आमची पिढी बाबासाहेबांच्या ऋणात आहे...

    16-Nov-2021
Total Views |

babasaheb purandare _1&nb


बाबासाहेब पुरंदरे नावाच्या धगधगत्या शिवज्योतीने कार्तिकी एकादशीच्या दिनी या जगाचा निरोप घेतला. पण, बाबासाहेब आज आपल्यात नसले, तरी त्यांनी पेटवलेली शिवविचारांची मशाल महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. मग ते ‘राजा शिवछत्रपती’ हे चरित्रलेखन असो, अनेकांना बरोबर घेऊन किल्ल्यांना भेटी देणे असो, ‘इतिहास संशोधक मंडळा’त जाऊन कागदपत्रे धुंडाळणे असो किंवा परदेशात जाऊन ‘शिवचरित्र’-‘जाणता राजा’ यांचे सादरीकरण असो... बाबासाहेबांनी छत्रपतींच्या विचारांना नव्याने अधिष्ठान प्राप्त करून दिले. बाबासाहेबांनी आपल्या ओजस्वी वाणीतून, सोप्या लेखणीतून केवळ अनेकांना इतिहासाची गोडीच लावली नाही, तर इतिहास संशोधक, व्याख्याते आणि लेखकही घडविले. अशाच बाबासाहेबांच्या विचारप्रेरणेने इतिहास, संशोधन, राष्ट्रभक्तीच्या प्रचार-प्रसारात समर्पित भावनेने कार्यरत असलेल्या दोन पिढीतील दोन लेखकांनी बाबासाहेबांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली...





छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर हिंदुस्थानचे आराध्यदैवत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना त्यांच्या काळातल्या सर्व इस्लामिक सत्तांना आपल्या टाचेखाली दाबून टाकले होते. त्यांचा तो धगधगता इतिहास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी साकार करून संपूर्ण देशातल्या नागरिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. एखादी व्यक्ती विशिष्ट ध्येयाने अथक अनेक दशके शिवरायांचे चरित्र पिढ्यान्पिढ्या सांगत राहते, खरंतर एक मोठा चमत्कार आहे. बाबासाहेबांनी इतिहास साध्या आणि सोप्या भाषेत कथन केला, जो सर्वसामान्यांना सहजतेने कळतो आणि त्यांच्या लक्षातही राहतो.


त्या काळात बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्र कथन करण्यासाठी सर्वत्र संचार करत होते. शाळकरी जीवनापासून शिवचरित्रावरील त्यांचे व्याख्याने ऐकण्याचा योग आमच्या पिढीला अनेक वेळा आला. त्यांनी आपल्या अमोघ वाणीच्या बळावर अफजल खान वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, पावनखिंड असे अनेक प्रसंग आम्हा बाळगोपाळांसमोर उभे केले होते, हे आजही स्मरते. ‘सानेगुरुजी कथामाले’चे अधिवेशन मी लहान असताना डोंबिवलीत आयोजित करण्यात आले होते. डोंबिवलीतल्या गोखलेवाडीत माझे बालपण गेले. या गोखलेवाडीत रामचंद्र इनामदार नावाचे ‘बालमोहन’चे शिक्षक ‘सानेगुरुजी कथामाला’ या संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी आमच्या मनात राष्ट्रभक्तीचे बीज पेरले. त्यांच्यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांना लहानपणीच आम्हाला जवळून पाहता आले.  डोंबिवलीत आयोजित केलेल्या या अधिवेशनात बाबासाहेब पुरंदरे यांनासुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. हे अधिवेशन डोंबिवली पश्चिमेला असलेल्या जोंधळे विद्यालयात संपन्न झाले. गोखलेवाडीतील मी, शेखर प्रभुणे, किशोर कुलकर्णी, रवींद्र वैद्य, जयू रानडे अशी आम्ही मुले त्यावेळी त्यात सहभागी झालो होतो.




आम्हा मुलांची दुपारी दंगामस्ती चालली होती. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या कानावर आमचा गोंगाट गेला. ते आमच्या समोर आले. त्यांनी आम्हाला प्रेमाने सांगितले, “तुम्ही माझ्याबरोबर चला. मी तुम्हाला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगतो.” एवढेच सांगून ते आम्हाला त्यांच्या कक्षेत घेऊन गेले. आम्ही त्यांच्या मागे मोहिनी घातल्याप्रमाणे शांतपणे गेलो. त्यांना देण्यात आलेला कक्ष म्हणजे शाळेचा एक वर्ग होता. तिथे फळा होता. शिपायाकडून त्यांनी खडू मागून घेतला. आम्हा पाच-सहा मुलांना त्यांनी समोर बसवले आणि फळ्यावर प्रतापगडाचे चित्र काढून त्यांनी अफजलखान वधाचा प्रसंग आमच्या समोर जीवंत उभा केला. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला, हे साभिनय त्यांनी करून दाखवलेले आजही आठवते. त्या शाळकरी वयात बाबासाहेब पुरंदरे यांचे महत्त्व आमच्या आकलनात आले नसेल, पण जेव्हा आम्ही मोठे झालो त्यावेळी त्यांनी अफजलखान वधाचा सांगितलेला प्रसंग आजही जसाच्या तसा आमच्या लक्षात आहे.




शाळकरी मुलांनाही सहजपणे कळेल अशा शब्दांत, अशा भाषेत, संथ लयीत त्यांनी तो इतिहास आमच्या मनावर कोरला, बिंबवला. हे सर्व लिहीत असताना त्या शाळेचा तो वर्ग आणि बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिलेले ते खास व्याख्यान याचे स्मरण होते. या व्याख्यानासाठी आम्हा मुलांनी त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले नव्हते. इतका मोठा माणूस त्यावेळी आमच्यासाठी तेवढाच लहान होऊन शिवरायांचा पराक्रम जीवंत करण्याचा प्रयत्न करत होता. या ऐतिहासिक क्षणाला आमच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोंबिवलीच्या स. वा. जोशी हायस्कूलच्या पटांगणात झालेली त्यांची व्याख्याने आजही तेवढीच ताजी आणि जीवंत वाटतात. शिवरायांचा पराक्रम, शिवरायांची राष्ट्रनिष्ठा, शिवरायांची युद्धनीती, त्यांनी आपल्या रयतेच्या मनात ‘हे राष्ट्र माझे आहे आणि मी या राष्ट्राचा आहे,’ ही निर्माण केलेली भावना, त्यांची संस्कृतीनिष्ठा, त्यांची मानवता, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्र कथनाचा मंथनातून नवनीतासारखे आपल्या हाती लागतात.




शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कथन करत व्यतित केले. ‘जाणता राजा’ या महानाट्यातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास साकार केला. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पकतेने त्यांनी वापर केला होता. देश-विदेशातसुद्धा या महानाट्याचे अनंत प्रयोग झाले. ‘जाणता राजा’ महानाट्यातील शिवराज्याभिषेकाचा सोहळा डोळे दीपवून टाकणारा होता. हे महानाट्य ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे, त्यांच्या मनःपटलावरून ते कधीही पुसून टाकले जाणार नाही. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराज एक-एक पायरी चढत राजसिंहासनावर विराजमान होण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांना त्यांच्या या राष्ट्रीय कार्यात सहभागी होणार्‍या त्यांच्या सहकार्‍यांची आठवण होते. ‘जाणता राजा’ या महानाट्यतला हा प्रसंग पाहत असताना शिवचरित्राशी एकरूप झालेल्या श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे नेत्र पाणावल्याशिवाय राहत नाहीत. यश प्राप्त झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आपल्याला राष्ट्रकार्यात सहकार्य केले, त्यांचे विस्मरण शिवरायांना होत नाही. शिवरायांचे हे स्वभाववैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात बाबासाहेब पुरंदरे यशस्वी झाले.  शिवरायांच्या चरित्रातून शिवरायांचे गुण, त्यांची कठोरता लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम निरलस, निरपेक्ष भावनेने बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. म्हणूनच ते जनमानसाच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले आहेत. त्यांनी या जगाचा निरोप घेतला असला, तरी त्यांचे ते स्थान तसेच चिरकाल राहणार आहे.





या महानाट्याविषयीची माझी एक आठवण आजही तेवढीच ताजी आहे. ठाण्याच्या ‘दादोजी कोंडदेव स्टेडियम’मध्ये या महानाट्याचे प्रयोग झाले होते. हे महानाट्य पाहण्यासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांना गटागटाने घेऊन गेलो होतो. त्यामुळे हे महानाट्य चार-पाच वेळा पाहण्याची संधी मला उपलब्ध  झाली. या महानाट्याविषयी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणारे पत्र मी बाबासाहेबांना प्रयोग संपल्यानंतर भेटून दिले होते. त्या पत्राचा स्वीकार करून त्यांनी लगेच दुसर्‍या दिवशी मला भेटीस बोलावले. त्याप्रमाणे मी ठाण्याला त्यांना भेटायला गेलो. माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकालासुद्धा बाबासाहेब सहज भेटण्यासाठी बोलवत होते, ही त्यांच्या महानतेची पावती आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे, मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, त्यावेळी ते माझे पत्र सर्व कलाकारांना वाचून दाखवत होते.  यावेळी माझ्यासमवेत ठाण्याचे अधिवक्ता आणि माझे स्नेही नंदकुमार राजुरकर उपस्थित होते. माझे पत्र त्यांनी संग्रही ठेवत असल्याचे त्यावेळी सांगितले.


असा शिवरायांचा आधुनिक भाट १५ नोव्हेंबर, २०२१ म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरीनाथाच्या चरणी विलीन झाला. स्वर्गामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व मावळे त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असतील, यात शंका नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथरूपात शिवरायांचा इतिहास अनंतकाळ कथन करत राहतील, याची खात्री आहे. त्यांच्या अमृतमय स्मृतींना विनम्र अभिवादन!


दुर्गेश परुळकर