प्रेरणादायी प्रज्ञा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2021   
Total Views |


MANSA_1  H x W:


अंगभूत प्रतिभेला समाजसेवेची जोड देत सकलजनांना प्रज्ञावंत करणार्‍या बहुआयामी लेखिका, कवयित्री, निवेदिका प्रज्ञा पंडित यांच्याविषयी...


मूळच्या ठाण्याच्या असलेल्या प्रज्ञा यांची आई गृहिणी, तर वडील खासगी कंपनीमध्ये होते. प्रज्ञा यांनी शालेय शिक्षण ‘शिवसमर्थ विद्यालया’त घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण जोशी-बेडेकर महाविद्यालयातून पूर्ण केले. प्रज्ञा यांना वाचनाची आवड तशी लहानपणापासूनच. त्यांचे आजोबा जी. डी. कासार पोलीस विभागात कार्यरत होते. तसेच ठाणे नगर वाचन मंदिर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळातही ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यामुळे वृत्तपत्रे, पुस्तके यांचा गृहप्रवेश तसा दैनंदिनच. तसेच त्यांचे वडील, आत्याही तितकेच वाचनानुभवी. त्यामुळे साहजिकच वाचनाचे संस्कार प्रज्ञा व त्यांच्या भावंडांवरही झाले. माहेर जितके वाचनसमृद्ध तसेच सासरही प्रज्ञा यांना लाभले. त्यांच्या सासूबाई माधवी पंडित आणि मामे सासरे अनंत खाडिलकर हे मुरलेले लेखक. अनेक गद्य-पद्य लेखन त्यांनी केले आहे.



अनेक ठळक वृत्तपत्रांतून प्रासंगिक लेख, सदरं लिहिण्यापासून झालेली त्यांच्या लेखन प्रवासाची सुरुवात आज विविध विषयांवरील स्वलिखित पुस्तकांपर्यंत येऊन ठेपली आहे. विविध विषयांवरचे लेख, शोधनिबंध, कथा आणि कविता असे अनेक साहित्यिक प्रकार त्यांनी हाताळले. ’व्यक्त अव्यक्त’, ’प्रज्ञाक्षरे’, ’काव्य लिपी’ हे काव्यसंग्रह, ’बाबा’ हा संकलित कवितांचा संग्रह, ’ऐसी अक्षरे रसिके’ हा पुस्तक परीक्षण संग्रह, ’इंग्रजी माझ्या खिशात’ हे इंग्रजी संभाषण कला अध्ययन विषयक पुस्तक, ’मुलाखतीची गुरुकिल्ली’ हे ‘इंटरव्ह्यू’च्या तयारीचे मार्गदर्शन करणारे पुस्तक आणि ’भारतीय खाद्य संस्कृती’ हे भारतातील विविध खाद्य संस्कृतींची ओळख करून देणारे माहितीपर पुस्तक अशी त्यांची ग्रंथसंपदा वाचकांच्या पसंतीसही उतरली. त्यांच्या ’व्यक्त अव्यक्त’ या पहिल्याच काव्यसंग्रहाला ठाण्यातील प्रतिष्ठित ’यमुनाबाई बाजी राणे साहित्य पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. त्यांच्या साहित्यसंपदेची दखल घेत नुकतेच त्यांना ‘साहित्य संगम प्रतिष्ठान’तर्फे आधार दशरथ पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२१ ‘साहित्य गौरव पुरस्कार’ देऊनही सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित आणि नवोदित कवींना व्यासपीठ मिळावे, याच उद्देशाने त्यांनी ’ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन’ची स्थापनादेखील केली आहे. त्याअंतर्गत विविध प्रकारचे साहित्यिक उपक्रम राबवले जातात. स्वतः उत्तम निवेदिका असल्याने या कार्यक्रमांचे निवेदनही त्या करतात. कविता सादरीकरण, पुस्तक वाचन, स्तोत्र पठण, वक्तृत्व, निवेदन या विषयावरील अनेक कार्यशाळांचेही त्या आयोजन करतात. तसेच तरुणांसाठी आत्मविश्वास वर्ग आणि मुलाखत कार्यशाळाही त्या राबवतात. आजच्या तरुणाईचा ‘ऑनलाईन’ माध्यमांकडे असलेला कल ओळखून त्यांनी ‘ऑनलाईन’ कार्यशाळांनाही सुरुवात केली. तसेच ’लेहर’, ’क्लब हाऊस’ यांसारख्या समाजमाध्यमांवर होणार्‍या अनेक चर्चासत्रांमध्ये ‘निमंत्रित वक्ता’ म्हणून प्रज्ञा आवर्जून सहभागी होतात.




कोरोना काळात ‘लॉकडाऊन’ दरम्यान त्यांनी ‘कोविड’ लसीकरण केंद्रांची माहिती देणे, जनजागृती, समुपदेशन अशा अनेक आघाड्यांवर काम केले. याच काळात शिक्षणाचे एक नवीन पर्व सुरू झाले. यामुळे शहरी, ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना अनेक आव्हाने, अडचणींचा सामना करावा लागला. म्हणूनच, ‘ऑनलाईन’ माध्यमातून ‘एमसीक्यु’ पद्धतीने परीक्षा कशी द्यावी, याबद्दल अनेक मोफत मार्गदर्शनपर ‘ऑनलाईन’ शिबिरे प्रज्ञा यांनी घेतली आणि राज्यभरातील विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदवला. ‘कोविड’ काळात, सर्वच जण घरात अडकले असल्यामुळे कौटुंबिक, वैयक्तिक मानसिक स्वास्थ्य संबंधित तक्रारींमध्येही वाढ झाली. यासंबंधी समुपदेशन आणि मार्गदर्शनपर चर्चेसाठी ‘लेहेर’सारख्या ‘ऑनलाईन’ अ‍ॅप, समूह माध्यमातून अनेक कार्यक्रमांमध्येही प्रज्ञा यांनी हजेरी लावली.



दिवाळी तसेच अन्य सणउत्सवांच्या निमित्ताने धर्मादाय संस्था, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना मदत करताना उपेक्षितांना केलेल्या मदतीतून मनात समाधानाची पणती तेवत असल्याचे प्रज्ञा सांगतात.आपल्या मुलीचा तेजस्वीचा पहिला वाढदिवस त्यांनी अनाथाश्रमातील लहानग्यांबरोबर साजरा करून वेगळा आदर्श निर्माण केला. तेव्हा चिमुकल्यांच्या डोळ्यात दिसलेला आनंद त्यांना खूप सुखावून गेला आणि आता तर हा पायंडाच पडला असून केवळ वाढदिवसच नव्हे, तर सणदेखील त्या अनाथाश्रम, वृद्धाश्रम, स्थलांतरित होऊन रस्त्यावर आपले जीवन जगत असलेल्या उपेक्षितांसोबत साजरा करतात. दिवाळीचा संदेश देताना त्या म्हणतात की, “दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव! आपल्या आजूबाजूचा अंधार दूर करून परिसरच नाही, तर अंतर्बाह्य जीवनही प्रकाशमान व्हावे, असा संदेश दिवाळीचा उत्सव देत असतो. तेव्हा या प्रकाशाची सगळ्यात जास्त गरज आश्रमांतल्या आबालवृद्धांना आहे.”



मदतीच्या बदल्यात समोरच्याकडून काहीच मिळणार नाही, हे ठाऊक असतानाही अनोळखी गरजू व्यक्तींची त्याच्या कळत-नकळतपणे काळजी घेण्यात, सेवा करण्यात समाधान मानणारी प्रज्ञा पंडित यांच्यासारखी माणसं जोपर्यंत आपल्या समाजात आहेत, तोपर्यंत माणुसकी जीवंत राहीलच. अशा या बहुआयामी लेखिका प्रज्ञा पंडित यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!









@@AUTHORINFO_V1@@