‘बेलभंडारा’ साकारताना...

    20-Nov-2021
Total Views |

Belbhandara  _1 &nbs

ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच महानिर्वाण झाले. त्यानिमित्त त्यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथ ‘बेलभंडारा’चे लेखक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांचे हे मनोगत...
 
 
त्याला आता दहा वर्षे झाली. साक्षात् छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अस्सल ‘महाराष्ट्ररसात’ सादर करून गेली ८0-८५ वर्षे विश्वभर शिवघोषाचा अवघा हलकल्लोळ करणार्‍या ‘सरस्वती’पुत्र बाबासाहेब पुरंदरे यांचं चरित्र वाचकांच्या हाती सोपावताना मनी मोठा आनंद दाटून आला होता. स्वतःलाच दिलेल्या वचनपूर्तीचा हा आनंद होता. एका गोड जबाबदारीचं ओझं वाचकांच्या खांद्यावर देण्यातला हा आनंद होता.
 
 
प्रत्यक्ष राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्यापासून आचार्य प्र. के. अत्रे यांच्यापर्यंत आणि पु. ल. देशपांडे यांच्यापासून यशवंतराव चव्हाण, नानासाहेब फाटक अशा अनेकानेक दिग्गजांनी ज्यांच्या कर्तृत्वावर कौतुकाची मोहोर उठवली, अशा अफाट शिवयोग्याचं आठवणींच्या रूपातलं हे चरित्र! एका ऋषितुल्य संशोधकाच्या, राजमातांनी गौरविलेल्या शिवशाहिरांच्या आठवणींचा हा ‘बेलभंडारा’ महाराष्ट्र देशी उधळण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका सामान्य शिवभक्ताला लाभलं याचा आनंद माझ्या मनाच्या छोट्याशा परडीत तेव्हापासून दुधासारखा ऊतू चालला होता.
 
 
सुमारे १९९७च्या सुमारास मी आदरणीय बाबासाहेबांना विनंती केली होती - “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं अद्भुत शिवचरित्र साकारलंत. तुम्ही हजारोंच्या संख्येनं जगभर शिवचरित्रावर व्याख्यानं दिलीत. ‘जाणता राजा’सारखं विश्वभरातलं दुसर्‍या क्रमांकांचं महानाट्य रंगभूमीवर आणलंत. बदलत्या काळाची साधनं तुमच्या प्रतिभेच्या अनेक चॅनल्सनी अवगत केली आणि थोरल्या महाराजांचं प्रेरणादायी चरित्र तीन-चार पिढ्यांच्या मनात पेरलंत... आजही हे काम अखंडपणे सुरूच आहे, हे भाग्य केवळ तुम्हालाच लाभलं. आता तुम्ही तुमच्या जीवनचरित्राची माहिती पुढच्या पिढ्यांना द्या. कारण, शिवचरित्राच्या चरित्रकर्त्याचा म्हणजे तुमचा जीवनप्रवास ही देखील प्रेरणेनं आणि चैतन्यानं रसरसलेल्या एका देशभक्ताच्या आयुष्याची शकावलीच आहे. पुढच्या तीन वर्षांत तुम्ही हे काम सुरू करावं, याकामी मला तुमचा साहाय्यक व्हायला आवडेल, असं हक्कानं सांगितलं. अन्यथा...”
 
 
कारण, बाबासाहेबांचा आणि आमच्या कुटुंबाचा स्नेह जिव्हाळा खूप वर्षांचा. सुमारे ५0-६0 वर्षांचा. माझ्या जन्मापूर्वीपासूनचा. माझे वडील सु. रा. देशपांडे आणि बाबासाहेबांचं मैत्र जुळलं ते शिवभक्तीमुळेच! तोच भाग्यशाली वारसा मलाही लाभला. त्याचाच आधार घेत मी वारंवार बाबासाहेबांना विनवत होतो, अगदी त्यांच्या घराण्याचे पुरोहित कवी गुरुजींसारखा - “बाबासाहेब, तुम्ही माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना ज्या ज्या आठवणी सांगता, त्या लिहिल्या गेल्या पाहिजेत. त्याला तुमचीच ऐश्वर्यवती लेखणी हवी. तुम्ही तुमच्या आयुष्याची बखर आम्हाला सांगा. पण, हेच जर लवकर साकारलं नाही, तर तुमच्याच लेखणीच्या सावलीत मला माझी लेखणी चालवू द्या, तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला मिळू दे.” बाबासाहेबांनी मला वचन दिलं. त्यावेळचा आनंद शब्दांत नाही सांगता येणार. पण, दुःख याचं होतं की, हे चरित्र, ही बखर, ही त्यांच्या आयुष्याची शकावली, हा हकीकतनामा त्यांच्या लेखणीतून साकारला नाही. ही गोड जबाबदारी मग माझ्या खांद्यावर आपसूकच आली.
 
 
तेव्हापासून सुमारे ११ वर्षे बाबासाहेबांशी बोलताना, त्यांच्याबरोबर गड-कोटांवर जाताना, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रवास करताना, त्यांची व्याख्यानं, भाषणं ऐकताना, त्यांच्या सग्यासोयर्‍यांशी बोलताना, त्यांच्याविषयी यापूर्वी जे जे लिहून आलंय त्यातलं निवडक काही वाचताना, विविध नियतकालिकांमधील त्यांच्याविषयीचा मजकूर चाळताना, जे जे समजत गेलं - उमगत गेलं ते ते कागदावर नोंदवू लागलो. हे काम किती अवघड आहे याची जाणीव होऊ लागली. पण, त्याचवेळी बाबासाहेबांच्याच आशीर्वादाने ते प्रत्यक्ष साकारण्याचाही आत्मविश्वास वाटू लागला. एकतर बाबासाहेबांचं पुण्यातलं, त्यांच्या निवासी वास्तव्य तसं कमीच, कारण अखंड भ्रमंती. पण, ते ज्या ज्या वेळी असतील, त्या त्या वेळी पहाटे चार, साडेचार, पाच वाजल्यापासून आमच्या गप्पांच्या प्रातःकालीन रागांच्या मैफिली पुरंदरे वाड्यावर रंगू लागल्या. माझे कान आणखी, आणखी ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी तहानलेलेच होते. त्यांनीही आपल्या मनीचं गूज, आपल्या व्यथा-वेदना, आपल्या काळज्या, आपला आनंद, आपली कृतज्ञता, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपले संकल्प हे सारं सारं आपल्याच मुलांना-नातवंडांना सांगावं इतक्या जिव्हाळ्यानं अन् आपुलकीनं मला सांगितलं. त्यात आडपडदा नव्हताच. आता त्यातून अधिक-उणे पाखडण्याची जबाबदारी माझी होती.
 
 
 
बाबासाहेबांसारख्या एका विश्वव्यापी, अफाट व्यक्तिमत्त्वाचं चरित्र त्यांच्याचसमोर शब्दांकित करण्याचं स्वतःहूनच घेतलेलं आव्हान अधूनमधून संकटाच्या ढुशा देऊ लागलं. मनासारखा वेळ मिळेना, मिळालाच तर शिवप्रेमींच्या दाटीमुळं मनाजोगं बोलणं होईना. दिवसच्या दिवस, तासन्तास प्रत्यक्ष कामाविनाच जात. पण, त्यावेळचं त्यांचं या विषयाबाबतचं न झालेलं बोलणंही मला बरंच काही सांगत होतं. तेही मी टिपण्याचा प्रयत्न करीत होतो. इतिहास लेखनाविषयीची एक भूमिका बाबासाहेब नेहमी मांडतात. “इतिहासात चंदनही खूप आहे आणि कोळसाही खूप आहे. आपण चंदन उगाळूया. कोळसा नको. चंदनाचा कोळसा करून उगाळण्याचा उपद्व्याप तर नकोच नको.”
 
 
शिवशाहिरांच्या आठवणींचा हा ‘बेलभंडारा’ साकारताना त्यांच्याच या भूमिकेच्या सावलीत मी वावरू लागलो. बाबासाहेबांच्या उभ्या ९0 वर्षांच्या आयुष्यात (इ. सन २0११) आनंदाचे, समाधानाचे, सुखाचे रांजण जसे भरभरून आहेत, तसेच दुःख, अपमान, अवहेलना, फसवणूक, आरोप-प्रत्यारोपांच्या काही राशी आहेतच की! स्वातंत्र्योत्तर भारतात तर हे प्रमाण जरा अधिकच! हा ‘बेलभंडारा’, हे चरित्र साकारताना मी अनेक मान्यवरांशी चर्चा करून हीच भूमिका ठरवली की, बाबासाहेबांच्या आयुष्याची प्रेरणादायी गाथा आजच्या पिढीसमोर, विशेषतः तरुणांसमोर यावी. त्यांच्या महत्त्वाकांक्षा त्यामुळं अगदी हरिटीसारख्या विस्ताराव्यात. त्यांचं आयुष्य सोनचाफ्याच्या फुलांनी बहरून यावं. तिथं निवडुंगाच्या काट्याची जाणीव असावी, पण विचारांच्या दुष्काळाची रोजगार हमी नको. याच कल्पनेनं हा ‘बेलभंडारा’ मी शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः बाबासाहेबांनी तो पाहिला आहे. आवश्यक तिथं दुरुस्त्याही केल्या आहेत. तरीही या लेखनाला काही मर्यादा आहेत, हे मी जाणून आहे. त्या मर्यादांसहित हा ‘बेलभंडारा’ मी वाचकांना सादर केलाय. त्यातलं जे श्रीमंत असेल ते अर्थातच बाबासाहेबांचं, जे उणं असेल त्याची जबाबदारी माझीच! पण, जे हाती लागलंय तेही बक्कळच आहे!
 
 
‘राजा शिवछत्रपती’ हा महाग्रंथ, ‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि अन्य ग्रंथसंपदा, तमाम शिवभक्तांना राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून देणारी त्यांची प्रेरणादायी व्याख्यानं... या सार्‍या प्रचंड खटाटोपातून त्यांनी समाजात शिवप्रेमाचं एक बीज रुजवलं. अनेक व्यक्ती, संस्था, प्रकल्पांच्या उभारणीमुळं हे बीज आज वटवृक्षाच्या स्वरूपात विस्तारल्याचं दिसतं. इतिहास संशोधक निनादराव बेडेकर म्हणतात, “मी इयत्ता दुसरीत असताना बाबासाहेबांचं ‘दख्खनची दौलत’ हे पुस्तक माझ्या हातात लागलं नसतं तर मी इतिहासाच्या अभ्यासाकडे वळलो नसतो. बाबासाहेबांची नि माझी ओळख झाली नसती तर मोडीचे आणि कागदपत्रं वाचनाचे धडे मी गिरवले नसते. दुर्ग भटकंतीदेखील कदाचित केली नसती. बाबासाहेब हे आमचं प्रेरणास्थान आहे. ते द्रोणाचार्य आहेत.”
 
 
 
बाबासाहेबांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला हा परिसस्पर्श जाणवतो. स्वतः बाबासाहेबांना तर विश्वभरातील दिग्गजांचा आत्मीय सहवास लाभला. बाबासाहेबांच्या अलौकिक प्रतिभेचा आणि वज्रलेपी शिवभक्तीचा आविष्कार तर जात, धर्म, भाषा, प्रांत, देश ओलांडून गेला आहे. प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन् यांना बाबासाहेबांचा परिचय करून देताना पं. हृदयनाथ मंगेशकर, अगदी निःसंकोचपणे लतादीदींसमोरच म्हणाले, “हे वक्तृत्वातील लता मंगेशकर आहेत.” अलिकडच्याच काही वर्षांपूर्वीची गोष्ट. उर्दू साहित्य परिषदेच्या वतीनं सय्यद आसिफ नावाचे गृहस्थ बाबासाहेबांना भेटायला आले. त्यांनी ‘जाणता राजा’ हे महानाट्य उर्दू भाषेतून साकारण्याची इच्छा व्यक्त केली. बाबासाहेबांनी आनंदानं विनाअट ती देऊन टाकली. त्याचवेळी त्यांनी बाबासाहेबांना उर्दू साहित्य परिषदेचं मानद सदस्यत्वही बहाल केलं.
 
 
 
बाबासाहेबांनी स्वतःहून स्वीकारलेल्या शिवकार्यासाठी घेतलेले अफाट कष्ट पाहिले की, हे सारं एका जन्मात कसं शक्य होईल? असं आपल्याला वाटून कदाचित नसला तरी पुनर्जन्मावरचा आपल्या मनातला विश्वास दृढ होऊ लागतो. एकदा ते नाशिकच्या वाटेवर सायकलनं प्रवास करत होते. एकटेच. मध्यरात्र झाली. शीणभार वाटल्यानं शेतातच एका झाडाला सायकल बांधली अन् राजवाड्यांची परंपरा सांभाळणारा हा संशोधक, राजमातांनी गौरवलेला हा शिवशाहीर चक्क नांगरलेल्या शेतातील माती अंगावर ओढून निद्राधीन झाला. मातीशी नातं सांगणार्‍या, महाराष्ट्ररसात शिवचरित्र सांगणार्‍या बाबासाहेबांना आपल्या मातीची ऊब अधिक जवळची वाटली. आजही वाटते.
 
 
“बाबासाहेब आपलं व्याख्यान तीन सप्तकांत गातात. म्हणूनच ते गद्यगंधर्व आहेत,” असं साक्षात् भारतरत्न पं. भीमसेन जोशी म्हणाले होते. पण, हाच नेमस्त संशोधक प्रेमळ अन् हळवा माणूस म्हणूनही आपल्याला ठायी ठायी भेटतो. ‘जाणता राजा’चे बार्शीला प्रयोग सुरू असताना दमलेल्या कलाकारांचे पाय चेपत बसणारा हा माणूस ‘बाबासाहेब’ पण विसरतो अन् आपण त्यांच्यातलं हे देवपण अनुभवून आपल्या पूर्व पुण्याईबद्दल कृतज्ञ होतो.
 
 
बाबासाहेब मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. पण, विचारांचा बुरसटलेपणा आणि संशोधकीय विचारांतर मुळातच नसल्यानं त्यांना सर्वपक्षीय, सर्व विचारधारांच्या मंडळींचा, त्या त्या विचारांच्या दिग्गजांच्या स्नेहजिव्हाळा लाभला. तो आजही कायम आहे. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माझे ज्येष्ठ स्नेही आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासात राहिलेले अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्याबाबतची बाबासाहेबांची एक आठवण इथं आवर्जून सांगण्याजोगी आहे. मूळच्या कम्युनिस्ट विचारधारेतल्या रावसाहेबांनी बाबासाहेबांची व्याख्यानमाला श्रीरामपूर इथं आयोजित केली होती. त्यावेळी अचानक एक दुय्यम वतनाचा लोकल ‘फुडारी’ व्यासपीठावर आला अन् बरळू लागला. ‘बाबासाहेबांच्या या व्याख्यानाचं उत्पन्न त्या संघाकडं जातं’ वगैरे. अजिबात विलंब न लावता रावसाहेबांनी ध्वनिक्षेपक हाती घेऊन त्या बरळणार्‍या धर्मनिरपेक्ष फुडार्‍याला सुनावलं. “ठीक आहे. ते त्यांना मान्य असलेल्या विचारांसाठी जीव तोडून काही तरी विधायक करत आहेत. तुम्ही तुमच्या विचारधारेच्या पक्षासाठी आजपर्यंत काय केलंत आणि काय करता?” अर्थातच, तो निरुत्तर झाला. पण, इथं रावसाहेबांमधील हा विचारी अन् विवेकी विचार बाबासाहेबांना भावला. आजही ते आवर्जून त्याची याद देत असतात.
 
 
बाबासाहेबांच्या अशा हजारो आठवणी आहेत. त्या अखंड आहेत. पण, ज्या मी प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकल्या, अनुभवल्या त्या बाबासाहेबांच्या तपश्चर्येला साजेल अशा पद्धतीनं वाचकांपर्यंत याव्यात अशी माझी आणि तमाम शिवभक्तांची आग्रही इच्छा होती. ती बर्‍याच अंशी पूर्ण झाली असं मला वाटतं.
 
 
- डॉ. सागर देशपांडे
 
‘बेलभंडारा’ साकारल्यानंतर बाबासाहेबांनी डॉ. सागर देशपांडे यांना लिहिलेले पत्र....


॥ श्री शक्ति ॥
 
 
॥ स्वस्ति श्री शिवराज्यशके ३३८. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सोमवार ॥
अखंडित लक्ष्मीआलंकृत विजयी भव चिरंजीव राजश्री सागरराव,
 
 
शुभाशीर्वाद,
 
विशेष तरी,
 
 
तीस वर्षं होऊन गेली. कापशीकर देशपांड्यांची पहिली पावलं पुरंदरे वाड्यात पडली आणि प्रत्यक्ष नात्यापलीकडचीही जवळीक जुळून आली. तुमच्या बाबांना एकूणच इतिहासाचा खूप छंद. त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम आणि माझ्याही शिवप्रेमाचा ओघळ एक झाला अन् आजर्‍याच्या हिरण्यकेशी नदीसारखं खळाळतं रूप या प्रवाहाला लाभलं. आपण दोन्ही घरातली माणसं तेव्हापासून सततच एकत्र येत आहोत, बोलत आहोत, बसत आहोत अन् हक्कानं रुसतही आहोत. किती प्रकारच्या गप्पागोष्टी, आठवणी, कथा आणि गाणी आपण एकत्र गायली आहेत, ऐकली आहेत. पण, मला गेल्या काही वर्षांपूर्वीपासूनच लक्षात येत गेलं की, मी जे जे काही बोललो आहे, गायलो आहे, मुसमुसून रडलो आहे आणि खळाळून हसलो आहे, ते तुम्ही तुमच्या कानातल्या आणि मनातल्या गुप्त टेपरेकॉर्डरमध्ये टिपून घेतलं आहे. कारण बेळगाव ‘तरुण भारत’च्या अंकात माझ्या संबंधातली काही ना काही आठवण, तुम्ही लिहीत आलात. न चुकता प्रत्येक अंक मी वाचला आणि आवश्यक तिथे दुरुस्तीच्या खाणाखुणाही केल्या. बर्‍याच अंकांमधील लेख वाचल्यानंतर माझ्या लक्षात येत गेलं की, सागरराव माझ्या औक्षातली शकावलीच लिहून काढताहेत. नकळत माझ्या आयुष्याची ओळख त्यामुळे चार-चौघांना होत आहे.
 
 
वास्तविक डफावर थाप मारावी आणि पोवाडा गावा असं माझ्या जीवनात कोणतंही कथानक घडलेलं नाही. मी खरोखरीच एक सर्वसामान्य, साधा माणूस आहे. विधिलिखित असेल, म्हणूनच माझा जन्म जाणत्या, जागत्या, शहाण्या आईवडिलांच्या पोटी झाला. वडिलांनी माझ्या आवडी-निवडी बहुधा माझ्या रांगत्या वयापासूनच हेरल्या असाव्यात अन् त्या हेरूनच त्यांनी माझ्यावर लक्ष ठेवलं. ते स्वतः खरोखरच चित्रकार आणि मातीचे शिल्पकार होते. त्यांनी आपल्या डोळ्यांनी आणि शब्दांनी माझ्या वाढत्या वयाला आकार दिला. विशेष म्हणजे शिकवणार्‍या शिकवणीच्या शिक्षकाची भूमिका त्यांनी कधीच घेतलेली मला आठवत नाही. घडत गेलं, ते माझ्या मातीच्या गोळ्याच्या ऐपतीनुसार आकार घेत गेलं. आज मी हा असा आहे. पुरंदरे वाड्याशिवाय बाहेरच्या जगातल्या अनेक दालनांत आणि अंगणांत मी काही पाहात गेलो, अनुभवत गेलो. अनेक गोष्टीत सहभागीही झालो. या सार्‍या आठवणी आहेत. यात कुठेही अलौकिक, असामान्य, अद्वितीय असं अजिबात काहीही नाही. तुम्ही लिहिलेल्या या सर्व आठवणी माझ्याच तोंडून वेळोवेळी मी बोललो तशाच लिहिल्या गेल्या आहेत. क्वचित कुठे तपशील किंवा नावं-गावं, नाती-गोती दुरुस्त करावी लागली. या आठवणींना पुस्तकाचा आकार देताना तुम्ही केलेली अचूक दुरुस्तीही माझ्या लक्षात आली. खूप बरं वाटलं. कमी असलं तरी चालेल पण अतिशयोक्ती नको, हा माझा प्रामाणिक स्वभाव आहे. जे घडलं ते कागदावर आलं.
 
 
 
मी माझं सविस्तर आत्मचरित्र लिहावं असं माझ्या अनेक गणगोतातील जिवलगांनी आग्रहपूर्वक म्हटलं. अगदी पुलंनी सुद्धा. पण, तो विचार आजही, अजूनही माझ्या मनात रुजत नाही. अंकूर न फुटणार्‍या वाळूच्या खड्याप्रमाणे सर्वांचे हे आग्रह तसेच भिजत पडून आहेत. आता मी ते लिहीन असं मला वाटत नाही. कारण तुमच्या या ‘बेलभंडारा’पेक्षा माझ्या जीवनात वेगळं आहेच काय? मी जे काही केलं ते टीपकागदाप्रमाणं आहे. माझी स्वतःची बुद्धिमत्ता वा प्रतिभा मला स्वतःला कुठंच जाणवत नाही. जुन्या कागदपत्रातील आणि मावळी खेड्यांपाड्यांतील लोकांची भाषा मी जरा आलटून पालटून लिहिली आहे. लिहिलं आहे ते सत्यच आहे. पण, माझं काय आहे? मी फक्त टीपकागद आहे. हा माझा विनय नाही, प्रामाणिकपणा आहे.
 
 
तुम्ही पुस्तकाला दिलेलं ‘बेलभंडारा’ हे नाव मला आवडलं. जेजुरीचा खंडेराव आणि तुळजापूरची तुळजाभवानी ही आम्हा पुरंदर्‍यांची कुलदैवतंच आहेत. तो मळवट आणि भंडारा केवळ भाळीच नाही तर काळजातल्या तळीगाळीही कायम असतो.मराठी वाचकांनी, प्रेक्षकांनी आणि श्रोत्यांनी माझ्यावर किती प्रेम केलं आणि आजही करताहेत, याचा तपशील मी वेगळा काय सांगू? समुद्रातच राहणार्‍या माशानं समुद्राचं मोठेपण कसं काय सांगायचं? मी अतिशय कृतज्ञ आहे. माझ्या वडिलांनी आळंदीला माऊलींच्या समाधीपुढे सांगितलेली एकच गोष्ट मी अखंडपणे करीत आलो आहे - मा विद्विषावहै। बहुत काय लिहिणे? घरी सर्वांना आशीर्वाद.
 
 
॥ राजते लेखनावधि ॥