आपला भारत हा विभिन्न प्रांत, भाषा, संस्कृती यांनी समृद्ध आहे. देशात ३०० जनजातींचे वास्तव्य आहे, त्यातील अनेक वीरांचे आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे. त्यातीलच एक स्वर्णलंकारित नाव म्हणजे बिरसा मुंडा. सहजपणे, उत्स्फूर्तपणे जनजाती बांधवांनी त्यांना मोठ्या प्रेमाने ‘भगवान’ ही उपाधी बहाल केली. ‘जनजाती गौरव सप्ताहा’ निमित्ताने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्याविषयी...
वर्षापासून दि. १५ नोव्हेंबर हा दिवस, ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस’ म्हणून गौरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारचे खूप खूप आभार!दि. १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म झारखंडच्या छोट्या नागपूरमधील उलीहतू गावात १८७५ मध्ये अत्यंत गरिबी असलेल्या घरात झाला. पिता सुगना मुंडा व माता करमी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. बिरसा मुंडांना दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. गरिबीमुळे सगळेच शिक्षणापासून वंचित होते. जात्याच कुशाग्र बुद्धीच्या बिरसांना मात्र शिक्षण मिळावे, असे त्यांच्या मातापित्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी बिरसांना त्याच्या मामाकडे राहावयास सांगितले. तिथे गाय, बकर्यांना चरायला नेणे वगैरे कामांबरोबर त्याचे शिक्षणही सुरू झाले. त्याचे प्रथम गुरू जयपाल नाग यांच्याकडे गणित शिकत व अक्षरओळख करत सुरुवात केली आणि इथेच त्याचा ख्रिश्चन पाद्रींशी पहिला संपर्क झाला. हे पाद्री भोळ्याभाळ्या वनवासी बालकांना शिक्षणाच्या नावाखाली एकत्र करून त्यांना ख्रिश्चन करत असत. बिरसाने प्राथमिक शिक्षण बुर्जू मिशनमध्ये घेतले. यानंतर चाईबासच्या लुथरू मिशनमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांना मिशनर्यांनी शेंडी कापावयास सांगितली, त्याचबरोबर तिथे छात्रांना गोमांस खायला दिले जायचे. या दोन्ही गोष्टींमुळे बिरसांच्या बालमनावर आघात झाला. आजपर्यंत गाईची पूजा करणारे आपण आता तिचे मांस खायचे, यामुळे ते खूप उद्विग्न झाले आणि इथेच या अन्यायाविरुद्ध लढ्याची पहिली ठिणगी जागृत झाली. १५ वर्षांच्या बिरसांनी अशा अत्याचारी शाळेत मी शिकणार नाही, असे निक्षून सांगितले. १८९१ साली बिरसा लुथरू मिशनमधून बाहेर पडून बंदगावला आले. तिथे वैष्णव संप्रदायाचे आनंद पांडे यांच्या संपर्कात ते आले. ते त्यांना ‘रामायण’, ‘महाभारता’तील गोष्टी सांगत. त्याचबरोबर तिथे चैतन्य महाप्रभूंच्या शिष्याचे भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होत. तिथे त्यांना आपल्या धर्म, संस्कृती इत्यादींची माहिती मिळाली.
बिरसा यांनी मांसभक्षण करणे सोडून दिले. ते जानवे घालू लागले आणि त्यांनी तिथे ‘बिरसायत’ या नव्या पंथाची स्थापना केली. या पंथात खूप जनजातीय जोडले गेले आणि पुढे मुंडा युवकांचे एक संघटन निर्माण झाले. सामाजिक सुधारणांबरोबरच राजनीतिक शोषणाविरुद्ध आंदोलन सुरू झाले. बिरसा आपल्या भाषणांमधून जनजागृती करत असत. इंग्रज, भोळ्याभाबड्या जनतेचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिश्चन करून आपल्याच देशातून वेगळे काढू पाहत आहेत. आपला धर्म, संस्कृती, पोशाख, पूजा पद्धती ही ओळख मिटवू पाहत आहेत आणि या पद्धतीने वनवासी समाजाची मूळ विचारधारा बदलून त्यांना या भूमीवरून नाहीसे करण्याचे षड्यंत्र आहे, हा विचार प्रसारित होऊ लागला.बिरसांच्या या जाज्वल्य भाषणांचा परिणाम होऊन जनजातीय युवक जागृत झाला. त्यांनी चलकद गावात एक आश्रम, आरोग्य केंद्र स्थापन केले. याचेच रूपांतर पुढे क्रांती केंद्रात झाले. हे सगळे बघून इंग्रजांना पण आश्चर्य वाटले की, आपल्या षड्यंत्राला छेद देत एक युवक आपल्याविरुद्ध जन आंदोलन उभे करतोय. त्यामुळे आता बिरसांना पकडण्यासाठी इंग्रज धावाधाव करू लागले. त्यांच्या धरपकडीचे आदेश दिले गेले. पण गावकर्यांच्या सशक्त पाठिंब्यामुळे ते विफल झाले. पण इंग्रजांनी कपटाने बिरसा दि. २५ ऑगस्टला पकडले गेले. त्यांना हजारीबाग तुरुंगामध्ये ठेवले.१८९५ ला बिरसा तुरुंगामधून बाहेर आले आणि परत संघर्षाला सुरूवात झाली. आता लोकांमध्ये चांगलीच जागृती आली होती. लोक जास्तीत जास्त संख्येने अन्यायाविरुद्ध आंदोलनात सहभागी होऊ लागले. त्यांनी ‘बुर्जू मिशन’वर हल्ला केला. रांचीच्या ‘जर्मन मिशन’वर हल्ला केला. दि. ९ जानेवारीला बिरसांनी जोजोहतूच्या जवळ डोंबारी पहाडावर सभेचे आयोजन केले, ज्यात हजारो लोक कपाळावर चंदनाचा टिळा लावून, हातात लाल-पांढर्या पताका घेऊन एकत्र झाले. ही बातमी ऐकताच ‘कमिशनर स्ट्रीटफिल्ड’ने संपूर्ण पहाडाला घेराव घातला. बिरसांना पकडायला ‘बिट अॅण्ड सर्च ऑपरेशन’ सुरू झाले. ५०० रु. बक्षीस ठेवले गेले आणि शेवटी कोणीतरी घरभेदी निघालाच. दि. १ फेब्रुवारी, १९०० ला बिरसांना पकडण्यात आले आणि दि. ९ जून, १९०० या दिवशी या महानायकाचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला. जनजाती समाजातील अशा वीरांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपला देश, धर्म, संस्कृती यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न, संकल्प करावयास हवा...भगवान बिरसा मुंडा की जय। भारत माता की जय।
(लेखक पश्चिम क्षेत्र शिक्षा आयाम प्रमुख आहेत.)