भारत विविध दिन उत्साहाने साजरे करतो आणि त्या परंपरेत १५ नोव्हेंबरची ‘जनजाती गौरव दिन’ या नावाने भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून जनजाती गौरव दिनासाठी १५ नोव्हेंबरची निवड केली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या लेखातून जाणून घेऊया बिरसा मुंडा यांच्याबद्दल...
१५ नोव्हेंबर, १८७५ या दिवशी महान योद्धे, क्रांतिकारी आणि धर्मनिष्ठ भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झाला आणि ब्रिटिशांशी लढा देत अवघ्या २ ५ वर्षांचे आयुष्य जगून भारतमातेच्या कुशीत ते विसावले. त्यांच्या जन्मदिनी ‘जनजाती गौरव दिन’ साजरा करावा, असेच त्यांचे जीवन होते आणि आज बदलत्या सामाजिक परिस्थितीत ते अधिकच प्रेरक झाले आहे.झारखंड, बिहार, ओडिशा, बंगाल या राज्यांत ‘मुंडा’ नावाने, त्रिपुरात ‘मुरा’ नावाने आणि मध्यप्रदेशात ‘मुडास’ नावाने ओळखली जाणारी देशभक्त ‘मुंडा’ जनजाती लढाऊ वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची भाषा ‘मुंडारी’ आहे. मुंडा जनजातीमध्ये विविध पक्षी, प्राणी, वस्तू यांच्या नावाने कुळे आहेत. उदाहरणार्थ मासे, भात, मीठ, हंस, चिंच, कावळा, कोंगरी इत्यादी. त्यांची स्वतःची वाद्ये आहेत. जादूर, करम, सुसून अशा विविध नावांचे ‘मुंडारी नाच’ आहेत. त्यांचा मुख्य देव सिंगबोंगा म्हणजे सूर्यदेव आहे. त्याचसोबत निसर्गातील अनेक गोष्टींना ते देव मानतात. हुंड्यासारखी मुलीच्या वडिलांना देण्याची ‘डालिटका’ अशी विरुद्ध प्रथा आहे. मुंडांचे प्रत्येक गाव स्वयंपूर्ण असून त्यामध्ये पत्थलदरी म्हणजे विविध कारणांसाठी दगडांच्या निशाण्या लावण्याची पद्धत आहे. गावाची हद्द दाखवणारे सासनदिरी, घराबाहेर बसवलेला कुळ दाखवणारा होरादिरी, बाळाची नाळ पुरलेल्या ठिकाणचा झिपदिरी, एखाद्याने सामाजिक गुन्हा केला, तर त्याच्या घरासमोर लावला जाणारा मागोदिरी, असे त्यांचे विविध प्रकार आहेत. असा हा समाज शेती करून, जंगल राखून आणि जंगलसंपत्ती वापरुन सुखाने राहत होता.
इंग्रजांचे भारतात आगमन झाले आणि या सुखाला तडा गेला. आसाम, बंगालमधील चहामळ्यांसाठी मजूर म्हणून असंख्य मुंडा कुटुंबांना त्यांनी जबरदस्ती नेले. मुंडांच्या शेतीतून त्यांना कर मिळत नव्हता म्हणून या जमिनीवर जमीनदार नेमले आणि त्यांच्या माध्यमातून करवसुली सुरू केली. सावकारी, कर्जबाजारीपणा, जप्ती असे दुष्टचक्र सुरू झाले. त्यातच चहा मळ्यांवरील अनेक मजूर काही ना काही कारणाने गावी परत येत आणि आल्यावर त्यांच्या जमिनी दुसर्यांच्या ताब्यात असल्याने अडचणीत सापडत. यातच इंग्रज सरकारच्या आश्रयाने विविध युरोपियन देशांतील ख्रिस्ती मिशनरी इथे येऊन राहिले. अडचणीत सापडलेल्या मुंडा कुटुंबांचे धर्मांतरण करण्याचा सपाटा त्यांनी लावला. त्यातून सामाजिक तणाव निर्माण झाला. आर्थिक, धार्मिक, सामाजिक असंतोषाचे रूपांतर आंदोलनात झाले आणि संपूर्ण छोटा नागपूर स्वातंत्र्य चळवळ करू लागला. ही चळवळ म्हणजे रांची हे केंद्र पकडून संपूर्ण जनजाती क्षेत्रात झालेली, अन्य आंदोलनांशी संबंध नसलेली लढाई होती आणि तिला दरबारी लढाई म्हणून ओळखले जाते. इंग्रज अधिक सुसंघटित होते. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे होती. त्यामुळे इंग्रजांनी कुटीलपणे ही लढाई हाणून पाडली. या लढाईतील काही नेते एकदा झारखंडमधील चाईबासा या ठिकाणच्या ‘जर्मन मिशनरी’ला भेटायला गेले. त्यांच्या आंदोलनात पाद्रींचे सहकार्य मिळते का पाहावे, असा त्यांचा प्रयत्न होता. भाषेचा प्रश्न असल्याने त्यांनी त्याच शाळेतील डेव्हिड नावाच्या मुंडा समाजातील मुलाला सोबत घेतले. तो दुभाषकाचे काम करू लागला. हा डेव्हिड कोण होता?
रांची जिल्ह्यातील उलीहातू गावी सुगना मुंडा आणि करमी मुंडा हे दाम्पत्य राहत होते. करमीचे माहेर असलेल्या चालकाड या गावी तिच्या पोटी एका बालकाचा जन्म झाला आणि त्याचे नाव ठेवले गेले बिरसा. बिरसाने अनेक शाळांत थोडेथोडे शिक्षण घेतले. परंतु, त्याने सुगनाचे समाधान होत नव्हते. त्याला कळले की, चाईबासा येथे एक मोठी शाळा सुरू झाली आहे. सुगना आणि करमी त्याला तिथे घेऊन गेले. तिथे बिरसाला प्रवेश तर मिळू शकत होता. शिक्षण फुकट मिळणार होते. परंतु, अट मोठी अवघड होती. त्यांच्या देवदेवता सोडून द्यायच्या आणि येशूची पूजा करायची. सर्वांनी गळ्यात ‘क्रॉस’ घालायचा. त्यांनी खूप विनंत्या केल्या. परंतु, पाद्री सवलत देण्यास तयार नव्हता. शेवटी मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी धर्माचा त्याग केला आणि बिरसा आता डेव्हिड झाला.शिक्षण सुरू होते, प्रगती होत होती आणि अचानक हा दरबारी लढाईतील चर्चेचा प्रसंग उद्भवला.बिरसाला दुभाषक बनवून चर्चा सुरू झाली. पाद्री समाजाच्या बाजूने उभा राहण्यासाठी तयार तर झाला नाहीच. परंतु, उलट मुंडा समाज कसा चुकतो आहे, हे सांगू लागला. बोलता बोलता तो असे म्हणाला की, “मुंडा लोक चोर आहेत.”
हे ऐकताच बिरसा चिडला आणि बोलू लागला, “चोर आम्ही नाही, तुम्ही आहात. हा देश आमचा आहे. तुम्ही या देशात घुसला आहात म्हणून चूक तुमचीच आहे.”हे ऐकून पाद्री खवळला आणि त्याने नोकरांना त्याला पकडण्याचा आदेश दिला. बिरसा तेथून पळाला आणि थेट चालकाडला पोहोचला. तिथे पांडे नावाच्या एका बुनकर समाजातील व्यक्तीच्या घरी नोकर म्हणून तो काम करू लागला. हा पांडे आयुर्वेद आणि ‘रामायणा’चा अभ्यास करीत असे. त्याने बिरसाला या दोन्ही गोष्टींचे शिक्षण दिले. बिरसाला वाटू लागले की, आपला समाज अडचणीत आहे. आपण त्याला सुखी करण्यासाठी काही केले पाहिजे म्हणून तो नोकरी सोडून समाजात जाऊन राहिला. रामायण सांगू लागला, रोग्यांना औषधे देऊ लागला. त्याच्या औषधांना गुण आहे, असे सर्वांच्या लक्षात आले आणि त्याची लोकप्रियता खूपच वाढली. औषधे देताना तो हा मंत्रदेखील देत असे की, ‘टोपी टोपी एक हैं।’ म्हणजे, इंग्रज शिपाई आणि पाद्री वेगळे दिसले तरी परस्परांना सामील आहेत. त्यामुळे इंग्रज शिपायांना घाबरू नका आणि पाद्रीच्या बोलण्याला भुलू नका. आपला धर्म सोडून जाऊ नका, जे गेले आहेत त्यांना परत आणा. त्याच्या प्रभावाने अनेक धर्मांतरित मुंडा हिंदू धर्मात परत आले. यामुळे पाद्री खवळले. त्यांनी अधिकार्यांशी संधान बांधून बिरसाला तुरुंगात टाकण्याची व्यवस्था केली.
बिरसाचे तुरुंगातील वागणे अतिशय सभ्य होते. बंडाची कोणतीही चिन्हे त्याच्या वागण्यात-बोलण्यात नव्हती. त्यामुळे त्याची लवकरच सुटका झाली. परंतु, या काळात त्याने ब्रिटिश व्यवस्थेच्या ताकदीचा अभ्यास केला होता. त्याच्या लक्षात आले होते की, ब्रिटिशशासक आणि पाद्री यांची ताकद त्यांच्या शस्त्रांमध्ये आहे. केवळ आयुर्वेद आणि ‘रामायण’ यामधून आपला समाज मुक्त होणार नाही. हातात शस्त्र धरावे लागेल. संघटना उभी करावी लागेल. युद्ध करावे लागेल.तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने जगन्नाथपुरी, चुटिया, नवरत्नपूर येथील यात्रा केली आणि हिंदू धर्माचे एक नवीन स्वरूप लोकांसमोर ठेवले. जगन्नाथपुरीचे चंदन, चुटियाचे पवित्र पाणी, तुळशीचे झाड यांना या नव्या पंथात मानाचे स्थान होते. व्यसनांचा निषेध होता. खरे बोलण्याला प्रोत्साहन होते. पवित्र जीवनाचे महत्त्व होते आणि संघटनेचा मंत्र होता. त्याने या पंथाच्या निमित्ताने सर्वांना एकत्र केले आणि सर्वांना गुप्तपणे लढाईचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर पारंपरिक शस्त्रांचा साठा सुरू केला. दरबारी लढाईमधील अनेक नेत्यांना बिरसाच्या रूपात एक नवे नेतृत्व मिळाले. सर्वजण आता बिरसांना ’भगवान बिरसा’ म्हणू लागले, ’धरती का आबा’ म्हणू लागले. त्यांच्या पंथाला ’बिरसायत’ म्हणू लागले. तयारी पूर्ण होताच १८९७ साली भगवान बिरसांनी घोषणा दिली, ‘अबु आ दिशुं, अबु आ राज’ म्हणजे ‘आमच्या गावात आमचे राज्य.’ या संघर्षाला नाव ठेवले ‘उलगुलान.’ छोटा नागपूरच्या क्षेत्रातील सर्व इंग्रजी ठाणी उद्ध्वस्त केली, इंग्रज शिपाई पळवून लावले, पाद्री पळवून लावले आणि सर्वांना ‘बिरसायत’मध्ये सामावून घेतले. संपूर्ण क्षेत्र इंग्रजी गुलामीतून स्वतंत्र झाले.त्यांचे हे स्वातंत्र्य तीन वर्षे टिकले, जे एक अतिशय अवघड कार्य होते.
१९०० मध्ये बिरसा आणि त्यांचे सर्व सैनिक डुंबारी नावाच्या पहाडीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी एकत्र आले होते. दुर्दैवाने आपल्याला फितुरीचा शाप आहेच. त्यामुळे ही वार्ता इंग्रजांना कळली. त्यांच्या बंदूकधारी शिपायांनी संपूर्ण पहाडीला वेढा घातला. जीव वाचविण्याची संधी न देता अमानुष गोळीबार सुरू झाला. मुंडा वीर धारातीर्थी पडू लागले. पहाडावरून रक्ताचे लोट वाहून पहाडी लाल झाली. भगवान बिरसांच्या साथीदारांनी त्यांना त्या वेढ्यातून सुरक्षित बाहेर आणले. भविष्यात पुन्हा सैन्य जमवून पुन्हा संघर्ष करण्याची बिरसांना उमेद होती. ते जंगलात दिसेनासे झाले. त्यांच्या मागे इंग्रज शिपाई होतेच. अतिशय थकलेले भगवान बिरसा एका वृद्ध स्त्रीच्या झोपडीत थांबले आणि क्षणभर झोपी गेले. वृद्धा त्यांच्यासाठी भोजन बनवू लागली. चुलीच्या धुराची रेषा झोपडीच्या वर दिसत होती. धुराच्या दिशेने इंग्रज सैनिक आले आणि त्यांनी झोपडीला घेरून बिरसांना ताब्यात घेतले. हातात बेड्या घालून रांचीला आणले. त्यांना सरकारी नोकरी, धर्मांतर यांचे आमिष दाखवून समाजापासून फोडण्याचा प्रयत्न केला, पण बिरसा बधले नाहीत. त्यांचे धर्मांतर संपूर्ण मुंडा समाजाचा नाश करणारे ठरेल याची त्यांना कल्पना होती. तुरुंगात थोडेथोडे विष देऊन त्यांना मारण्याचा कट इंग्रजांनी केला आणि विषामुळे आजारी पडल्यावर उपचार मिळू दिले नाहीत. बिरसांनी देशासाठी आणि धर्मासाठी संघर्ष केला आणि तुरुंगात बलिदान केले. त्यांच्या अनुयायांची इतकी भीती इंग्रजांना होती की, सुवर्णरेखा नदीकाठी त्यांच्या देहावर गुपचूपपणे अग्निसंस्कार करण्यात आले. परंतु, हे वृत्त गुप्त राहिले नाही. शिपायांनी हे वृत्त जनतेला सांगितले.
दुःख आणि संतापाचा आगडोंब उसळला, त्या आगीतून छोटा नागपूर क्षेत्र कधीच शांत झाले नाही. पुढची ५० वर्षे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मुंडा समाज इंग्रजांशी सतत लढत राहिला. हा बिरसांच्या बलिदानाचा परिणाम होता.आजही देश आणि धर्माच्या रक्षणासाठी त्यांचे जीवन सर्व भारतीयांना आवाहन करीत आहे.स्वातंत्र्यानंतर डुंबारी पहाडीवर स्मारक स्तंभ उभारून, रांची विमानतऴाचे नामकरण करून भारताने भगवान बिरसांना सदैव स्मरणात ठेवले आहे. त्यांच्या जन्मदिनी ‘जनजाती गौरव दिन’ साजरा करण्याचा निर्णय त्या स्मरणातील पुढचा टप्पा आहे. जनजाती समाजाने भारताच्या सन्मानासाठी जो त्याग केला आहे, त्याची जाण भारताला आहे, हे या निर्णयातून दिसते आहे. आज हा दिवस आपण साजरा करू आणि देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा निर्धार करू. त्याचसोबत हादेखील निर्धार करू की, आम्ही जनजाती समाजाला अन्य हिंदू समाजापासून दूर करण्याचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी करू.भारत माता की जय!
भगवान बिरसा मुंडा की जय!
- नरेंद्र पेंडसे