स्थलांतरितांचे दुखणे नकोच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021   
Total Views |

poland_1  H x W
 
 
सीमेवर हजारोंच्या संख्येने जमलेल्या स्थलांतरितांमुळे सध्या पोलंड आणि बेलारुसचे सैनिक एकमेकांसमोर शस्त्रास्त्रांनिशी उभे ठाकले आहेत. स्थलांतरितांना बेलारुसच्या माध्यमातून युरोपीय संघात प्रवेश करायचा असून रशियाने बेलारुसला अण्वस्त्र हल्ल्यासाठी सक्षम विमानांचा पुरवठा केला आहे, तसेच बेलारुसी सैनिकांबरोबर रशियन सैनिकांनी युद्ध सरावही सुरू केला आहे. पोलंड स्थलांतरितांना आपल्या सीमेत प्रवेश देण्याचा जोरदार विरोध करत असून त्याच्या मदतीसाठी युरोपीय संघ आणि ब्रिटनने सैनिक पाठवले आहेत. येत्या काळात दोन्ही देशांतील वाद अधिकाधिक विकोपाला जाण्याची शक्यता असून त्यावरून तिसऱ्या महायुद्धाचा इशाराही दिला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, दुसऱ्या महायुद्धाची सुरुवातही जर्मनीने पोलंडवर आक्रमण करुनच केली होती. मात्र, आताचा बेलारुस आणि पोलंडदरम्यान स्थलांतरितांचा वाद नेमका निर्माण झाला कसा?
 
 
ऑगस्ट २०२० मध्ये अलेक्झांडर लुकाशेंको सहाव्यांदा बेलारुसचे अध्यक्ष झाले. विरोधक आणि पाश्चिमात्य देशांनी निवडणुकीचा बनाव रचल्याचा आरोप करत लुकाशेंकोंचा विरोध केला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात ३५ हजार जणांना अटक करण्यात आली आणि युरोपीय संघ व अमेरिकेने बेलारुसवर निर्बंध लादले. पुढे बेलारुसमार्गे ग्रीसला जाणाऱ्या विमानाला मिन्स्ककडे वळवून लुकाशेंकोविरोधी पत्रकार रेमन प्रतावेसिचला अटक करण्यात आली. त्यानंतर लुकाशेंको यांनी स्थलांतरितांच्या अवैध आंदोलनाला रोखण्यासाठी केलेल्या करारपालनास नकार दिला. पुढे लुकाशेंकोंनी तुर्कीमार्गे इराक, सीरिया, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, बांगलादेश, पाकिस्तान, सोमालिया, सुदान, अफगाणिस्तान व अन्य अशांत देशांतील हजारो स्थलांतरितांना उचलून पोलंड, लिथुआनिया व लाटव्हियाच्या सीमेवर पोहोचवले. त्यावर निर्बंधांचा बदला घेण्यासाठी बेलारुस स्थलांतरितांना आमच्या देशांत घुसवत असून लुकाशेंकोंनी स्थलांतरितांचा शस्त्रासारखा वापर करत ‘हायब्रीड युद्ध’ पुकारल्याचा आरोप युरोपीय संघाच्या सदस्यांकडून करण्यात आला. या सगळ्या घटनाक्रमात रशियाने लुकाशेंकोंना हरतर्‍हेची मदत केली. आता मात्र तरुण, महिला आणि बालकांचा समावेश असलेले स्थलांतरित संकट अधिकच गंभीर होत चालले आहे. पोलंडच्या सीमेवरील काटेरी तारांचे कुंपण तोडून आत प्रवेश करण्यासाठी स्थलांतरितांकडून बोल्ट कटर, शिड्यांचा वापरही केला जात आहे, तर पोलिश सैनिक अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
उल्लेखनीय म्हणजे, २०२० साली १ लाख, २५ हजार, १०० स्थलांतरितांनी युरोपात अवैध प्रवेश केला होता; तर २०२१ साली आतापर्यंत ८५ हजार स्थलांतरितांनी! दरम्यान, आपल्या अराजकी देशांपेक्षा युरोपीय देशांत आश्रय मिळाल्यास उत्तम जीवन जगता येईल, असे स्थलांतरितांना वाटते. युरोपातील देशांनीही आतापर्यंत स्थलांतरितांना प्रवेश देण्याचे धोरण अंगीकारले आणि २०२०च्या अखेरीस जगातील दहा टक्के स्थलांतरित एकट्या युरोपात राहू लागले. आताही बेलारुस सीमेवरील स्थलांतरितांना पोलंडमार्गे युरोपात प्रवेश मिळेल, असे वाटते. मात्र, पोलंडसह अनेक युरोपीय देश स्थलांतरितांना प्रवेश देण्यास अनुत्सुक आहेत. त्यामागे स्थलांतरित संकट निर्माण करण्यात बेलारुसला सहकार्य करणाऱ्या रशियाच्या विरोधाचे कारण आहेच. पण, स्थलांतरित स्वतःदेखील कोणीही त्यांना प्रवेश न देण्याला कारणीभूत आहेत.
 
कारण, स्थलांतरितांचे संकट सर्वच मुस्लीम देशांतील अंतर्गत बंडाळी, युद्धामुळे उद्भवलेले आहे. तेथून जीव वाचवण्यासाठी या मुस्लिमांनी युरोपीय देशांत प्रवेशही मिळवला आणि युरोपीय देशांनीही सुरुवातीला त्यांचे स्वागत केले. नंतर मात्र या स्थलांतरित मुस्लिमांनी आपले धर्मांध रंग दाखवण्यास सुरुवात केली. ज्यांनी आसरा दिला, त्यांच्यावरच धर्माच्या व १४०० वर्षांपूर्वीच्या मागास धार्मिक मान्यतांच्या आधारावर हल्ले केले. युरोपीय संस्कृती इस्लामी मूल्यावर आधारलेली नाही, ती संस्कृती स्वातंत्र्याच्या मूल्यावर आधारलेली आहे. पण, स्थलांतरित मुस्लिमांना त्या संस्कृतीबरोबर शांततापूर्ण सहअस्तित्व मान्य नाही. त्यातूनच युरोपीय देशांतील मुली-महिलांवर, ख्रिस्ती सण-उत्सवांवर त्यांनी हल्ले केले. परिणामी, युरोपीय देशांतील सामाजिक व राजकीय स्थिती या दुखण्याने जर्जर केली. ते पाहूनच पोलंडने बेलारुस सीमेवरील मुस्लीम स्थलांतरितांना रोखले आहे, त्यांना ते दुखणे पुन्हा नको आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@