रामवंशी समाजसेवक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2021   
Total Views |

Sunil Jadhav_1  
 
 
आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांचे शौर्यशील खरे जीवनचरित्र आणि रामोशी समाजाचा इतिहास जगासमोर यावा यासाठी कार्यरत असलेले सुनील जाधव यांच्या विचारकार्याचा संक्षिप्त आढावा...
१४ वर्षांपूर्वी पिंपरी येथील 'रामोशी' समाजाच्या सुनील जाधव या तरुणाने उमाजी नाईक यांच्यासंदर्भात अभ्यास करण्यास सुरुवात केली. यातून त्यांना उमाजी नाईक यांना अटक करणाऱ्या कॅप्टन अलेक्झांडर याची डायरी मिळाली. त्यात १८३४ वगैरेच्या काळातील 'रामोशी' समाजाची सद्यस्थिती अलेक्झांडरने लिहिली होती. 'रामोशी' समाज कसा राहतो, काय प्रथा आहेत? यावर अर्धी डायरी खर्च आहे, तर अर्धी डायरी उमाजी नाईक यांच्या गुणकौशल्यावर खर्च झालेली आहे. त्यात उमाजी नाईक या 'रामोशी' समाजाच्या देशी 'रॉबिनहूड'ला कसे कसे पकडले, याबद्दल अलेक्झांडरने लिहिले होते. 'ज्यांना उमाजी यांचे श्रेष्ठत्व खलायचे असे गावातले एक-दोन जण इंग्रजांना सामील झाले. त्यांनी फंदफितुरी केली आणि आम्ही 'रिअल हिरो' उमाजींना पकडू शकलो,' असे अलेक्झांडर याने लिहिले आहे. हे सगळे वाचून सुनील यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. कारण, आजपर्यंत समाजाला सांगितले गेले की, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक हे इंग्रजांच्या तावडीत कसे सापडले? तर त्यांची मानलेली बामण बहीण होती. तिने फितुरी केली. बामण वंगाळ लोक. मात्र, अभ्यासाअंती सुनील यांना अलेक्झांडरच्या डायरीत सत्य सापडले. सुनील हे सत्य समाजासमोर मांडू लागले. ती एक वैचारिक सत्याची लढाईच होती.
समाजाबद्दल आणखीन माहिती मिळावी कार्य करता यावे, म्हणून मग सुनील जाधव हे 'आद्यक्रांती राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक' संघटनेचे आणि 'आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी' संघटनेचे काम करू लागले. या दोन्ही संघटना रामोशी समाजाच्या विकासासाठी काम करतात. शैक्षणिक क्षेत्रात 'रामोशी' समाजाचा टक्का वाढावा, प्रशासकीय स्तरावर समाजाच्या तरुणांनी यश मिळवावे, यासाठी या संघटनांच्या माध्यमातून सुनील जाधव काम करतात. सुनील जाधव यांचे वडील शिवाजी जाधव हे पुणे पोलीस स्थानकामध्ये हवालदारपदावर कार्य करत होते, तर आई पुष्पा गृहिणी होती. जाधव कुटुंब ज्या पोलीस क्षेत्रामध्ये राहायचे, त्याच्या पाठीमागेच एक तहसीलदार कचेरी. तिथे हजारो वर्षांपूर्वीचे एक झाड होते. इंग्रजांनी उमाजी नाईकांना याच झाडावर फाशी दिली आणि त्यानंतर तीन दिवस त्यांचे शरीर त्या झाडाला लटकवून ठेवले. लहानपणी सुनील या झाडाजवळ क्रिकेट वगैरे खेळायला जात. पण, त्या पवित्र स्मृतिस्थळाची त्यांना माहिती नव्हती. याच काळात त्यांच्या नात्यातले शिवाजी पाटोळे सुनील यांना म्हणाले, “तू शिकलेला आहेस. आपल्या उमाजी नाईकांचा इतिहास आहे. त्याबद्दल काही अभ्यास कर.”
 
जिज्ञासा म्हणून सुनील उमाजी नाईकांसंदर्भात अभ्यास करू लागले. पुढे महाविद्यालयीन जीवनात काही लोक सुनील आणि इतर तरुणांना भेटून सांगायचे की, ”पेशव्यांच्या काळात आपल्या समाजातल्या लोकांना पेशवा आणि सगळे उच्चवर्णीय नरकासारखे जगण्यास भाग पाडायचे. त्यामुळे आपण भीमा-कोरेगावच्या युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढलो. ती आपली शौर्यगाथा आहे मर्दा.” पण इतिहासाचा अभ्यास करताना सुनील यांना सत्य गवसले की, अरे, या युद्धात 'रामोशी' समाजाचे काही लोक जसे इंग्रजांच्या बाजूने लढले तसे पेशव्यांच्या बाजूनेही लढले. त्यावेळच्या समाजरचनेला अनुसरून समाज वागला. पुढे त्यांची ओळख पुण्यातील रा. स्व. संघाचे हेमंत हरहरे यांच्याशी झाली. एक वर्ष चर्चा आणि वैचारिक देवाणघेवाण संपर्क झाल्यानंतर सुनील हे 'पुणे समरसता मंचा'चे काम करू लागले. एकदा रा. स्व. संघ महाराष्ट्र प्रचारक अतुल लिमये यांनी सुनील यांना सांगितले की, ”समाजाच्या विकासासाठी विविध क्षेत्रांत काम करणारे १०० नि:स्वार्थी व्यक्ती समाजातून निर्माण करणे गरजेचे आहे. ते तू करू शकतोस.” सुनील त्या दृष्टीने कामाला लागले. आज 'रामोशी' समाजात 'आयटी' क्षेत्रात, क्रीडाक्षेत्रात, इतिहास क्षेत्रात, प्रसारमाध्यम, माहिती संकलन, आक्षेप आणि खंडन या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींचा गट तयार आहे. जे तन-मन-धन अर्पूण आपल्या क्षेत्रात समाजासाठी समरसून काम करतात.
समाजात चेतना, ओजस्विता निर्माण व्हावी म्हणून सुनील समाजात विचार पेरतात की, ”रामवंशी, म्हणजे समाजाच्या नावातच 'राम' आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिजीर्र् नाईक आणि आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक हे समाजाचे पूर्वज आहेत. आपण देवदेश आणि धर्मासाठी जगतो.” सुनील असे नुसते म्हणत नाहीत, तर पश्चिम महाराष्ट्रातील ज्या ज्या गावात 'रामोशी' समाजातील स्वतांत्र्यवीर क्रांतिकारी जन्मला आणि कार्य केले. त्या गावची माती गोळा करून ती अयोध्येतील राममंदिराच्या पायाभरणीसाठी नेण्याचा उपक्रमही त्यांनी केला. या उपक्रमाला प्रत्यक्ष गोविंदगिरी महाराजांचा आशीर्वाद लाभला, तर अयोध्येत या पवित्र मातीचे तसेच सुनील आणि त्यांच्या १८ समाजबांधवांचे स्वागत चंपतराय यांनी केले. सुनील यांनी इच्छा व्यक्त केली की, राम मंदिराची पवित्र माती त्यांना या सगळ्या गावात द्यायची आहे. त्यावेळी चंपतराय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलेल्या जागेची माती सुनील यांना दिली. यातले धर्ममहत्त्व, सामाजिक समरसता आणि भावविभोरता ही शब्दातीत आहे. सुनील जाधव म्हणतात, ”निरक्षरता, बेरोजगारी आणि इंग्रजांच्या काळापासून असलेला गुन्हेगारीचा ठपका यामुळे समाजाच्या वाट्याला उपेक्षा आली. पण आज आपल्या धर्म इतिहासाचा गौरव होताना पाहतो. त्यामुळे भरून पावतो. समाज शौर्यशील आहे. येणाऱ्या काळात समाज नक्कीच सर्वच स्तरावर यशस्वी होईल.” सुनील यांच्या विचारकार्याची आज 'रामोशी'च नव्हे, तर प्रत्येक समाजगटाला गरज आहे. रामवंशी सुनील जाधव यांना लक्ष लक्ष शुभेच्छा...!
@@AUTHORINFO_V1@@