मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं रविवार, दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले. अंधेरीतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी, असा परिवार आहे. माधवी गोगटे यांनी मराठीसोबत हिंदी मनोरंजनक्षेत्रातही अभिनयाची छाप पाडली.
'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढूंढ लेंगी मंझिल हमें', 'कहीं तो होगा' 'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था' आदी हिंदी मालिकांतील त्यांच्या अभिनयाचे कौतुकही झालं. 'भ्रमाचा भोपळा', 'गेला माधव कुणीकडे' ही त्यांची मराठी नाटकं गाजली. 'घनचक्कर' या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली.
सौ माधवी गोगटे... माझी आवडती सहकलाकार : प्रशांत दामले
'गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, बे दुणे पाच, लेकुरे उदंड जाली... जवळ जवळ अडीच हजार प्रयोगात आम्ही एकत्र काम केलं. अतिशय मनमिळावू, उत्तम खणखणीत आवाज, विनोदाचे उत्तम टाईमिंग आणि उत्तम स्वभाव.. नंतर ती हिंदी सीरिअल मधे खुप बिझी झाली पण मराठी नाटकाची नाळ तुटू दिली नाही. अश्या माझ्या अतिशय आवडत्या सहकलाकाराला परमेश्वराने बोलवून घेतल. अवेळी..' , अशी प्रतिक्रीया अभिनेते प्रशांत दामले यांनी दिली.