नाशिक : नाशिक येथे आयोजित ९४ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’वरील विविध संकटे काही कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचेच चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. दि. २६ ते २८मार्चमध्ये आयोजित असणारे हे संमेलन राज्यासह नाशिकमध्ये झालेल्या कोरोना उद्रेकामुळे पुढे ढकलले गेले. मोठ्या महतप्रयासाने आयोजकांना दि. ३ ते ५ डिसेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात यश मिळाले.
मात्र, आता दक्षिण आफ्रिकेत नव्याने आलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिएंट’च्या सावटाखाली आल्याचे प्राथमिकदृष्ट्या तरी दिसून येत आहे. राज्य शासनाने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आता नाशिक येथील साहित्य संमेलन हे केवळ ५० टक्के साहित्य रसिकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे सारस्वतांच्या मेळाव्याला आता दक्षिण आफ्रिकेतील विषाणूचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, साहित्य संमेलनाला दि. २९ नोव्हेंबरपासून विचार केल्यास अवघे ९६ तास शिल्लक आहेत. अशा वेळी हे एक नवे आव्हान आयोजकांसमोर उभे ठाकले आहे. १४ हजार आसनक्षमतेची गृहीतके लक्षात घेऊन येथे होणारी तयारी आता सात हजार रसिकांच्याच उपस्थितीत किती ‘जय्यत’ होणार हे पाहणे आता औत्सुकत्याचे ठरणार आहे.
राज्य शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार, बंदिस्त सभामंडपाच्या जागेतील संमेलनासाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम असल्याने, नाशिकच्या साहित्य संमेलनासाठीची उपस्थिती कमी राखण्यासह कोरोनासंबंधित सर्व प्रकारच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही हेदेखील आता दि. ३ डिसेंबरपासून समजण्यास सुरुवात होईल.
विशेष म्हणजे, १४ हजारांच्या क्षमतेनुसार मंडपात खुर्च्याही दाखल झालेल्या आहेत. त्यात नव्याने शासन आदेश आल्याने निर्बंधांच्या सावटाखाली व मास्कसह होणारे हे पहिले साहित्य संमेलन ठरणार आहे. त्यातच राज्य व देशभरातून साहित्य रसिक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. अशावेळी शहर व जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रौद्ररूप धारण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सह स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
याबबत आपली भूमिका स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, नागरी आरोग्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने आधीपासूनच तयारी करण्यात आलेली आहे. संमेलनाच्या स्थळावर ‘रॅपिड अॅन्टिजेन’ चाचणी करण्यासह प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझर देण्याचेही नियोजन करण्यात आलेले आहे. त्याशिवाय प्रत्येकाचे स्क्रिनिंगदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे निर्बंध जरी वाढले असले, तरीदेखील नियोजनात कोणताही मोठा बदल होणार नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
सामाजिक अंतर राखण्याच्या हेतूने १४ हजार क्षमतेच्या मांडवात आधीपासूनच सात हजार आसनक्षमतेचे नियोजन केल्याचे यावेळी आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले. ज्या व्यक्तींनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच संमेलनस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक अंतर राखणे याठिकाणी बंधनकारक असणार आहे.
‘आयर्नमॅन’स्पर्धकांमुळे चिंतेचे वातावरण
सातासमुद्रापार असलेल्या ‘ओमिक्रोन’ने नाशिक शहराचे ‘टेन्शन’ वाढविले आहे. कारण, काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत आयोजित ‘आयर्नमॅन’ या स्पर्धेसाठी नाशिकहून दोन जण सहभागी झाले होते. यामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना नाशिकमधून हा डोकेदुःखी वाढविणारा प्रकार समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा आयोजित केली जाते.
मात्र, एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही स्पर्धा नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नाशिकमधून दोन खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यातील एकानेही स्पर्धादेखील जिंकली. त्यानंतर हे दोघेही चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये परतले आहेत. मात्र, नुकताच आलेला नवा ‘व्हेरिएंट’ दक्षिण आफ्रिकेतच आढळल्याने नाशिकची चिंता अधिक वाढली आहे. स्पर्धेसाठी गेलेल्या दोघांचे ‘स्वॅब’ महापालिकेकडून तपासणीसाठी घेण्यात आले असून दोघा खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.