राज्यकर्ते भायखळ्यातील ‘पेंग्विन’च्या पलीकडे काही बघत नाहीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

rane_1  H x W:
मुंबई : “मुंबईतील राज्यकर्ते हे भायखळ्यातील ‘पेंग्विन’च्या पलीकडे काहीही बघत नाही,” अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी नुकतीच भायखळा येथे पार पडलेल्या ‘मराठी कट्टा’च्या व्यासपीठावर बोलताना केली.‘शिवसेनेचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भायखळ्यात भाजपच्यावतीने नुकताच ‘मराठी कट्टा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आ. नितेश राणे यांच्यासह मुंबई भाजपचे सचिव प्रतीक कर्पे, भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांच्यासह भाजप महिला मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाला जनतेचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. नागरिकांनी आपल्या मनातील प्रश्न आणि समस्या यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसमोर मांडल्या. यावेळी दरेकर म्हणाले की, “मुंबईतील मराठी टक्का वाढावा, यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील आहोत. मुंबईतील मराठी माणूस इथे थांबला पाहिजे. मात्र, परिस्थिती त्याला मुंबई सोडायला भाग पाडते. आज गिरगाव, लालबाग, परळ इथे मोठे टॉवर उभे राहत असताना इथला मराठी माणूस कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, अंबरनाथकडे गेला. परंतु, जिथे जिथे आम्हाला संधी होती तिथे तिथे आम्ही काळजी घेतली. इथे उपस्थित गिरणी कामगारांना विचारा त्यांना शासनाने घरे दिली.








मात्र, दहा लाखांच्या आसपासची रक्कम भरायला कुठलीही बँक यांना कर्ज देत नव्हती. कारण परतावा देण्याबाबतच्या नियमांमध्ये हे गिरणी कामगार बसत नव्हते. मात्र, मी मुंबई बँकेचा अध्यक्ष म्हणून हा विचार केला की, आठ ते दहा लाख नाहीत म्हणून हे गिरणी कामगार मुंबई सोडून निघून जातील. म्हणून मग आम्ही राज्य सरकारसोबत बैठक घेऊन ही घर भाड्याने देण्यास परवानगी द्या, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांना दहा ते १२ हजार भाडे येऊ लागले. त्यानंतर इथल्या मराठी माणसाला या गिरणी कामगारांना विनाशर्त कर्ज उपलब्ध करून दिले म्हणून इथे मराठी माणूस दिसतो आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला अशा समस्या निदर्शनास आणून द्या. एक अभियान उभारा आणि सशक्त व्हा! ‘मराठी कट्ट्या’चे प्रयोजन नितेश राणेंच्या पुढाकारातून त्यासाठीच झाले आहे,” असेही दरेकर म्हणाले.यावेळी आ. नितेश राणे म्हणाले की, “मुंबईतील मराठी माणसाला टिकविण्यासाठी किंवा गिरणी कामगारांना टिकविण्यासाठी सगळी मेहनत आमच्यावतीने होते आहे. पण फक्त मतदान करताना बटण ते चुकीचे दाबले जाते. मुंबईतील मराठी माणसाने थोडा विचार करावा, ही यानिमित्ताने आमची विनंती आहे. काही प्रश्न तुम्ही केले, आ. प्रवीण दरेकर यांनी त्याला उत्तरे दिली. यावरून लक्षात येते, मराठी माणसाला मुंबईत टिकवायचे कसे, त्यांना उभारी कशी द्यायची याचा, नियोजनबद्ध कार्यक्रम आमच्याकडे उपलब्ध आहे. पण आम्हाला अधिकार नाही. इथे आमचा नगरसेवक नाही. आमची मुंबई महापालिकेत सत्ता नाही. आमचा आमदार इथे नाही म्हणजे इथे संपूर्ण मतदान शिवसेनेला होत असेल. मात्र, अपेक्षा जर भाजपकडून ठेवत असेल तर मग आम्ही काम करायचे कसे,” असा सवाल नितेश राणेंनी केला.





यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. गिरणी कामगारांच्या समस्या, केंद्राच्या विविध योजना, कामगारांसाठीच्या योजनांची माहिती यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिली. यावेळी दरेकर म्हणाले की, “ ‘ईपीएफ’संदर्भात ऐतिहासिक निर्णय मोदींच्या कार्यकाळात घेतले गेले. महाराष्ट्रात आपले अपयश झाकून ठेवण्यासाठी केंद्राच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न रोज होतो आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात जे केले त्याची यादी मी तुम्हाला देतो. ‘मास्क’ केंद्राने दिले. ‘ऑक्सिजन’ केंद्राने दिले. ‘व्हेंटिलेटर’ केंद्राने दिले. वेगवेगळी पॅकेजेस यावेळी केंद्रांनी दिली. गरीब कल्याण निधीतून अन्नधान्य केंद्राने दिले. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने जास्तीत जास्त लसीकरण केल्याचा दावा केला. मात्र, पालिकेने एकतरी इंजेक्शन खरेदी केले का? महापालिकेने ‘ग्लोबल टेंडर’ काढले. मात्र, एकतरी इंजेक्शन खरेदी केले का? मात्र, केंद्र सरकारने लसी दिल्या म्हणून महाराष्ट्र सर्वाधिक लसीकरण करू शकले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे भाजपची केंद्रात सत्ता आहे म्हणून विरोधक जी भूमिका घेत आहेत, त्याच्यात अजिबात सत्य नाही. कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांनी कोरोनात वेगवेगळी पॅकेज दिले. मात्र, राज्य सरकारने ना संकटग्रस्त शेतकर्‍यांना ‘पॅकेज’ दिले, ना मुंबईकरांना कोणती मदत दिली. त्यामुळे या संकटकाळात जी मदत केंद्राने केली ती पंतप्रधान मोदींनी केली,” असेही ते सांगायला विसरले नाहीत.


 
 
राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांनी भाजपने यात लक्ष घालावे अशी मागणी केली. यावर उत्तर देताना आ. नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “जेव्हा नापास विद्यार्थी शाळेचा ‘मॉनिटर’ होतो तेव्हा असे सरकार तयार होते. या सरकारला शिक्षणाचे महत्त्वच कळलेले नाही. त्यांना आता ‘बार’, ‘पब’ सुरू पाहिजे, फक्त शाळा नको, ही मानसिकता तुम्ही सरकारची लक्षात ठेवा. ही मानसिकता तुमच्या विभागाच्या आमदारांची आहे, ही मानसिकता त्या आमदारांच्या पक्षाची आहे. ही मानसिकता तुमच्या पक्षाच्या नगरसेवकाची आहे. हे येत्या काळात तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. येणार्‍या हिवाळी अधिवेशनात तुमच्या या मागण्या आम्ही मांडू. मात्र, तेही अधिवेशन झाले, तर कारण मुख्यमंत्री साहेब आता बरे होत आहेत. कारण, डॉक्टरही आता त्यांचा कणा शोधत आहेत. तो एकदा मिळाला की, ते घरी येतील. मग, ते अधिवेशन बोलावतील तेव्हा मी आणि दरेकर हे प्रश्न मांडू. आज मराठी शाळेची स्थिती दयनीय आहे. गेल्या आठ वर्षांत मराठी शाळेची पटसंख्या १ लाखांहून ३५ हजारांवर आली आहे. छोट्या-छोट्या योजना तयार करतील. मग, त्या घेऊन आपल्याला गप्प बसावे लागेल. तुम्ही ज्यांना राज्यकर्ते म्हणून बसवले आहे, ते भायखळ्यातील ‘पेंग्विन’च्या पलीकडे काही बघतच नाही. माणसांपेक्षा त्या ‘पेंग्विन’ला जास्त महत्त्व आहे. कोट्यवधींच्या उलाढाली त्या ‘पेंग्विन’साठी सुरू आहेत,” असा टोलाही नितेश राणेंनी लगावला.







 
@@AUTHORINFO_V1@@