‘या’ जाहिरातदारांना झालेय तरी काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2021   
Total Views |

Advertisements_1 &nb
 
 
अलीकडेच ‘फॅब इंडिया’ या कंपनीने दिवाळीनिमित्त ज्या जाहिराती केल्या, त्या ‘जश्न-ए-रिवाज’ या मथळ्याखाली केल्या. दिवाळीच्या सणासाठी आपल्या उत्पादनाच्या जाहिराती करताना ‘फॅब इंडिया’ला अन्य कोणतेच शब्द सुचले नाहीत, याला काय म्हणायचे! ‘फॅब इंडिया’ने हिंदू सणांच्या उत्सवास उर्दू रंग देण्याचा जो प्रयत्न केला, त्यास जो विरोध झाला, त्यामुळे ‘फॅब इंडिया’ने त्या जाहिराती मागे घेतल्या.
 
दिवाळीच्या निमित्ताने आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी आकर्षक जाहिराती करणे समजू शकते. पण, त्या जाहिराती करताना हिंदू समाजाचा अवमान होईल, हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावतील, अशा जाहिराती करण्याचे ‘उद्योग’ काही जाहिरातदारांकडून जाणूनबुजून केले जात आहेत. त्या जाहिरातींविरुद्ध आवाज उठविल्यानंतर अशा जाहिराती मागे घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. मागेही ‘अमेझॉन’सारख्या कंपनीने हिंदू देवदेवतांचा अवमान करणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती केल्या होत्या. पण, त्याविरुद्ध हिंदू समाजाने आवाज उठविल्यानंतर त्या जाहिराती मागे घेण्यात आल्या. असे असले तरी अधूनमधून हिंदू समाजाचा अवमान करण्याचे प्रकार घडतच असतात. अलीकडेच ‘फॅब इंडिया’ या कंपनीने दिवाळीनिमित्त ज्या जाहिराती केल्या, त्या ‘जश्न-ए-रिवाज’ या मथळ्याखाली केल्या. दिवाळीच्या सणासाठी आपल्या उत्पादनाच्या जाहिराती करताना ‘फॅब इंडिया’ला अन्य कोणतेच शब्द सुचले नाहीत, याला काय म्हणायचे! ‘फॅब इंडिया’ने हिंदू सणांच्या उत्सवास उर्दू रंग देण्याचा जो प्रयत्न केला, त्यास जो विरोध झाला, त्यामुळे ‘फॅब इंडिया’ने त्या जाहिराती मागे घेतल्या. पण, ‘फॅब इंडिया’चा कैवार घेऊन त्यांची बाजू घेणारेही या समाजात आहेत. त्यातील एक म्हणजे जावेद अख्तर. जावेद अख्तर यांना त्या जाहिरातीमध्ये काहीच आक्षेपार्ह वाटले नाही. “ ‘फॅब’च्या जाहिरातीमध्ये काहींना आक्षेपार्ह काय दिसले ते काही मला समजले नाही. ‘जश्न-ए-रिवाज’ याचा इंग्रजीमधील अर्थ ‘परंपरेचा उत्सव’ असा होतो. असे असताना त्यास आक्षेप घेण्याचे कारणच काय? आक्षेप घेणारे ‘क्रेझी’ आहेत,” असेही जावेदभाई यांनी म्हटले आहे. पण, हिंदूंच्या सणांचा आधार घेऊन आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करायला या उत्पादकांना उर्दूच शब्द सापडावेत?
 
 
 
असाच प्रकार फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या जाहिरातीमधून घडला. या फॅशन डिझायनरने मंगळसूत्रांच्या जाहिराती केल्या. या जाहिरातीमधून स्त्री आणि पुरुष यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा वापर या जाहिरातीसाठी केला होता. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या जाहिरातीस आक्षेप घेऊन २४ तासांच्या आत त्या मागे घेतल्या नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सब्यसाची मुखर्जी यांना दिला होता. सदर जाहिरातीस घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर त्या जाहिराती मागे घेण्यात आल्या. समाजातील काही घटकांना त्या जाहिराती खटकल्याने आणि त्यामुळे त्यांच्या भावना दुखविल्याने आपण त्या जाहिराती मागे घेत आहोत, असे सब्यसाची मुखर्जी यांनी जाहीर केले. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर मुखर्जी यांना चांगलाच दम दिला होता. २४ तासांमध्ये जाहिरात मागे न घेतल्यास पोलीस कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता.
सब्यसाची मुखर्जी यांच्या मंगळसूत्राच्या जाहिरातीस पालघरचे वकील आशुतोष दुबे यांनीही आक्षेप घेतला होता. या मंगळसूत्राची जाहिरात करताना अर्धनग्न मॉडेल्सचा वापर करून मंगळसूत्राची जाहिरात करण्यात आली होती. सब्यसाची मुखर्जी यांच्याप्रमाणे ‘डाबर’ कंपनीनेही अलीकडे करवा चौथ सणाच्या निमित्ताने अशीच आक्षेपार्ह जाहिरात केली होती. समलिंगी दाम्पत्य करवा चौथ साजरा करीत असल्याचे त्या जाहिरातीत दाखविण्यात आले होते. हिंदूधर्मीय काही आक्षेप घेत नाहीत म्हणून कोणत्याही थरास जाऊन जाहिराती करण्याचे हे जे प्रकार आहेत ते जागरूक हिंदू समाजाने त्वरित हाणून पाडले पाहिजेत. अलीकडे दसरा-दिवाळी सणानिमित्त काही प्रसिद्ध मराठी दागिने निर्मात्यांनी केलेल्या जाहिरातीही अशाच आक्षेपार्ह ठरतील, अशा होत्या. हिंदू सणांसाठी जाहिराती करताना हिंदू संस्कृतीनुसार वेशभूषा आणि अन्य साजशृंगार करून जाहिराती करण्यात या उत्पादकांना कसला कमीपणा वाटतो, तेच समजत नाही. हिंदू समाजाकडून हिंदू धर्म, परंपरा यांचा अवमान करणाऱ्या जाहिरातींना आक्षेप घेतला जात आहे, हे हिंदू समाज जागृत होत असल्याचे लक्षण आहे. हिंदू समाजाचा झाला एवढा अपमान पुरे झाला, आता असे प्रकार मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत, असेच हिंदू समाजाने या जाहिरातदारांना स्पष्टपणे बजावले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना खडसावले!
समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अलीकडेच लोहपुरुष सरदार पटेल यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्याशी करून, आपले डोके कसे तिरकस चालते, याचा प्रत्यय सर्वांना आणून दिला आहे. जिना यांनी देशाचे तुकडे केले. त्याउलट सरदार पटेल यांनी देशाचे ऐक्य साधले. अनेक संस्थानांचे विलीनीकरण करून सरदार पटेल यांनी देश एकसंध राखला. अशा पटेल यांची तुलना अखिलेश यादव यांनी जिना यांच्याशी करावी? “महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि मोहम्मद अली जिना हे एकाच संस्थेत शिकले. त्या संस्थेतून ते बॅरिस्टर झाले. त्या चौघांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला,” असे अखिलेश यादव यांनी भाषणात सांगितले. त्याचवेळी सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती, हे सांगण्यासही अखिलेश यादव विसरले नाहीत. अखिलेश यादव यांनी पटेल यांची जिना यांच्याशी केलेल्या तुलनेबद्दल योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली. जिना यांची मानसिकता ‘तालिबानी’ होती, तर सरदार पटेल यांनी देशाच्या ऐक्यासाठी कार्य केले होते, हे योगी आदित्यनाथ यांनी निदर्शनास आणून दिले. अजूनही आपल्या देशातील काही राजकारणी नेत्यांना मोहम्मद अली जिना यांच्यात अनेक चांगले गुण दिसतात, याला काय म्हणायचे?
त्रिपुरामधील हल्ल्याचा तीव्र निषेध
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सिबजी सेनगुप्ता यांच्यावर त्रिपुरामधील कैलाशहर येथे मुस्लीम गुंडांनी आणि ‘एनएसयुआय’ आणि तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी जो जीवघेणा हल्ला केला, त्याचा ईशान्य भारतासह देशाच्या विविध भागांतील अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि अन्य अनेक हिंदू संघटनानी तीव्र निषेध केला आहे. अभाविपच्या गुवाहाटी शाखेने गेल्या ३० ऑक्टोबर रोजी एक भव्य मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. मोहम्मद नसरुल इस्लाम आणि रुनु मिया या मुस्लीम नेत्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी सेनगुप्ता यांच्यावर हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही मुस्लीम नेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सेनगुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्रिपुरा राज्यातही निषेध मोर्चा काढण्यात आला. मदुरैमध्येही अभाविप कार्यकर्त्यांनी या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. अभाविप आणि अन्य संघप्रणित संघटनांचा ईशान्य भारतात वाढत असलेला प्रभाव सहन न होऊन, असे हल्ले केले जात आहेत हे स्पष्ट आहे. पण, असल्या भ्याड हल्ल्यांना न घाबरता संघ परिवारातील कार्यकर्ते ईशान्य भारतात राष्ट्रीय विचार रुजविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत आणि करीत राहणार आहेत!
 
@@AUTHORINFO_V1@@