अर्जित विद्येचा दानकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2021   
Total Views |

MANSA 2.jpg_1  
आर्थिक संपन्नतेच्या अनेक संधी असतानादेखील समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्य वेचून, त्यांच्यात ज्ञानज्योत प्रज्वलित करणार्‍या अकोले येथील डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्याविषयी...


अनिल सहस्रबुद्धे वयाच्या १८ व्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ‘मॉडर्न हायस्कूल’मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांचे आदर्श असणारे शिक्षक अनंतराव देशपांडे यांच्याप्रमाणे त्यांचे ‘विद्यावाचस्पती’पर्यंतचे सर्व शिक्षण हे ‘बहिस्थ’ पद्धतीने त्यांनी पूर्ण केले. ‘वनवासींचा वाड्.मयीन व भाषिक अभ्यास’ या विषयात त्यावेळी पुणे विद्यापीठातून ‘इंटरडीसिप्लनरी’ पद्धतीने करणारे डॉ. सहस्रबुद्धे हे एकमेव होते हे विशेष!हा अभ्यास करताना डॉ. सहस्रबुद्धे यांना जनजाती समूहासाठी काहीतरी काम करावे, असे वाटू लागले. त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तात्या बापट व दामूअण्णा दाते या संघ प्रचारकांचा सहवास डॉ. सहस्रबुद्धे यांना लाभला. त्यामुळे मनातील ऊर्मीने आता कार्याची ज्योत प्रज्वलित होण्यास प्रारंभ केला होता. त्यावेळी त्यांनी परिसरातील जनजाती समूहातील मुलांना आपल्या राहत्या घरात आश्रय देत त्यांच्या शिक्षणास चालना दिली. सध्या नोंदणीकृत असलेली व बाळासाहेब देशपांडे यांच्या प्रयत्नांतून स्थापन केलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून डॉ. सहस्रबुद्धे यांनी १९८५ पर्यंत काम केले. यानंतर डॉ. सहस्रबुद्धे यांनी अहमदनगर येथील ‘पेमराज सारडा महाविद्यालया’त प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून आपली सेवा देण्यास सुरुवात केली. त्यांच्याच कार्यकाळात या महाविद्यालयाला ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणीदेखील प्राप्त झाली. ४२ वर्षे सलग शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणार्‍या डॉ. सहस्रबुद्धे यांचे साहित्य, पर्यावरण, सेवा अशा सर्वच बाबतीत बहुमोल कार्ययोगदान राहिले आहे. आपल्यावर झालेल्या संस्करांचे श्रेय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देतात. तसेच डॉ. सहस्रबुद्धे यांची संशोधन, वैचारिक, समीक्षा, तत्त्वज्ञान, कथा, कादंबरी, नाटक, ललितगद्य अशा सर्वच प्रकारांतील सुमारे 70 पुस्तके आजवर प्रकाशित झालेली आहेत.त्यांच्या ‘लोकनिष्ठा अध्यात्मवादी’ या ग्रंथाला तत्त्वज्ञान विषयक राज्य शासनाचा ‘नांदापूरकर पुरस्कार’ मिळाला आहे. तसेच, ज्ञानेश्वरी संदर्भातील ‘लेखन कार्या’बाबत ‘कांचीपुरमपीठा’चे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी महाराष्ट्रातील ज्या नऊ विद्वानांचा सन्मान केला, त्यात डॉ. सहस्रबुद्धे यांचादेखील समावेश होता. या पंक्तीत रा. चिं. ढेरे, राम शेवाळकर आदी मान्यवर साहित्यिकदेखील होते. तसेच, त्यांच्या ‘लोकबंध’ पुस्तकाला ‘लोकसाहित्य संशोधन पुरस्कार’देखील मिळाला आहे. आपल्या ‘स्फूर्ती प्रकाशन मंच’च्या माध्यमातून ‘ग्रंथ याग’ ही संकल्पना राबवत त्यांनी सहकारी तत्त्वावर एकाच वेळी अनेक पुस्तकांचा प्रकाशन सोहळादेखील घडवून आणला आहे. ‘आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम व ‘जीवनगौरव’सह अनेक पुरस्कारांचे वितरण ते करतात. डॉ. सहस्रबुद्धे यांच्या साहित्यावर दोन ‘पीएच.डी’ झाल्या आहेत. तसेच त्यांनी अनेकांना ‘पीएच.डी’ व ‘एम.फील’साठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली आहे.




वनवासी क्षेत्रात कार्य करत असताना त्यावेळी अकोले येथे ‘मॉडर्न हायस्कूल’ येथे पहिल्यांदा शास्त्र शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले होते. येथून वनवासी विद्यार्थ्यांना सहज शिक्षण घेता यावे, त्या विद्यार्थ्यांची आबाळ होऊ नये, यासाठी डॉ. सहस्रबुद्धे यांनी निवास व भोजन व्यवस्था आपल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून निर्माण करून दिली.दुर्गम भागातील अनेक वनवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणल्यामुळे बरेच विद्यार्थी डॉक्टर, प्राध्यापक झाल्याचे डॉ. सहस्रबुद्धे सांगतात. विठ्ठल खाडे हे याच वसतिगृहाचे विद्यार्थी जिल्हा वनाधिकारी म्हणून निवृत्त झाले, तर निवृत्ती झडे या विद्यार्थ्याने आपले आयुष्य संघकार्यासाठी समर्पित केल्याचे ते सांगतात. ‘कम्युनिस्ट पार्टीचा गड’ अशी ओळख असलेल्या अकोले तालुक्यात राष्ट्रीय जाणिवा निर्माण करण्याचे कार्य सहस्रबुद्धे यांनी केले. पेशवाई अस्ताला गेल्यावर वनवासींनी केलेला पहिला स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास डॉ. सहस्रबुद्धे यांनी आपल्या ‘अहिलकुल’ या आपल्या कादंबरीच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने उजेडात आणला. त्यांच्या या कादंबरीचे प्रकाशन ‘मोतीबाग’ येथे रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या हस्ते करण्यात आले. याच कादंबरीची दुसरी आवृत्ती ‘भारतीय विचार साधना’द्वारे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.डॉ. सहस्रबुद्धे हे आता प्रवरा परिक्रमेच्या माध्यमातून साखर कारखान्यांमुळे अडचणीत आलेल्या प्रवरा नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्या साहित्यातून वनवासी संघटनांना खर्‍या अर्थाने बळ देणारे, ‘डांगणी’, ‘मातंगी’सारख्या कादंबरीच्या माध्यमातून हिंदुत्व जागृत ठेवणारे साहित्य डॉ. सहस्रबुद्धे यांनी साकारले आहे. भौतिक आणि आध्यात्मिक अभ्युदय साकारणारे साहित्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षा बाळगणार्‍या डॉ. सहस्रबुद्धे यांनी आपणांकडे असणारे ज्ञान खर्‍या अर्थाने अंत्योदयासाठी अर्पित केले. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!






@@AUTHORINFO_V1@@