उद्योगविश्वातला ‘फिनिक्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2021   
Total Views |

PAge 1 _1  H x




‘फिनिक्स’ नावाचा पक्षी जळून खाक झाला, तरी राखेतून पुन्हा आकाशात झेप घेतो, अशी दंतकथा आहे. ‘फिनिक्स’ पक्षाची कथा खरी की खोटी माहीत नाही, पण महेश सराटे मात्र उद्योगक्षेत्रातले ‘फिनिक्स’ आहेत, हे मात्र नक्की!
 
 
 
एखाद्या व्यवसायात अपयश आलं, तर व्यवसायाला कायमचं राम राम करून ’आपली बुवा नोकरीच भली’ असा विचार करणारी अनेक माणसे आपल्या अवतीभवती भेटतील. महेशने मात्र एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल १७ उद्योग-व्यवसायांत अपयश पचवलं. या १७ उद्योगांमध्ये २५ लाख रुपयांवर अधिक पैसे त्याने गुंतविले होते. ते सारे बुडाले. एक वेळ अशी आली की, आत्महत्या करावी या विचाराने कुटुंबाला आर्थिक आधार म्हणून विमा उतरवला.
 
 
 
मात्र, विम्याचा दोन वर्षांचा ‘वेटिंग पीरिएड’ होता. ती दोन वर्षे त्याने पणास लावली. पुन्हा ‘फिनिक्स’ पक्ष्याप्रमाणे निराशेच्या राखेतून त्याने झेप घेतली. आज महेश ३५० हून अधिक कुटुंबांचा आधार आहे. डबघाईस आलेल्या कंपनीस कोटींची उड्डाणे घ्यायला लावणारा हा जिगरबाज उद्योजक म्हणजे ‘वेलडन इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक महेश सराटे.
 
 
 
 
भरत सराटे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. पत्नी सुरेखा, दोन मुली मनीषा आणि मेघना, तर महेश हा मुलगा असे सराटेंचं हसतखेळत असणारं छोटंसं कुटुंब. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. भरत सराटे यांचं कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यावेळेस महेश २५ वर्षांचे होते. आपलं आभाळंच हरवलंय, ही भावना महेश यांच्या मनात दाटून आली. आता ते आई आणि दोन्ही बहिणींचे आधार झाले. किंबहुना, हे चौघे एकमेकांसाठी आधारस्तंभ झाले.
 
 
 
 
महेश यांचं बालपण ‘पार्ले बिस्कीट फॅक्टरी’ जवळच्या कोलडोंगरी परिसरात गेलं. ‘जीबीएस हायस्कूल’ आणि ‘व्हिला बेले स्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर अंधेरीच्या श्रीनिवास बगडका महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. पदवीच्या पहिल्या वर्षापासून सकाळचे वर्ग असायचे. दुपारपासून पूर्ण मोकळा वेळ होता. या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून महेशनी एका झेरॉक्स दुकानात ‘पार्टटाईम’ नोकरी सुरू केली. पगार हजार-दीड हजारांच्या आसपास होता. ही कमाई त्यांच्या आयुष्यातील पहिली कमाई ठरली. त्यानंतर त्यांनी शिक्षकांना वाजवी दरात झेरॉक्स मिळवून देण्याचं काम सुरू केलं. ते त्यांचं उद्योगविश्वातील पहिलं पाऊल ठरलं.
 
 
 
 
या व्यवसायाला पूरक म्हणून ते ‘टायपिंग’ची कामे करून देऊ लागले. ‘बुक बायन्डिंग’ हा आणखी एक त्या काळातील तेजीत असणारा व्यवसाय. हा व्यवसायसुद्धा महेशनी केला. सीएची त्याची ‘आर्टिकलशिप’ही सुरू होती. याचवेळी एका ‘अकाऊंट फर्म’मध्ये तो नोकरीस लागला. त्यातून महेशनी दत्ता बने आणि श्रीनिवास माकेला या दोन मित्रांसोबत एकत्र येऊन ‘अकाऊंटिंग फर्म’ सुरू केली. भागीदारीत सुरू केलेला महेश यांचा हा पहिला व्यवसाय. याच काळात भरत सराटे यांचे निधन झाले. घराची जबाबदारी आता जास्त वाढली होती, म्हणून महेश एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करू लागले. एक वर्ष तिथे काम केल्यावर त्यांना दुसर्‍या एका कंपनीत नोकरी मिळाली. ही कंपनी जहाजावर काम करणार्‍या कंपनीसाठी ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट’ सेवा पुरवायची. या कंपनीमध्ये नऊ वर्षे त्यांनी नोकरी केली. कंपनीच्या काही क्लाएंटसोबत त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध निर्माण झाले होते.
 
 
 
 
महेश काम करत असलेल्या कंपनीला याच क्षेत्रातील दुसर्‍या मोठ्या कंपनीने विकत घेतले. नवीन व्यवस्थापन आले आणि कुठेतरी श्वास कोंडल्यासारखे वाटू लागले. कामातलं स्वारस्यच जणू गेलं होतं. पुढे काय करायचं, काहीच ठाऊक नव्हतं. आपण नोकरी सोडण्याचा विचार करतोय, हे सांगण्यासाठी महेश एका क्लाएंटला भेटायला गेले. ते क्लाएंट त्याला म्हणाला, “तुला या क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. तू जर स्वत:चा उद्योग सुरू करणार असशील, तर मी तुला माझं काम देईन.”
 
 
 
 
जोखीम घेण्याची जणू सवय झालेला महेश या ‘ऑफर’ने जरा गांगरलेच. पण, समोरची व्यक्ती एवढा विश्वास दाखवून आपल्याला काम देतेय म्हणजे नक्कीच आपल्यात काहीतरी आहे, याची जाणीव महेशना झाली. नवीन मेहता यांच्या प्रेरणेने त्यांनी प्रस्ताव स्वीकारला. आपल्या सोबतच्या पीटर गोम्स, विशाल राऊळ, भूषण मेस्त्री, संदीप घुटुकडे, चंद्रकांत साळुंखे, सुमंत जाधव, बाजीराव पाटील या सहकार्‍यांना त्यांनी आपल्या नवीन उद्योग सुरू करण्याच्या निर्णयाविषयी सांगितले. त्या सहकार्‍यांनीही महेशसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली. क्लाएंटचा विश्वास आणि सहकार्‍यांची सोबत यामुळे महेश यांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढला.
 
 
 
 
२००९च्या डिसेंबर महिन्यात ‘वेलडन ऑफशोअर सर्व्हिसेस’ उदयास आली. सर्व काही सुरळीत सुरू झालं. खोल समुद्रामध्ये विविध गॅस कंपन्या, ‘ऑफशोअर’ कंपन्या काम करत असतात. जहाजांवर त्यांचे शेकडो कर्मचारी तैनात असतात. त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था जहाजावरच असते. काही कर्मचारी सलग २१ दिवस, तर काही सलग ४२ दिवस जहाजावर राहतात. अशा कंपन्यांना महेश सराटेंची कंपनी ‘केटरिंग’, ‘हाऊसकीपिंग’सारख्या सुविधा पुरवू लागली. ‘पेस्ट कंट्रोल’चं काम ते दुसर्‍या कंपनीला देत.
 
 
एकदा त्यांचे क्लाएंट असलेल्या सरकारी कंपनीमध्ये निविदा निघाल्याची माहिती मिळाली. ही निविदा काही लाखांची होती. ‘पेस्ट कंट्रोल’मध्ये आपण चांगलं काम करू शकतो, मग दुसर्‍या कंपनीला काम का द्यायचे, या विचाराने त्यांनी स्वत:च पेस्ट कंट्रोलची ती निविदा भरली. आवश्यक त्या नियमांची, कागदपत्रांची पूर्तता केली होती आणि ‘पेस्ट कंट्रोल’च्या कामाचे कंत्राट ‘वेलडन ऑफशोअर’ला मिळाले. अशाप्रकारे महेश सराटेंच्या अचूक आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे ‘वेलडन ऑफशोअर’ यशाची शिखरे पादाक्रांत करु लागली.
 
 
 
 
२०१४ हे वर्ष मात्र कंपनीसाठी वाईट ठरलं. नफा कमी आणि खर्च जास्त अशा समीकरणामुळे कंपनी डबघाईस आली. राहतं घर गहाण ठेवावं लागलं होतं, ही बोच मनाला महेश यांना खूप खाऊ लागली. याच ढासळलेल्या मनाने आत्महत्या करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र, कुटुंबाला आपल्या जाण्यानंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी, यासाठी महेशनी एक विमा काढला. विम्याचा ‘वेटिंग पीरिएड’ दोन वर्षांचा होता. दोन वर्षांत आपले कुटुंब आपल्या पश्चात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल, या विचाराने महेशनी आत्महत्येचा विचार दोन वर्षांसाठी पुढे ढकलला. दरम्यान, कंपनी विकत घेण्यास एकजण २० लाख रुपये घेऊन आला. २० लाख घेऊन कंपनी विकावी आणि कर्जमुक्त व्हावे, असा महेशने विचार केला. हा विचार सांगण्यासाठी महेश त्याच उद्योगपतींकडे गेले, ज्यांनी महेशना पहिली ‘ऑर्डर’ दिली होती आणि कंपनी सुरू करण्याचा सल्ला दिला.
 
 
 
 
“मी तुला पाहून माझ्या कंपनीची कामे देऊ केलेली. तुझ्याऐवजी दुसरा कोणी करणार असेल, तर मी त्या व्यक्तीला काम देणार नाही.” आता काय करायचं, असा यक्षप्रश्न महेश यांच्यासमोर उभा ठाकला. एवढी संकटे आयुष्यात येत आहेत. आपण कंपनी विकण्याचा विचार पण केला. मात्र, नियती ही कंपनी आपल्या हातून जाऊ देत नाही, तेव्हा भविष्यात काहीही होवो, आता मागे हटायचं नाही. महेशनी मनाशी निश्चय पक्का केला. आपल्या त्या क्लाएंटला हा निर्णय सांगितला. आश्चर्याची बाब म्हणजे, क्लाएंटने दोन नवीन कंपन्या सुरू केल्या होत्या. त्याची कामेसुद्धा क्लाएंटने महेश यांच्या कंपनीलाच दिली.
 
 
 
 
अशाप्रकारचे चढउतार पाहत ‘वेलडन ऑफशोअर सर्व्हिसेस’ आता ‘वेलडन इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ झाली. ‘ऑफशोअर’ ‘केटरिंग’, ‘पेस्ट कंट्रोल’, ‘हाऊसकीपिंग’, बागकाम, ‘रिक्रुटमेंट’सारख्या सेवा ही कंपनी पुरवते. ‘हल ऑफशोअर’, ‘सिमेक लिमिटेड’, ‘महानगर गॅस’, ‘एमएमआरडीए’सारख्या अनेक शासकीय संस्था, बँकांना, कॉर्पोरेट कंपन्यांना ‘वेलडन इंटिग्रेटेड’ सेवा देते. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असे एक हजारांच्या वर लोकांना ही कंपनी रोजगार देते. भविष्यात संपूर्ण भारतात कंपनीचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. या संपूर्ण उद्योजकीय प्रवासात ‘विकी फूड्स’चे मायकल गोम्स, परिवारातील अजय गवळी, राजेश गवळी यांनी वेळोवेळी साथ दिली.
 
 
 
 
२००३ मध्ये महेश सराटे यांचा विवाह नीलिमा या सुविद्य तरुणीशी झाला. सराटेंना आर्वी आणि वीरा नावाच्या गोंडस अशा जुळ्या मुली आहेत. महेश सराटे यांनी बाबांच्या स्मृती जतन करण्यासाठी ‘भरत सराटे सामाजिक संस्था’ उभारली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य ते करतात. “कोणताही व्यवसाय करताना सातत्य ठेवा. स्वत:ला पूर्णपणे व्यवसायात झोकून द्या. कितीही वाईट परिस्थिती आली, तरी हार मानू नका. नातेसंबंध जपा. प्रत्येकाशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करा.
 
 
 
 
उद्योग करण्यासाठी तांत्रिक बाजूमध्ये न अडकता मार्केटिंग कसं करता, याचा विचार करून आपला व्यवसाय वाढवावा,” असा मोलाचा सल्ला महेश सराटे उद्योजक बनू पाहणार्‍या व्यक्तींना देतात. ‘फिनिक्स’ नावाचा पक्षी जळून खाक झाला, तरी राखेतून पुन्हा आकाशात झेप घेतो, अशी दंतकथा आहे. ‘फिनिक्स’ पक्षाची कथा खरी की खोटी माहीत नाही, पण महेश सराटे मात्र उद्योगक्षेत्रातले ‘फिनिक्स’ आहेत, हे मात्र नक्की!






@@AUTHORINFO_V1@@