हैद्राबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव ते बसपा प्रमुख मायावती, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकार लवकरच सीएए कायदा मागे घेणार असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय विलंबाने घेतला आहे. हे शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांचे यश आहे. निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. तो दिवसही दूर नाही जेव्हा मोदी सरकारही सीएए कायदा मागे घेईल." याशिवाय काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतही ओवेसींनी प्रतिक्रिया दिली. ओवैसी म्हणाले, "३७० कलम हटवल्यानंतर काश्मीर कुठे स्थिर झाले ? काश्मीरमधील परिस्थिती पू्र्वीप्रमाणेच आहे. केवळ आपले वैचारिक विचार रुजवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले असून मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे."
शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकाऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात ओवैसी म्हणाले की, "मृत्युमुखी पडलेल्या ७०० शेतकऱ्यांना सरकारने नक्कीच मदत (भरपाई) द्यावी. मोदी सरकारने त्यांची भरपाई करावी. मोदी सरकारने आपल्या अंहकारापोटी हा कायदा आणला. या निर्णयाचा उत्तर प्रदेशातील पश्चिमी भागात काय परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आंदोलन सुरू ठेवायचे की नाही हे शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे."