तिरूअनंतरपुरमः देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात असतानाच केरळमधील तब्बल पाच हजार शिक्षकांचा लस घेण्यास नकार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.केरळमधील विविध शाळांतील शिक्षकांचा यात समावेश असल्याची माहिती असून काही विशिष्ट धार्मिक संघटनांकडून लसीकरणाबाबत करण्यात आलेल्या अपप्रचारामुळे या शिक्षकांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. देशात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून काही विशिष्ट धार्मिक संघटनांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत विविध समाजमाध्यमांवर अपप्रचार करण्यात येत आहे.
या अपप्रचाराला बळी पडत केरळमध्ये हजारो शिक्षकांनी लसीकरणासाठी नकार दिल्याची माहिती आहे. या शिक्षकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. केरळमधील सुमारे पाच हजार शाळा शिक्षक आणि कर्मचार्यांनी अद्याप ‘कोविड-१९ ’ची लस घेतली नसल्याची कबुली राज्याचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी दिली.