पहिला प्रयोग यशस्वी!

    29-Nov-2021
Total Views |

Rahul Dravid_1  
न्युझीलंडविरूद्ध ‘टी-२०’ मालिकेत निर्भेळ यश मिळविल्यानंतर भारताने कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातही चांगली कामगिरी केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. संपूर्ण सामन्यावर भारतीय संघाचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले. केवळ एका गड्याने न्यूझीलंडचा पराभव टळला. हा सामना अनिर्णित जरी राहिला तरी उत्कृष्ट कामगिरी केल्याने भारतीय संघाचे मनोधैर्य यामुळे बळावणार, हे मात्र नक्की. ‘टी-२०’ मालिकेत न्यूझीलंडविरूद्ध निर्भेळ यश मिळविले असले तरी भारतीय संघापुढे मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीचा मुख्य प्रश्न कायम होता. सलामीवीर फलंदाजांनी दमदार सुरूवात केल्यानंतरही मधल्या फळीतील फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकत नसल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश येत असल्याचे पाहायला मिळत होते. नवनियुक्त भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हा पेच सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती. परंतु, कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात संघात योग्य खेळाडूंना स्थान देत राहुल द्रविड आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी सुधारण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यरला भारतीय संघात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघाचा हा निर्णय योग्य ठरल्याचे श्रेयसच्या कामगिरीने सिद्ध केले. सलामीवीर शुभमन गिलचा अपवाद वगळता पहिल्या डावात भारतीय संघातील सुरूवातीच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. परंतु, पहिल्यांदाच कसोटीत पदार्पण करणार्‍या श्रेयसने मात्र, शतकी खेळी करत स्वतःचे कर्तृत्व तर सिद्ध केलेच. मात्र, या शतकी खेळीच्या जोरावर मधल्या फळीतील भारतीय संघाचा डावही सावरण्यात त्याने यश मिळविले. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचीही उत्तम साथ मिळाल्याने भारतीय संघाने ३४५ ही समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश मिळविले. केवळ पहिल्याच डावात नाही, तर दुसर्‍या डावातही त्याने ६५ धावांची उत्कृष्ट खेळी करत भारतीय संघाला सावरले. मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणे अपेक्षित असते. नेमकी हीच अपेक्षा श्रेयसकडून पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला, असे म्हटल्यास कदाचित ते चुकीचे ठरणार नाही.
 

पुन्हा ‘अच्छे दिन’

 
भारतीय संघाकडे एकेकाळी कसोटी संघात मातब्बर खेळाडूंची फौज होती. सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, भरोसेमंद राहुल द्रविड, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, संकटमोचक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी, फिरकीपटू अनिल कुंबळे, हरभजन सिंग, झहीर खान अशा दिग्गज खेळाडूंमुळे भारतीय संघ कसोटी क्रिकेट विश्वातील तगड्या संघांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. सलामीवीर फलंदाजांपासून ते यष्टीरक्षकापर्यंत फलंदाजांची मोठी फौज या संघात होती. परंतु कालांतराने एकामागोमाग एक हे नामवंत खेळाडू निवृत्त होऊन संघाबाहेर गेले. यानंतर कसोटी संघात असेच खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची मागणी क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. ‘दि वॉल’म्हणून ख्यातनाम असेलेले राहुल द्रविड कसोटी क्रिकेटचे ‘स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे द्रविड आगामी काळात भारतासाठी एक उत्तम अशा खेळाडूंची संघबांधणी करतील, अशी आशा तमाम भारतीय क्रिकेटपटूंकडून व्यक्त करण्यात येत आहे. द्रविड यांनी भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्याच कसोटीत नव्या खेळाडूंना संधी देत आपण मजबूत संघबांधणीच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे संकेत दिले. केवळ श्रेयसच नाही तर आगामी काळात सलामीवीर खेळाडूंपासून ते गोलंदाजांपर्यंत भारतीय संघात अनेक खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खेळाडूंनी या संधीचे सोने केल्यास आगामी काळात एक भक्कम खेळाडूंचा भारतीय संघ आपल्याला पाहायला मिळेल. संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) धरतीवर नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्याने पराभवामुळे खचलेल्या भारतीय संघाचे मनोबल उंचावणे हे प्रमुख आव्हान राहुल द्रविड यांच्यासमोर होते. न्यूझीलंडविरूद्धच्या ‘टी-२०’ मालिकेत निर्भेळ यश आणि पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा प्रतिस्पर्ध्यांवर राहिलेला वरचष्मा हे पाहता राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ आगामी काळात पूर्वीप्रमाणे उत्तम कामगिरी करेल, अशी आशा भारतातील तमाम क्रिकेटप्रेमींना आहे. भारतीय संघाचे पुन्हा ‘अच्छे दिन’ येतील यात शंका नाही.