पुणे : “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘शिवसृष्टी’चे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करणे, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शनिवारी येथे आदरांजली वाहण्यात आली.‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ आणि पुण्याच्या महापौरांच्यावतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आदरांजली सभा आयोजिण्यात आली होती. ‘गणेश कला क्रीडा मंच’ येथे झालेल्या या समारंभात पुण्यातील १२५ संस्थांच्यावतीने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, राजमाता कल्पनाराजे भोसले, शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक सुरेश जाधव, ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष प्रदीप रावत, ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘एअर मार्शल’ (निवृत्त) भूषण गोखले, ‘रिअर अॅडमिरल’ (निवृत्त) जयंत नाडकर्णी, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे यथोचित स्मारक राज्यात होणे अगत्याचे आहे, असे बाबासाहेब मानत असे. त्यातूनच त्यांनी ‘शिवसृष्टी’चे स्वप्न पाहून त्याच्या उभारणीचा ध्यास घेतला होता. त्यांच्या हयातीत ‘शिवसृष्टी’ची उभारणी सुरू झाली असली, तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. राज्य व केंद्र शासन त्यासाठी साहाय्य करेलच. तथापि, समाजाने यासाठी पुढाकार घेणे अगत्याचे आहे. समाजाच्या पुढाकारातून ‘शिवसृष्टी’ प्रकल्प पूर्णत्वास जावा,” असे फडणवीस यांनी सांगितले.एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, ‘शिवसृष्टी’ला राज्य शासनातर्फे व व्यक्तिगतरित्या सहकार्याचे आश्वासनही दिले. “बाबासाहेबांचे आमच्या घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते जेव्हा सातार्यात येत असेत, तेव्हा ते आमच्याशी संवाद साधत. त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकणे, हा विलक्षण अनुभव होता,” अशा शब्दांत राजमाता कल्पनाराजे यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. नाना जाधव यांनी संघस्वयंसेवक बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा शोकसंदेशही वाचून दाखवला.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ व ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, लेखक विजयराव देशमुख यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. “मी कामानिमित्त इंग्लंडमध्ये वास्तव्यास होतो. त्यावेळी मायदेशी परतल्यानंतर काही वेळा बाबासाहेबांशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्यासमवेत मी शनिवारवाडा पाहिला. ऐतिहासिक वास्तूही ते किती जीवंत करत, हे तेव्हा मी अनुभवले. छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांनी असाच जीवंत केला,” अशा शब्दांत डॉ. नारळीकर यांनी आदरांजली वाहिली.
पोवाडे आणि बखर या दोन साहित्य प्रकारांचा अनोखा संगम साधत बाबासाहेबांनी शिवचरित्र सांगितले. त्यामुळेच बाबासाहेब शिवशाहीर म्हणून ओळखले गेले आणि त्यांनी सांगितलेले शिवचरित्र लाखो लोकांच्या मनात रुजले, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. “बाबासाहेबांचे ‘शिवसृष्टी’चे स्वप्न सत्यात उतरवण्याचा संकल्प प्रत्येक पुणेकराने करावा,” असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले. ‘शिवसृष्टी’ची कल्पना देणारे दृक्श्राव्य सादरीकरण व बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारा माहितीपट यावेळी दाखवण्यात आला. निलेश धायरकर यांच्या शिववंदनेने सभेची सांगता झाली. ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
एक जागतिक दर्जाची ‘शिवसृष्टी’ही तयार झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
“तमाम शिवप्रेमींचे हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारीदेखील आहे की, एक जागतिक दर्जाची ‘शिवसृष्टी’ ही तयार झाली पाहिजे,” अशी भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केली. फडणवीस यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबीयांची पुण्यातील पर्वती येथील घरी जाऊन शनिवारी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांची सेवा करत करत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि विशेषत: युवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते निघून गेल्यानंतर, त्यांनी जे स्वप्न बघितले होते की, अतिशय उत्तम प्रकारची ‘शिवसृष्टी’ तयार झाली पाहिजे. ते त्यांनी हाती घेतलेले काम हे अपूर्ण आहे. हे कोणा एका व्यक्तीचे काम नाही. यासाठी संपूर्ण समाजाला उभे राहावे लागेल. आम्ही लोक आपल्यापरीने ही ‘शिवसृष्टी’ पूर्ण करण्याकरिता जी काही आमच्यापरीने मदत करता येईल, ती निश्चितपणे करू. पण मला असे वाटते की तमाम शिवप्रेमींचे हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारीदेखील आहे की, एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.