
विद्यमान महाविकास आघाडी सरकारने महापालिका निवडणुकांसाठी प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून अध्यादेश काढण्यात आल्यानंतरच प्रभागांची फेररचना करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये पुणे शहरात महापालिका निवडणुका होणार आहेत . आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रारूप कच्च्या आराखड्यावर अंतिम हात फिरवत असतानाच महाविकास आघाडीतील कसबा विधानसभेच्या स्थानिक नेत्यांमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल अपेक्षित असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मधील स्थानिक नेत्यांमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आपापल्या सोयीचे प्रभाग तयार करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने छुपी करून घेतली आहे ; तर काँग्रेस एकटीच पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून प्रभाग रचना आपल्याला अनुकूल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच झालेल्या पीएमआरडीए नियोजन समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे सहा विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आले होते . काँग्रेसची फुटलेली मते हा पक्षासाठी कळीचा मुद्दा बनला असूनही काँग्रेसचे नेते या मुद्द्यावर मौन बाळगून राहणे सोयीचे समजत आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाने जोरदार प्रयत्न सुरु प्रयत्न केले आहेत. त्यासाठी त्यांनी प्रभाग रचनेचे हत्यार उपसले असून, त्यात अनेक नगरसेवकांच्या गळ्यात ‘राष्ट्रवादी’ची माळ पडल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वडगाव शेरी, हडपसर विधानसभा मतदारसंघावरही लक्ष केंद्रित केले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा तयार होत असतानाच येत्या आठवडाभरात तो राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होणे अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाने आराखडा सादर करण्यासाठी पुणे महापालिकेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.