कोशिश करने वालों की हार नही होती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2021   
Total Views |

rana 2_1  H x W




मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यात ‘आयटी इनिशिएटिव्ह’ विभागाच्या प्रशासकीय अधिकारी नीलम राणा. ‘नाही रे’ परिस्थितीला ‘आहे रे’ करताना त्यांनी केलेल्या संघर्षाचा घेतलेला हा मागोवा.





मुंबईत महानगरपालिकेच्या आजघडीला एकूण १,१५० शाळा आहेत. या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आयटी क्षेत्राशी संबंधित सुविधा विकास आणि त्यासंदर्भातल्या सूचना मागवणे, त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी निविदा काढणे आणि संमत करणे हे सगळे काम मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे ‘आयटी इनिशिएटिव्ह‘ उपविभाग करते. या विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी आहेत नीलम विजय राणा. एम.ए. बी.एड उच्च शिक्षण घेतलेल्या नीलम यांना साहित्य, संगीत आणि चित्रकलेत विशेष रूची! अत्यंत कलात्मक आणि तितक्याच अभ्यासू वृत्तीच्या नीलम राणा. २०१७ सालापासून आपले काम आणि जबाबदार्‍या अत्यंत सचोटीने त्या सांभाळत आहेत. नीलम यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय प्रशासनात जबाबदारीच्या भूमिकेत असल्यामुळे समाजात त्यांना मानसन्मान आहेच. मात्र, सूर्याला दिवसा उगवण्यासाठी रात्रीच्या प्रचंड अंधारातून जावेच लागते, हा नियम यशस्वी माणसाच्या कारकिर्दीसाठीही लागू पडतोच. नीलम यांनी जसे शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेतले, तसेच जीवनाच्या शाळेने त्यांना प्रचंड अनुभव आणि शिक्षण दिले. त्यांचे वडील शिवराम ठाकूर आणि आई हिंचलू देवी ठाकूर हे मूळचे हिमाचल प्रदेश कांगडाचे दाम्पत्य. शिवराम हे मुंबईत चेंबूर येथे कामानिमित्ताने स्थायिक झाले. ते टॅक्सी चालवायचे. प्रचंड मेहनत करून त्यांनी दोन टॅक्सी खरेदी केल्या. हिंचलूदेवी या शिलाई-विणकामामध्ये तरबेज. दोघांची मोठी मुलगी रत्नी दहा वर्षांची झाली. त्यानंतर नीलम यांचा जन्म झाला. इतक्या वर्षांनी घरी बाळाचे आगमन झाले म्हणून शिवराम आणि हिंचलूदेवी दोघांचीही नीलम ही लाडाची लेक! नीलम दीड वर्षांच्या झाल्या. त्यांचा आजार बळावला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी हिंचलूदेवींकडे केवळ २० रूपये हाताशी होते. सोबत होती ती दहा वर्षांची रत्नी, दीड वर्षांची नीलम आणि पोटात दीड महिन्यांचे बाळ. उदरनिर्वाहासाठी दोन टॅक्सी होत्या. गृहिणी आणि अल्पशिक्षित हिंचलूदेवींना यासंदर्भात काहीच माहिती नसल्याने शेवटी या टॅक्सींवर दुसर्‍यांनी कब्जा केला. हिंचलूदेवी हिंमत हरल्या नाहीत. त्या शिलाईची कामे घेऊ लागल्या, तर त्यांची लेक रत्नी शिकवणी घेऊ लागली. परिस्थिती अशी की, दुपारी भाकरी खाल्ल्यावर पुन्हा रात्री काही मिळेल की नाही याची चिंता! त्यावेळी छोट्याशा नीलमला जवळ घेत हिंचलूदेवी म्हणायच्या, “मी आणि तुझी दीदी असेपर्यंत तुला कधीच उपाशी राहावे लागणार नाही.” आईचे ते शब्द छोट्या नीलम यांच्या मनात कायम कोरले गेले. आपल्याला बाबा नाहीत, आपले कसे होणार वगैरे प्रश्न, भीती तिथेच मिटली.







सहावीपर्यंत नीलम सुभाषनगर चेंबूरच्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकल्या. पुढे स्वामी विवेकांनद ज्युनिअर महाविद्यालयात शिकल्या. या सगळया शैक्षणिक वर्षात तुटेजा मॅडम आणि स्वामी विवेकानंद ज्युनिअर महाविद्यालयाचे छोटे उपाध्याय सर यांच्यामुळे नीलम यांच्या विचारात सकारात्मकता आली. हे दोघेही कायम सांगायचे की, ‘कोशिश करने वालों की हार नही होती. प्रयत्न करत राहा!” नीलम यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. पुढे वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचा होता. पण, गुणवत्ता यादीत त्यांचा क्रमांक आला नाही. मात्र, त्यांनी धीर सोडला नाही. डी.एडला प्रवेश घेतला. मोठ्या बहिणीचे रत्नीदेवी यांचे पाठबळ होतेच. डी.एडमध्ये चांगले गुण मिळाले. पण, त्यानंतर चांगली नोकरी मिळताना अनंत अडचणी आल्या. १९८९ साली पहिली शिक्षकेची नोकरी लागली. पगार होता फक्त ३०० रूपये. या सगळ्या काळात त्यांनी पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले. दोन-अडीच वर्षे खासगी शाळेत नोकरी केल्यावर त्यांना महानगरपालिकेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. याच काळात त्यांनी बी.ए, एम.ए केले. पुढे विजय राणा यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी बी.एडही केले. याच काळात ‘बीट ऑफिसर’ म्हणून एम-पूर्व, एम-पश्चिम आणि एल वॉर्डमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. गोवंडी, शिवाजीनगर कुर्ला विभाग. इथे शैक्षणिक स्तरावर उच्च अधिकारी म्हणून काम करताना नीलम यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. प्रत्येक शाळेत १० ते १५ टक्के मुले अशी होती की ती जणू तिसरी-चौथीच्या वर्गातच असावी. त्यांना साधी अक्षरओळखही नव्हती. कारण, त्यांची परिस्थिती! नीलम यांनी या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी वैयक्तिक स्तरावर सहकार्‍यांच्या मदतीने अनेक उपक्रम राबविले. गरिबीमुळे, एकल पालकत्वामुळे पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, या मुलांच्या सर्वांगीण शिक्षणाची जबाबदारी आपली आहे, असे नीलम यांचे मत! पुढे २०१७ साली नीलम यांना पदोन्नती मिळाली, ती ‘आयटी इनिशिएटिव्ह’ विभागात. संगणक, आधुनिक तंत्रज्ञान यासंदर्भात निर्णय घेण्याआधी आपणही यासंदर्भात चांगले साक्षर असायलाच हवे, यासाठी नीलम यांनी यासंबंधीचे शिक्षण घेतले.







आपल्याकडून शैक्षणिक स्तरावर घेतलेला कोणताही निर्णय अचूक व्हावा, यासाठी नीलम आजही तितक्याच प्रयत्नशील असतात. जबाबदारीचे काम असल्यामुळे तणाव आहेच. छोटेसेही दुर्लक्ष महागात पडू शकते. यासाठी नीलम नेहमी दक्ष असतात. मुंबई महानगरपालिकेच्या या तंत्रज्ञानाच्या संदर्भातील विभागात मुंबईतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्या म्हणतात, “सानपाड्याला ‘वात्सल्य ट्रस्ट’ आहे. मला अशा ट्रस्टमध्ये मुलांना शिकवायला जायचे आहे. समाजामध्ये शिक्षणाचा वारसा अजून रूजावा, मुलांमध्ये उज्ज्वल भविष्याची स्वप्ने निर्माण व्हावी, यासाठी काम करायचे आहे आणि ते मी करणार! कारण, कोशिश करने वालों की हार नही होती!









@@AUTHORINFO_V1@@