जैसे ज्याचे कर्म : तालिबान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2021   
Total Views |

tal;iban_1  H x

तालिबान्यांनी मोठ्या क्रौर्याने अफगाणिस्तानची सत्ता हडपली. मात्र, आता त्यांनाही ती पचवता येत नाही. कारण, शस्त्रांच्या जोरावर नि:शस्त्र दुबळ्या लोकांवर दहशत गाजवणे वेगळे आणि राष्ट्र म्हणून नागरिकांचे कल्याण करणे वेगळे. तसेही विकास, प्रगती आणि समाजाचे कल्याण, मानवी मूल्ये वगैरे यांच्याशी तालिबान्यांचा दुरान्वयेही संबंध नाहीच.





 त्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा करताच तेथील जनतेने केलेले भीतीपोटी पलयान, त्यांचे दु:ख, त्यांची वेदना सर्व जगाने पाहिली. सुरुवातीच्या काही दिवसांत या तालिबान्यांचे वागणे म्हणजे जणू काही ते जगजेत्ते आहेत, असेच होते. ते कसे शूर आहेत, त्यांना अपेक्षित असलेला धर्मपंथ आणि कायदा कसा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांनी अफगाण गिळले म्हणजे ते आता जगभरातसुद्धा सत्ता स्थापन करू शकतात, असा राग आळवायलाही काही लोकांनी सुरुवात केली होती. पाकिस्तान आणि आफ्रिकेतील काही मुस्लीम देशांमधील लोकांनी तर तालिबान्यांना ‘अतिरेकी’ वगैरे न म्हणता ‘लढवय्ये’ वगैरे म्हणणे सुरू केले.या सगळ्यांचा तर्क होता की, तालिबानी म्हणजे मुस्लीम धर्माला मानणारे लढवय्ये. इस्लामची खरी राजवट आणण्यासाठी त्यांनी इतका मोठा लढा पुकारला. महाबलाढ्य आणि अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या अमेरिकेला या तालिबान्यांनी धूळ चारली.अमेरिका म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे माहेरघर.पाश्चिमात्य संस्कारांना पुरून उरत तालिबान्यांनी आपली अफगाणिस्तान आणि मुस्लीम देशामधील मुस्लीम संस्कृती जपली आणि सत्तेत आणली वगैरे...
 



असो, थोडक्यात, तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तगत केली म्हणून हर्षवायू झालेला गट जगभरात होता आणि भारतातही होता. याच पार्श्वभूमीवर तालिबान्यांच्या सत्तेमुळे जगभरावर दुष्परिणाम होतील, या चिंतेत असलेले लोकही बहुसंख्य होते आणि आहेत. या सगळ्या तर्कवितर्कांच्या गदारोळात मात्र तालिबान्यांचे दिवसच बदललेले दिसतात. ‘चोराच्या घरी चोरी व्हावी’ तसे ‘तालिबानी सत्तेत.’ आता म्हणे अफगाणिस्तानमध्ये दुसर्‍या कोणी दहशतवादी संघटना क्रूर हल्ले करत आहेत. ‘आमच्या देशात दहशतवादी बॉम्बस्फोट करतात,’ असे अफगाणचे तालिबान सरकार जगाला ओरडून सांगत आहे.
आजपर्यंत तालिबान्यांनी दहशतच पसरवली. हल्ले, अपहरण, बॉम्बस्फोट यातच त्यांची खुनी कारकिर्द रंगलेली. या अशा तालिबान्यांनी ‘कुणीतरी दहशतवादी हल्ला करत आहे,’ असे म्हणून भीती दर्शवणे हे पाहून वाटते ‘जैसे ज्याचे कर्म तैसे...’ तालिबानी सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सतत बॉम्बस्फोटाची मालिका सुरू आहे. काही दिवसांपासूनचा आढावा घेऊ. आठ दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला आणि १५ जण मृत्युमुखी पडले. चार दिवसांपूर्वी एका चौकात बॉम्बस्फोट झाला आणि चार बालके मृत्युमुखी पडली. दि. २५ नोव्हेंबरलाही अफगाणिस्तानच्या राजधानीमध्ये काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला. शेकडो वाहने उद्ध्वस्त झाली. गेले कित्येक महिने या बॉम्बहल्ल्यांनी अफगाणिस्तान हादरून गेले आहे. हल्ल्यांची जबाबदारी काही दहशतवादी संघटनांनी घेतली आहे. तालिबान्यांच्या राजसत्तेला हादरवू पाहणार्‍या या अतिरेकी संघटनांचे उद्दिष्ट काय असेल? तर याचे कारण चोराच्या वाटा चोरालाच माहिती! तालिबान्यांचे अंतर्गत स्वरूप त्यांच्या दहशतीचे मार्ग वगैरे याची चांगलीच माहिती इतर दहशतवादी संघटनांना आहे. तालिबानी जर राजसत्ता उपभोगू शकतात, तर आपण का नाही, असे या दहशतवादी संघटनांना वाटत असावे. त्यातच अफगाणिस्तानमधील इस्लामच्या अंतर्गत विभागलेले वांशिक-पंथ गटही आक्रमक झाले आहेत. प्रत्येकाला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. या सगळ्या साठमारीमध्ये अफगाणी जनता खर्‍या अर्थाने भिकेला लागून रस्त्यावर आली आहे.


 
 
इतकी की, इथे आईवडिलांना आपल्या लहान-लहान मुलामुलींना विकून चरितार्थ चालवावे लागत आहे. अन्नधान्याची प्रचंड कमतरता, औषध आणि अत्यावश्यक गोष्टींची वानवा आणि देशाच्या तिजोरीत पैशांचा खडखडाट याची कमी म्हणून की काय, अफगाण सत्तेत बसलेले तालिबानी; ज्यांना राज्य चालवण्याबाबत ओ का ठो माहिती नाही. या सगळ्यासोबत दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये चालवलेलादहशतवाद. जगभर दहशतवाद माजवणार्‍या तालिबान्यांना दहशतवादाचा अर्थ आता नक्कीच समजला असेल. शेवटी जैसे ज्याचे कर्म...




 
 
@@AUTHORINFO_V1@@