आभासी चलन आणि भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2021   
Total Views |

bit coin _1  H




‘व्हर्च्युअल’ चलनाला ‘आधुनिक काळातील महामारी’ म्हटले जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, ही चलने आभासी आहेत, सरकारी नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्यांच्या किमती अतिशय धोकादायकपणे चढतात आणि गडगडतातही! कोरोना काळात ज्या आभासी नियमांबद्दल कायम चर्चा होत असते, त्या चर्चेचे एक केंद्र म्हणजे ‘बिटकॉईन’सारखे ‘डिजिटल’ चलन, ज्याला ‘आभासी चलन’ असेही म्हटले जाते. आजकाल जगभरात गुंतवणुकीसाठी आभासी (क्रिप्टोकरन्सी)चा पुरस्कार काही देशांनी केलेला दिसतो.
 


 
आज ‘बिटकॉईन’सह शेकडो आभासी चलने अस्तित्वात आहेत, जी अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या नियमनाच्या कक्षेबाहेर आहेत. ‘एल साल्वाडोर’व्यतिरिक्त, जगातील इतर कोणत्याही देशाने ‘बिटकॉईन’ला अधिकृत व्यवहाराचा दर्जा आजवर दिलेला नाही. परंतु, जगभरात ज्या पद्धतीने या चलनांची खरेदी-विक्रीच्या नवा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून स्पर्धा सुरू आहे, ते पाहता, जगभरातील अर्थतज्ज्ञ आणि सरकारचे कान टवकारले आहेत.
 
 
 
 
भारतातही केंद्र सरकारने या मुद्द्यावर मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. केंद्र सरकार लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आभासी चलनाच्या नियमनाबाबत सर्वसमावेशक विधेयक मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच, माजी अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने आभासी चलनावर बंदी घालण्याऐवजी त्याचे नियमन करण्यासह त्यांचे गुण आणि तोटे यावर चर्चा केली.
 
 
 
 
मात्र, या बैठकीच्या दुसर्‍याच दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी आभासी चलनाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि या मुद्द्यावर टप्प्याटप्प्याने विचार केला जाईल, असे सांगितले. भारत हा एकमेव देश नाही, जिथे आभासी चलनाची अस्थिरता आणि परिचलन चिंतेचे कारण बनले आहे. अलीकडेच इंडोनेशियाच्या ‘नॅशनल उलेमा कौन्सिल’ने आभासी चलन ’हराम’ घोषित केले आहे. ‘व्हर्च्युअल’ चलनाच्या वर्णामध्ये अनिश्चितता, अडचणी आणि जुगार यांसारख्या घटकांचा समावेश असल्याने ते ‘हराम’ असल्याचे परिषदेने म्हटले.
 
 
 
 
चीनने यावर्षी सप्टेंबरमध्ये ‘बिटकॉईन’ आणि इतर आभासी चलनांच्या निर्मितीवर आणि व्यवहारावर बंदी घातली होती. चीनची मध्यवर्ती बँक असणार्‍या ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने म्हटले आहे की, “अशा आभासी चलनांमुळे सार्वजनिक ठेवींच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.” विशेष म्हणजे, चीन जगातील सर्वात मोठ्या आभासी चलनाच्या बाजारपेठांपैकी एक आहे, जेथे आभासी चलनामधील अस्थिरतेचा या चलनांच्या जागतिक किमतींवर अनेकदा परिणाम झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये चीनने ‘बिटकॉईन’वर बंदी घातली, तेव्हा त्या दिवशी त्याचे मूल्य दोन हजार डॉलर्सहून अधिक घसरले.
 
 
 
 
तथापि, जगाच्या इतर भागांमध्ये कोणतेही ठोस नियमन नसल्यामुळे, ‘बिटकॉईन’सारख्या आभासी चलनांचे व्यवहार अपरिवर्तित राहिले आणि त्यांच्या किमती पुन्हा वाढल्या. आज परिस्थिती अशी आहे की, लोक रातोरात श्रीमंत होण्यासाठी आभासी चलनांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. विशेषत: तरुणवर्गात याविषयीचा एक वेडेपणा दिसून येतो. याचे कारण असे की, काही प्रकरणांमध्ये आभासी चलने अवास्तव मोठ्या प्रमाणात परतावा देणारी ठरली आहेत. सर्वात लोकप्रिय आभासी चलन ‘बिटकॉईन’ची किंमत गेल्या काही वर्षांत काही डॉलर्सवरून आता साडेपाच हजार युएस डॉलर्स (सुमारे 39 लाख रुपये) पर्यंत पोहोचली आहे. 'Dogecoin', 'Ripple', 'Ethereum', 'Litecoin', 'Dash' आणि यांसारखी शेकडो आभासी चलने फक्त गुंतवणुकीसाठी लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहेत.
 
 
 
 
परंतु, आता सरकार, मध्यवर्ती बँका आणि समाजशास्त्रज्ञांची सर्वात मोठी चिंता हीच आहे की, आभासी चलनाची ही संवेदना सन 2000च्या ‘डॉटकॉम बबल’सारखी सिद्ध होणार नाही ना? जेव्हा सन 2000च्या आसपास लोकांनी संगणक आणि आयटी कंपन्यांचा वाढता व्यवसाय पाहून गुंतवणूक केली आणि नंतर बहुतेकांना नुकसान सोसावे लागले. तथापि, ‘व्हर्च्युअल’ चलनांमध्ये ‘बिटकॉईन’ची सर्वात मोठी ताकद आहे, जी मागणी आणि पुरवठा यांच्यातील नाजूक समतोल राखते. त्यांच्या निश्चित मॉडेलमुळे आणि परिसंचरणाच्या कठोर नियमांमुळे, जगात फक्त 20 दशलक्ष ‘बिटकॉईन्स’ अस्तित्वात आहेत. अशावेळी आता जागतिक बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून भारताची आभासी चलनाबाबत काय भूमिका असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



 
 
@@AUTHORINFO_V1@@