मुंबईला अंमली पदार्थांचा विळखा; तीन वर्षात ३,४४ किलो ड्रग्ज जप्त

    12-Nov-2021
Total Views |
drug_1  H x W:



मुंबई - मुंबई पोलिसांनी गेल्या ३ वर्षात ३,४१४ किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. यापैकी २०२१ मध्येच २५९३ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती दिली आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ८३.१३ कोटी रुपये आहे. मुंबई पोलिसांनी २०१९ मध्ये २५.२८ कोटी रुपये आणि २०२० मध्ये २२.२३ कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. या अर्थाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट अधिक ड्रग्ज पकडण्यात आले आहेत.



जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, एमडी, कोकेन, एमडीएमए, कोडीन, अफू, एलएसडी मिरी, अल्प्राझोम आणि नेट्राव्हेट गोळ्यांचा समावेश आहे. आरटीआयनुसार गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत यंदा ७ पट अधिक कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी २०८ अमली पदार्थ विरोधी गुन्हे दाखल केले असून २९८ आरोपींना अटक केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडून गेल्या तीन वर्षांत जप्त करण्यात आलेली औषधे जप्त आणि नष्ट करण्याबाबत माहिती मागवली होती. २०१९ आणि २०२० या वर्षाची माहिती मुंबई पोलिसांनी त्यांना दिलेली नाही. तर २०२१ मध्ये २४८ किलो ड्रग्ज नष्ट करण्याचे सांगण्यात आले आहे. अनिल गलगली म्हणाले की, मुंबई पोलिसांमधील काही लोक जप्त केलेले ड्रग्ज इतरांना विकत असल्याचा संशय आल्याने त्यांनी हा आरटीआय दाखल केला होता.



अनिल म्हणाले, "प्रत्‍येक कारवाईनंतर जप्‍त करण्‍यात आलेल्‍या ड्रग्‍सचा तपशील सार्वजनिक करण्‍याची आवश्‍यकता आहे. जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांनाही ड्रग्‍सविरुद्ध सुरू असलेल्‍या युद्धात हातभार लावता येईल." मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने गलगली यांना २०१९, २०२० आणि २०२१ या वर्षात केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे.



२०२१  मध्ये सर्वाधिक गुन्हे आणि अटक
२०१९  आणि २०२० या वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये अंमली पदार्थ विरोधी सेलने सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद केली आणि सर्वाधिक अटक केली. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण 94 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यात १३७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सन २०१९ मध्ये ७० गुन्ह्यांमध्ये १०३ आरोपींना अटक करण्यात आली होती, तर २०२० मध्ये ४४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ५८ होती.




पोलीस ठाण्याची जबाबदारी निश्चित करावी
अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक पातळीवर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असेल, तर पोलिस ठाण्याची जबाबदारी निश्चित व्हायला हवी. कारण अमली पदार्थ विरोधी सेलला माहिती मिळाल्यावर कारवाई करण्यास वेळ लागतो तर कधी आरोपी फरार होतो. त्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि कठोर कारवाई अपेक्षित आहे.