‘पर्यावरण’ विषयाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संमेलनाची जोड आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2021   
Total Views |

envi_1  H x W:
नाशिक :  “सर्वसामान्यांचे पर्यावरणाशी कृतिशील नाते निर्माण होण्यासाठी नाशिक येथे आयोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक उत्तम व्यासपीठ ठरू शकते,” असे परखड मत पर्यावरण अभ्यासकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.नाशिक हा पर्यावरणदृष्ट्या समृद्ध जिल्हा असताना येथील संमेलनात एकही ‘परिसंवाद पर्यावरण’ विषयाला अनुषंगून नसल्याने येथील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पर्यावरणीय समस्यांचा ऊहापोह व्हावा काय आणि पर्यावरण विषयावर उपलब्ध असणारे साहित्य वाचकांना सहजतेने उपलब्ध व्हावे, यासाठी काय केले जावे. याबाबत बोलताना पर्यावरण अभ्यासकांनी आपली भूमिका मांडली.


निसर्गात होणार्‍या घातक बदलाचे इशारे देणारे पर्यावरणवादी हा तसा आजपर्यंत दुर्लक्षित असणारा समूह असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र, आज हवामानातील बदल प्रत्येक जण अनुभवत आहे. या ना त्या प्रकारे त्याची झळ सोसत आहे. १९५ देशातील शास्त्रज्ञांचे प्रतिनिधित्व करणारा आणि अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘आयपीसीसी’ च्या अहवालापासून ते इंग्लंड मध्ये नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक पर्यावरण परिषदेपर्यंत सर्व ठिकाणी शास्त्रज्ञांनी येऊ घातलेल्या गंभीर धोक्याची वारंवार सूचना दिली आहे. जागतिक स्तरावरदेखील विविध देश याबाबत आपली भूमिका घेत आहेत. या सगळ्या कोलाहलात व्यक्ती म्हणून आपण हवामान बदलला किती जबाबदार आहोत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर आपण काय करू शकतो, हे आज लोकांपर्यंत पोहोचतच नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



महत्त्वाचे असले तरी झाडे लावणे, प्लास्टिकचा कमीतकमी वापर, पाण्याची बचत हेच पर्यावरणरक्षणाचे उपाय आहेत असा सर्वसामान्य समज आहे. सौर पवनऊर्जा म्हणजे हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणस्नेही असा भोळाभाबडा आशावाद पसरवला जात आहे. या सर्व समस्येला आपण स्वतः व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून, समाज म्हणून कसे आणि किती जबाबदार आहोत, याविषयी एक प्रकारची अनभिज्ञता दिसत असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. सुदैवाने मराठीमध्ये पर्यावरण विषयाची सांगोपांग चर्चा करणारी आणि संतुलित विचार मांडणारी बरीच पुस्तके असल्याची माहिती यावेळी दिली गेली. पूर्वीच्या साहित्यिकांमध्ये व्यंकटेश माडगूळकर, दुर्गा भागवत, मारुती चितमपल्ली यांनी जसे निसर्गाविषयी विपुल लेखन केले तसेच आजच्या काळाला अनुसरून आवर्जून वाचावी, अशी अनेक पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा हे साहित्य वाचकांना सहजतेने उपलब्ध होण्यासाठी साहित्य संमेलन हे एक उत्तम व्यासपीठ ठरू शकेल, अशी भावना यावेळी नाशिक येथील पर्यावरणविषयक ‘कारवी रिसोर्स ग्रंथालया’चे अजित बर्जे यांनी यावेळी व्यक्त केली.



@@AUTHORINFO_V1@@