बीड : परळीतील वैजनाथ मंदिरानंतर अंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिरदेखील ‘आरडीएक्स’ने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. परळी येथील वैजनाथ मंदिरानंतर अंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिरालाही अशा प्रकारच्या धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
या पत्रात म्हटले आहे की, “आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खासगी व महत्त्वाच्या कामासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील ‘आरडीएक्स’ने उडवीन,” अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे.