दि. ३१ मार्च रोजी मुंबईतील दादर भागात राहणार्या १४ उद्योजक मैत्रिणी - श्वेता मॅकवान, सुखदा शेटे, अंकिता सकपाळ, रश्मी शानभाग, मीनाक्षी केदस, मनीषा सोळंकी, भक्ती खोत, स्वाती पोळ, नेत्रा नागेश, आरती दिवेकर, मंजिरी गद्रे, विद्या चव्हाण, नेहल सोळंकी, अश्विनी चव्हाण यांनी एकत्र येऊन ‘स्त्री उद्योगवर्धिनी, मुंबई’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्या संस्थेचा परिचय करुन देणारा हा लेख...
स्त्रीला शिक्षण, उच्चशिक्षण पूर्ण करून स्वतःचा उद्योग-व्यवसाय यशस्वीपणे उभारता यावा आणि महिला सक्षमीकरणला बळ मिळावे, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन ‘स्त्री उद्योगवर्धिनी, मुंबई’ ही संस्था वाटचाल करू लागली. भारताच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा दारुडे आणि पुरुष नसून घराघरातली काटकसरीने निगुतीने संसार करणारी घर सांभाळणारी जन्मजात ‘मॅनेजमेंट स्कील’ लाभलेली स्त्री आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास आणि प्रवर्तक असलेल्या १४ जणी मुळातच सृजनशील असल्याने सामाजिक क्षेत्रातील अनेक संस्थांचा सखोल अभ्यासाला त्यांनी सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रातल्या अनेक संस्थांची कार्यपद्धती कधी स्वतः भेट देऊन कधी इंटरनेटवर समजून घेतली. अनेक संस्थांची मर्मस्थळे समजून घेतली. त्यांच्या चुका आणि जे त्यांचे ‘वीक पॉईंट’ होते ते अभ्यासले. त्याचबरोबर प्रचंड दरारा, आवाका आणि पसारा असलेल्या सातारा बँक, ज्ञानदीप, शिवसमर्थ, कुलस्वामिनी इत्यादी पतसंस्थांच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास केला. आढावा घेतला आणि ‘स्त्री उद्योगवर्धिनी’चे औद्योगिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. ‘मुंबई सहकारी बोर्डा’च्या मदतीने ‘कंपनी कायदा १९५६ ’ आणि ‘सुधारित २०१३ ’च्या तरतुदींनुसार त्याची अंमलबजावणीही केली.
आता ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ ही ६१ उद्योजिकांचे संचालक मंडळ असलेली महिला औद्योगिक उत्पादक आणि सेवा सहकारी संस्था म्हणून उदयास आली आहे. संस्थेचे आज ९०० हून अधिक सदस्य आहेत, इतक्या कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून इतक्या उद्योजिका ‘स्त्री उद्योगवर्धिनी’च्या ध्वजाखाली एकत्र आल्या, हे त्यांच्या कार्यपद्धतीचे यश आहे.संस्थेचे मुख्य उद्दिष्ट महिला उद्योजिका घडवण्याचे आहे. नृत्यांगना, अभिनेत्री, वकील, डॉक्टर, इंजिनिअर घडू शकतात. मग उद्योजिका का नाही? पण, उद्योजिका नुसते म्हणून त्या घडत नसतात, त्यामागे प्रचंड अभ्यास कार्य करावे लागते आणि रचनात्मक कार्यपद्धती विकसित करावी लागते. ती ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ने प्रचंड मेहनतीने विकसित केली. महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत आपल्या सभासद महिलांना उद्योग- व्यवसाय उभारण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणे, त्यांना विविध परवाने शासकीय निमशासकीय योजना यांच्याबद्दल वेळोवेळी माहिती आणि मार्गदर्शन देणे, शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करणे, कायदेविषयक सल्ला केंद्र उभारणे, सभासद महिलांना शासनाकडून विविध आर्थिक आणि व्यावसायिक लाभ मिळवून देणे, औद्योगिक उत्पादन केंद्रे उभारणे, निविदा प्रक्रियांमध्ये सहभागी होऊन विविध प्रकल्प घेऊन आपल्या सभासद महिलांकडून ते पूर्ण करून घेणे, सभासद महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, तसेच विविध प्रदर्शने, ग्राहकपेठांचे वेळोवेळी राज्यात देशात आणि परदेशातही आयोजन करणे, पतसंस्था उभारून सभासद महिलांना त्यात बचत करण्यास प्रवृत्त करणे, त्यांच्या उद्योग-व्यवसायांना सुलभ कर्जप्रकियेद्वारे वित्तपुरवठा करणे, समभाग रोखे इत्यादीच्या माध्यमातून खुल्या बाजारातून भागभांडवल उभारणे, शासनाकडून विहित नमुन्यातील वेळोवेळी देण्यात येणारी इतर सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे सभासद महिलांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पत वाढावी आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा, असे लक्ष साध्य होते. टेंडर्स, उद्योजकता, प्रशिक्षण, शिबिरे, ‘मोबाईल व्हॅन प्रोजेक्ट’, ‘मेगा किचन’, ‘ट्रेंड फेअर्स’, ‘फॉरेन प्रोजेक्ट्स’, शेअर बाजार प्रशिक्षणे, ‘ट्रेडिंग’, ‘ब्रॅण्डिंग’ अशा सर्व ‘प्रोजेक्ट्स’चा शुभारंभ ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ने बांधेसूद पद्धतीने केला आहे. ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ची साधी सभासदसुद्धा पापड-लोणची कुरडयांचा उद्योग केला, तरी त्याचे ‘ब्रॅण्डिंग’ करेल, त्याला ‘कॉर्पोरेट लूक’ देऊन तो उद्योग सातासमुद्रापार घेऊन जाईल, हा विश्वास संस्थेने त्यांच्या सभासदांमध्ये रुजवला.
संस्थेने आपल्या सभासद, महिला उद्योजिकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘कल्याणी पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवांकित केले आणि भविष्यातही करत राहण्याचा संकल्प केला. संस्थेच्या सभासद महिला उद्योजिकांसाठी ‘मेगा किचन’ ही संकल्पना राबवली जात असून त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी विविध ग्राहकपेठा व प्रदर्शनांचे आयोजन संस्था नियमितपणे करत आहे. स्वामींनी ‘मोबाईल व्हॅन’ प्रकल्पाची उभारणी ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ करत आहे. महिलांसाठी विविध उद्योजकता प्रशिक्षण विकास कार्यक्रमाअंतर्गत शिबिराचे आयोजन, उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन देणारी निवासी शिबिरे आणि एकदिवसीय कार्यशाळांचे आयोजन संस्थेमार्फत लवकरच सुरू होईल, कायदेविषयक सल्ला केंद्र आणि सेतू सुविधा केंद्र उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. निविदा प्रक्रियेद्वारे अनेक प्रकल्प राबविण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. शासनाच्या अधिनियमाच्या आधारे महिला सक्षमीकरणासाठी विहित नमुन्यातील सर्व योजना ‘स्त्री उद्योगवर्धिनी’मार्फत कार्यान्वित केल्या जातील. आदर्श अशी ध्येयधोरणे आणि उपक्रम उभारण्यात आणि राबविण्यात ‘स्त्री उद्योगवर्धिनी, मुंबई’ यशस्वी झाली आहे आणि यापुढेही हे सर्व कार्य निरंतर सुरू राहील, याची ग्वाही संस्थेच्या अध्यक्ष श्वेता सरवणकर-मॅकवान आणि सर्व संचालिका आपणांस देतात. स्त्रीचा सर्वार्थाने शैक्षणिक आणि औद्योगिक विकास हेच ‘स्त्री उद्योगवर्धिनी’चे खरे उद्दिष्ट आहे आणि त्यादृष्टीने संस्था आणि तिच्या सर्व संचालिका संस्थेच्या सभासदांसोबत एक भक्कम टीम म्हणून सदैव खंबीरपणे उभ्या राहतील, हा दृढ विश्वास संस्था म्हणून ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ने महिला उद्योजिकांच्या मनात जागवला आहे.
याबाबत श्वेता म्हणतात, ”महिलाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. स्त्री शिकली प्रगती झाली, हे खरे आहे. पण, स्त्रीची आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबनही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ने हाच ध्यास घेतला आहे. कोरोना काळात अगणित कुटुंब देशोधडीला लागली. आर्थिक हलाखीमुळे लोकांचे जगणे असह्य झाले. या काळात आम्ही आर्थिक सक्षमतेचा पर्याय महिलाशक्ती आणि समाजशक्तीपुढे उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या समाजशील उद्योगी विचार कर्तृत्वाला शुभेच्छा!