भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ‘नाम’ या शब्दाला एक विशिष्ट स्थान आहे. ईश्वर किंवा सद्गुरुंचे नाम म्हणजे साक्षात एक कल्पवृक्ष होय. नाम म्हणजे एक श्रेष्ठ भवतारण नौका आहे. ‘नाम साधन पैं सोपे’ (नामसाधनेतील अध्यात्म आणि विज्ञान) हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. विशेष म्हणजे, या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच प.पू. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने झाले.
प्रथितयश विवेचक परमपूज्य सद्गुरु ब्रह्मलीन श्री बापट गुरुजी यांनी नामसाधनेतील तत्त्वज्ञान आणि विज्ञानाधिष्ठीत विविध पैलू उलगडताना जी विविध विवेचने केली ती प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहेत. अगदी सामान्यांना समजतील अशी दैनंदिन जीवनातली सोपी उदाहरणे, उद्बोधक गोष्टी, प्रवाही मांडणी या वैशिष्ट्यांमुळे पुस्तक संग्राह्य झाले आहे. ग्रंथाची मांडणी छोट्या छोट्या लेखस्वरूपात आहे, जेणेकरून दैनंदिन लेख वाचनातूनही सामान्य साधकाला नाम-मार्ग चालत राहण्यास, नाम-अनुसंधान ठेवण्यास प्रेरणा मिळत राहील.
नामसाधनेचे आकलन करताना गुरूजी म्हणतात, “सतत सुखाचा शोध घेणारा सामान्य माणूस, भौतिक इच्छांच्या नादी लागून, सकाम नामजप करत असतो. अशावेळी, नश्वरदेहात आणि नश्वर जगात जगताना, नामरुपी कल्पवृक्षाखाली बसून आपण अशाश्वत भौतिक सुख मागायचे की शाश्वत नामाची गोडी चाखायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.”
भरकटलेल्या जीवनयात्रेत सुखदुःखरूपी अनेक वादळे येत असतात,त्याचबरोबर खोटा अहंकार, मत्सर यामुळे अपेक्षित तप घडत नाही, त्यामुळे जीवनातील पत वाढत नाही आणि पतवाढल्याशिवाय मनुष्याची प्रत सुधरत नाही. या सगळ्यातून पैलतीरावर जाण्यासाठी साधं, सोपे, साधन म्हणजे ‘नाम’ होय.
प्राप्त कर्तव्यकर्म करत असताना, नामसाधनेबरोबर समाजसेवेचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करताना सद्गुरु श्रीबापटगुरुजी म्हणतात, “आज समाजाला मार्गदर्शन, शिक्षण, अशा अनेक प्रकारच्या सेवांची आवश्यकता आहे. नामसाधकाने, निःस्वार्थ बुद्धीने नियमितपणे आणि संकल्पपूर्वक समाजाची सेवा केली पाहिजे, तर ते नाम खरोखर सिद्ध होईल.”
शुद्ध चित्ताने, अहंकार विरहीत, सत्कर्मरत राहून केलेली ही साधी सरळ नामसाधना, मनुष्याचे मन बळकट करून त्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे नेण्याकरिता निश्चितच उपयुक्त ठरेल. हे पुस्तक www.bookganga.com या संकेतस्थळावर आणि इतर पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. इच्छुक वाचक-साधकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.
- रेश्मा फुटाणे
पुस्तकाचे नाव : नाम साधन पैं सोपे (नाम साधनेतील अध्यात्म आणि विज्ञान)
लेखक : परमपूज्य सद्गुरु ब्रह्मलीन श्री बापट गुरुजी
प्रकाशन : यज्ञेश्वर प्रकाशन, बदलापूर
पृष्ठसंख्या : 260
मूल्य : रु 280/