मुंबई : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित बहुचर्चित 'झोंबीवली' हा चित्रपट गेली काही महिने कोरोनामुळे प्रदर्शनाची वाट बघत होता. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून पुढच्या वर्षी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. आदित्य सरपोतदारने आज ही तारीख इन्स्टाग्राम लाईवद्वारे जाहीर केली. मराठीमध्ये पहिल्यांदाच 'झोंबी जॉनर' चा चित्रपट येणार असल्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा होती.
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर यामध्ये अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी असणार आहे. तसेच, सारेगामा पिक्चर्स, यूडली फिल्म यांनी या चित्रपटाची निर्मित केली आहे. तर, विक्रम मेहरा आणि सिद्धार्थ आनंद कुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अनेकजण या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर ४ फेब्रुवारीपासून हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहात पाहता येणार आहे.