मालेगाव हिंसाचार : रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचे छापे

मालेगाव हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा संशय

    17-Nov-2021
Total Views |

malegaon_1  H x
नाशिक : त्रिपुरामध्ये झालेल्या कथित हिंसाचारावरून रझा अकादमीने शुक्रवारी बंद पुकारला होता. यावरून मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आता पोलिसांनी रझा अकादमीच्या कार्यालयावर छापेमारी सुरु केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. कार्यालयाची झडती घेऊन काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मालेगाव बंदच्या दरम्यान हिंसाचार झाला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अतिक अहमद यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे. हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या ४१ झाली आहे.
 
 
अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील इस्लामपुरा भागातील रझा ॲकॅडमीच्या मुख्य कार्यालयावर मध्यरात्री छापा टाकून कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज व कागदपत्र जप्त केले. यामध्ये काही आक्षेपार्ह व प्रक्षोभक आहे का? याची तपासणी सुरु आहे. दरम्यान किल्ला पोलिसांनी यु ट्यूबवरील प्रक्षोभक व धार्मिक भावना भडकविणारी चित्रफीत प्रसारित केल्याच्या गुन्ह्यात अम्मार अन्सारी या तरुणाला अटक केली. हिंसाचार प्रकरणात संशयित असलेल्यांना अटक करण्यासाठी तसेच दगडफेक व तोडफोडीच्या चित्रफिती पाहून संशयितांची ओळख पटविण्यासाठी सहा पथक गठित करण्यात आले आहेत.