‘कॅप्टन’ची नवीन ‘इनिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2021   
Total Views |

Captain_1  H x
अपेक्षेप्रमाणे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या ‘पंजाब लोक काँग्रेस’ या नवीन पक्षाची घोषणा केली. या पक्षाची नोंदणी, निवडणूक चिन्ह वगैरे बाबींची घोषणाही निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर केली जाईल, असेही यावेळी अमरिंदर म्हणाले. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांची समीकरणं ही कॅप्टन यांच्या नवीन ‘इनिंग’मुळे निश्चितच बदलणार असून ही निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काँग्रेस पक्षाने, गांधी घराण्याने कशी वागणूक दिली, नवज्योतसिंग सिद्धूंच्या सांगण्यावरून त्यांना कसे वारंवार अपमानित केले गेले वगैरे चर्चा यानिमित्ताने केंद्रस्थानी आहेतच. परंतु, या सगळ्या घटनाक्रमानंतर एक प्रश्न उपस्थित होतो की, अमरिंदर सिंग यांना नवीन पक्षाच्या स्थापनेपासून ते संघटनेपर्यंत, निवडणुकीच्या तोंडावर ‘पंजाब लोक काँग्रेस’ची भक्कम मोट बांधणे खरंच कितपत जमेल? हा प्रश्न उपस्थित करण्याची दोन कारणं. एक म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे वय. कारण, ते सध्या ७९ वर्षांचे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचे स्वास्थ्य त्यांना कितपत साथ देईल, ते पाहावे लागेल. दुसरे म्हणजे, कॅप्टन जरी त्यांच्या साथीला काँग्रेसमधील बरेच आमदार आणि खासदार असल्याचा दावा करत असले, तरी अद्याप त्याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. तसेच कॅप्टन यांचा पक्षांतर्गत करिश्मा आणि प्रतिमा अगदी लोकनेत्याची वगैरे नसल्यामुळे सत्ताधारी काँग्रेस फोडून या नवख्या पक्षात किती जणांची भर पडेल, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. त्यातच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब विधानसभेच्या सर्वच्या सर्व ११७ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले. शिवाय कॅप्टन खुद्द सिद्धू यांच्या विरोधात शड्डू ठोकून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे ‘सिंग विरुद्ध सिद्धू’ ही लढत ‘हायप्रोफाईल’, प्रतिष्ठेची तर ठरेलच. पण, यामुळे प्रचारार्थ कॅप्टन एकाच मतदारसंघात अडकून राहण्याची शक्यताच अधिक असून त्यांच्या नुकतचं बाळसं घेतलेल्या पक्षाला इतक्या कमी कालावधीत विजयश्री कितपत खेचून आणता येईल, हेदेखील पाहावे लागेल. तसेच भाजपबरोबर निवडणूकपूर्व जागावाटपाचा कॅप्टन यांचा ’फॉर्म्युला’ केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनामुळे पंजाबमध्ये कितपत सफल होईल, ते आगामी काळात स्पष्ट होईलच.
 

‘काँग्रेस विरुद्ध काँग्रेस’

 
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासमोर जसा पंजाबमध्ये आव्हानांचा डोंगर उभा आहे, तशाच काही संधीदेखील त्यांच्यापाशी निश्चितच चालून आल्या आहेत. तेव्हा, आव्हानांचा सामना करुन कॅप्टन निवडणुकीत अचूक संधी कशी साधतात, हे पाहणेही तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘कॅप्टन कार्ड’ पंजाबच्या निवडणुकीत दोनदा चालले असले तरी त्यामागे काँग्रेस पक्षाचा ‘हात’ होताच. मात्र, आगामी निवडणुकीपूर्वी सिंग यांना पक्षउभारणीपासून ते तिकीटवाटपापर्यंत निर्णयप्रक्रियेची सर्व धुरा एकहाती सांभाळावी लागेल. त्यातही काँग्रेस सोडून मोठ्या आशेने सिंग यांच्या तंबूत दाखल होणारे नेते-कार्यकर्ते तसेच काँग्र्रेसेतर गट अशी अंतर्गत रस्सीखेचदेखील या पक्षाला उड्डाणापूर्वीच जमिनीवर रोखू शकते. त्यामुळे पक्षाची ध्येय-धोरणे, कार्यक्रम, पंजाबी जनतेचा विश्वास जिंकण्याची रणनीती, जनतेचे प्रश्न, जाहीरनामा, पक्षाची आर्थिक गणितं या सगळ्याचा कॅप्टन यांना सांगोपांग विचार करावाच लागेल. काँग्रेसच्या तुलनेत कॅप्टन यांना जागावाटप, तिकीटवाटप यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींत निर्णय घेताना आता पूर्ण स्वातंत्र्य असले, तरी सक्षम उमेदवारांच्या अभावामुळे तिथेही सिंग यांची कसोटी लागू शकतेच. पक्ष चालवणे एकट्यादुकट्याचे काम नक्कीच नाही. तेव्हा, सिंग त्यांच्यासोबतचे विश्वासू नेते, निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी कशी उभी करतात, या त्यांच्या संघटन कौशल्यावरही निवडणुकीतील जयपराजयाची समीकरणे आकार घेतील. आजवरचा इतिहास सांगतो की, काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांनी, ज्यांनी पुढे स्वत:चा पक्ष स्थापन केला, मजबूत संघटनही उभे केले, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांच्या नशिबात आली. मग त्या आक्रस्ताळ्या ममता बॅनर्जी असतील, आंध्र प्रदेशचे काँग्रेसने दुखावलेले जगनमोेहन रेड्डी किंवा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवणारे शरद पवार. हा पूर्वेतिहास लक्षात घेता, खरंतर पंजाबमध्ये काँग्रेसलाच डोकेदुखी ठरणाऱ्या सिंग यांच्या या प्रादेशिक ‘लोक काँग्रेस’चा जन्म रोखणे गांधी घराण्याच्याच हातात होते. परंतु, पक्षातील अपरिपक्व नेतृत्व, निर्णयक्षमतेतील दिरंगाई आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून त्यांच्या खांद्यावरून गोळी झाडण्याची जुनी काँग्रेसी खोड याचाच परिपाक म्हणजे पंजाबमधील ‘काँग्रेस विरुद्ध काँग्रेस’च्या संघर्षाचा हा नवा अध्याय म्हणावा लागेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@