मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी अमीरचंद यांच्या निधनाने देशातील कलाकारांनी एक हितचिंतक गमावला असे प्रतिपादन केले. तसेच मराठी नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी असे सांगितले कि, "अमीरचंद हे एकमेव असे व्यक्ती होते, ज्यांचा देशातील प्रत्येक छोट्या-मोठ्या कलाकारांशी थेट संपर्क होता. ज्यांनी कलेच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीयतेच्या सूत्रात एकसंध बांधले होते." संस्कार भारती कोकण प्रांताच्यावतीने आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. अंधेरी येथील मेयर सभागृहात मंगळवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी अमीरचंद यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साहित्याचे सर्व नऊ रस, चित्रातील सर्व सात रंग, लोककलांचे सर्व सात सुर एकाचवेळी आपल्या लाडक्या अमीरचंद यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी एकत्र आले होते.
अमीरचंद यांना ‘अ’ या अक्षराचा ‘असंभव’ हा शब्द अजिबात आवडत नसे, असे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हरीश भिमानी यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. तर निवृत्त न्यायमूर्ती जोग सिंह, अमीरचंद यांनी केलेल्या सांस्कृतिक समन्वयाबद्दल बोलले. जगप्रसिद्ध चित्रकार तसेच संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत यांनी अमीरचंद यांच्या बारकाव्यांवर प्रकाशझोत टाकला तर मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘मनुष्यातील प्रतिभा शोधणारा कुशल मूर्तिकार’ अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली.
संस्कार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री अभिजीत (दादा) गोखले म्हणाले की, ‘‘कोरोना काळात तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेनुरुप काम करताना, सरकारी तंत्राने कलाकारांना जेव्हा दिल्लीतील त्यांचे राहते घर रिकामे करण्याचा आदेश दिला होता, तेव्हा अमीरचंद यांनी कलाकारांना समर्थन देत तो आदेश मागे घ्यायला लावला.’’ विविध क्षेत्रांतील कलाकारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काम करण्याची संधी उपलब्ध करुन देणे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्ती लाभलेल्या कलाकारांना विविध क्षेत्रांत नेऊन तेथील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहित करणे अशी अनेक कामे त्यांच्या दैनंदिन कार्यातील महत्त्वपूर्ण भाग होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमूख रामलालजी यांनी योग्यच म्हटले की, या व्यक्तीने आयुष्याला कलात्मक करण्याचा संदेश दिला, तसेच लुप्त होत चाललेल्या अनेक कलांना जीवनदान दिले. त्यांच्या श्रद्धांजली सभेत संपूर्ण कलासृष्टी जीवनाविषयी अमीरचंदजींचा संदेश देण्यासाठी एकत्र आली होती. सर्व कलांना आपल्या जीवनाशी जोडून विकास करत राहणे हीच अमीरचंदजींना खरी श्रद्धांजली असेल.
देशातील सर्व कला क्षेत्रांना एकसूत्रतेत बांधून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करुन देण्यासाठी देशभर प्रवास करणारे संस्कार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री अमीरचंदजी यांचे निधन गेल्या १६ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्वोत्तर भारतातील तवांग येथे झाले. त्यांना श्रद्धांजली देण्याकरिता संध्या पुरेचा, राजश्री शिर्के, उद्यमी मीनू गुप्ता, दिग्दर्शक सुभाष घई, संस्कार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री अभिजीत(दादा) गोखले, प्रसिद्ध उद्घोषक हरीश भिमानी, रा.स्व. संघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख रामलाल, मराठी सिनेसृष्टीचे जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक संजय पूरण सिंह, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सुदीप्तो सेन, प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतज़िर, प्रमोद पवार दांपत्यांसहित अनेक प्रसिद्ध कलाकार, साहित्यकार, पत्रकार उपस्थित होते. उपस्थित अनेक मान्यवरांनी अमीरचंद यांच्याशी निगडीत असलेले आपले अनुभव तसेच विचार उपस्थितांसमोर व्यक्त केले.
अभिनेते आणि लेखक अरुण शेखर यांनी मुख्य वक्तव्य केले तसेच प्रसिद्ध उद्घोषक हरीश भिमानी यांनी सूत्रसंचालन केले. शास्त्रीय गायिका शाल्मली जोशी यांनी संगीतमय श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी अमीरचंदजी यांच्या जीवनकार्यावर आधारित एका माहितीपटाचेही सादरीकरण करण्यात आले.