार चालत आलेल्या सतीप्रथा, केशवपन, हुंडा वगैरे वाईट वा चुकीच्या गोष्टी बदलल्या त्या समाजसुधारकांमुळेच, त्यांनी समाजमैदानात उतरून केलेल्या जनजागृतीमुळे, त्यासाठी स्वतः केलेल्या कृतींमुळे. त्यासाठी त्यांनी प्रसंगी अपमान, बेइज्जती, तिरस्कार, घृणा, द्वेष, मारहाण असे सर्वकाही सहन केले. ते सहन करण्याची मानसिकता आता जाहिराती वा समाजमाध्यमांतून फटाक्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये आहे का? तसेच, सगळ्या सुधारणा फक्त हिंदूंनाच करायला सांगितल्या जातात. अन्य धर्मीयांनी कितीही विचित्र वर्तवणूक केली तरी त्यावर कोणी शब्दही उच्चारत नाही. नववर्ष, नाताळमध्येही फटाके वाजवले जातात, पण आज दिवाळीतील फटाक्यांवर तुटून पडणारे तेव्हा कधीही तोंड उघडत नाहीत. मुस्लिमांमध्ये तर अनेकानेक कुप्रथा अजूनही दिसून येतात आणि त्याचा जाच इतरांनाही होतो, त्यावरही कोणी आवाज उठवत नाही. म्हणूनच धर्म पाहून केला जाणारा निवडक विरोध जोपर्यंत सुरू राहील, तोपर्यंत संबंधितांचे मुद्दे स्वीकारलेही जाणार नाहीत.
 
 
 
 
दरम्यान, फटाक्यांची समस्या हाताळताना त्यात गुंतलेल्या कामगारांचे, त्यांच्या रोजगाराचे काय? आज देशातील फटाके उद्योग पाच हजार कोटींवर पोहोचला असून त्यात प्रत्यक्ष पाच लाख कामगार काम करतात, तर फटाके विक्री करणारे लाखो विक्रेते आहेत. फटाक्यांवर बंदी घालताना इतक्या मोठ्या प्रमाणावरील कामगार काम करणार काय आणि जगणार कसे? वर्षभर झोपलेल्या आणि दिवाळीच्या आधी जागे होत फटाक्यांवर सरसकट बंदीची मागणी करणाऱ्यांनी यावर काही उपाय शोधला आहे का? फटाके उद्योगातील कामगारांना अन्य उद्योगांचा पर्याय देता येईल, हे खरेच पण त्या कामगारांना तसे कौशल्य प्रशिक्षणही द्यावे लागेल, त्यासाठी यंत्रणा उभी करावी लागेल. त्यानंतर फटाके बंदी वगैरेचा मुद्दा येऊ शकतो. तसेच, बंदी घालूनही फटाके वाजणारच नाहीत, याची काय खात्री? कारण, बंदीपेक्षा नियमन केले पाहिजे, असे फटाक्यांना विरोध करणाऱ्या विचारधारेच्या लोकांचे अन्य विषयांत मत असते. तसेच यदाकदाचित फटाक्यांवर बंदी घातलीच, तर देशांतर्गत फटाक्यांचे उत्पादन होणार नाही. त्याचवेळी भारतीय बाजारात चिनी फटाके येणार नाहीत ना, याचाही विचार केला पाहिजे. असे सर्व मुद्दे फटाक्यांशी संबंधित आहेत आणि त्यावर योग्य ते समाधान निघाल्यानंतरच पुढची पावले उचलता येतील.