साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान व्हावे यासाठी सर्व प्रयत्न करू

केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांचे प्रतिपादन

    15-Nov-2021
Total Views |

ए. नारायण स्वामी _1 
 
 
 

पुणे : "साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारचा सर्वोच्च भारतरत्न सन्मान प्रदान केला जावा यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे," आश्वासन आज भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी दिले. ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी पुण्यात आलेले असताना आमदार सुनिल कांबळे यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात बोलत होते.

त्या वेळी ते पुढे म्हणाले ,"उद्यमशील व आत्मनिर्भर समाज स्वतःच्या व देशाच्या विकासाला गतिमान करतात. उद्यमशील व अराजकीय विचार करणारा समाज गतिमान होतो. तसेच संकुचित, जातीय व भौगोलिक भावनांमध्ये अडकून पडल्याने समाजाचे सरकारवरचे अवलंबित्व वाढते. कोणत्याही समाजाला विकसित व्हायचे असेल तर समाजाची संपत्ती निर्माण करून,शिक्षण ,उद्यमशील समाज, आत्मनिर्भरतेने विकासाकडे जातो,असे प्रतिपादन ए. नारायण स्वामी यांनी आज केले.

बोट क्लब येथे आमदार सुनिल कांबळे यांच्या पुढाकाराने आयोजित मातंग समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. नारायणस्वामी यांच्या पहिल्याच पुणे भेटीच्या निमित्ताने आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी मातंग समाजातील विविध राजकीय नेते ,सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक व मान्यवरांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास माजी समाज कल्याण राज्यमंत्री महाराष्ट्र दिलीपभाऊ कांबळे, समाजाचे नेते भगवानराव वैराट, हनुमंत साठे, आमदार नामदेवराव ससाणे, भाजपा शहर उपाध्यक्ष डाँ.श्रीपाद ढेकणे, नगरसेवक उमेश गायकवाड, आनंद रिठे, संपत जाधव, प्राचार्य देविदास वायदंडे,डॉक्टर भोसले, डॉक्टर सोनवणे, सुखदेव अडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री ए नारायण स्वामी यांनी समाजाच्या विकासाची गती वाढवण्यासाठी मोदी काळात भ्रष्टाचार मुक्त, सचोटी व निष्ठेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळते आहे व अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवी संस्थांचे जाळे उत्पन्न करून त्याद्वारे समाजाच्या विकासाचा आराखडा मांडला पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना त्यांनी सरकारी अवलंबित्व हे विकासाला मारक ठरते, त्यामुळेच समाजाने सातत्याने शिक्षणाचा प्रसार करून स्वयं रोजगार निर्मिती साठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजातील सर्व घटकांना कोणतेही काम करीत असले तरी समानतेची आणि सन्मानाची वागणूक समाजबांधवांनी देऊन सर्वांच्या विकास साधला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली "सबका साथ ,सबका विकास व सबका सहभाग" याला महत्त्व आहे असेही ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉक्टर श्रीपाद ढेकणे, आमदार सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, भगवानराव वैराट, हनुमंत साठे, आमदार नामदेवराव ससाने, इ. आपले विचार व्यक्त केले. माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न सन्मानाने घोषित करण्यात यावे अशी मागणी जोरकसपणे मांडली. उपस्थित सर्वांनी या मागणीला जोरदार प्रतिसाद दिला असता नारायणस्वामी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भारतरत्न पुरस्कारासाठी संपूर्ण दक्षिण भारतातील आमदार व लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक बोलावण्याचा मानस व्यक्त केला.