फणस 'किंग'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2021   
Total Views |

mithilesh_1  H
 
 
फणसासारख्या दुर्लक्षित फळाला बाजारपेठ मिळवून त्याचे लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या मिथिलेश हरिश्चंद्र देसाई याच्याविषयी...
 
 
"मातीमध्ये हात घालण्याची आपली तयारी असेल, तर १०० टक्के आपल्याला पैसे मिळतात,” असे हा तरुण शेतकरी सांगतो. वडिलांच्या मदतीने कृषिक्षेत्राला वेगळे वळण देणारा हा मुलगा. महाराष्ट्रात फणस लागवड क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा एक नवउद्यमी. उच्चशिक्षित असूनही कृषिक्षेत्रात 'करिअर' करून त्यामध्ये यश मिळवून राष्ट्रातील तरुणांसमोर आदर्श निर्माण करणारा हा तरुण शेतकरी म्हणजे मिथिलेश देसाई.
 
 
मिथिलेशचा जन्म दि. ४ फेब्रुवारी, १९९३ साली रत्नागिरीत झाला. लांज्यामध्ये त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. दहावीत ९१ टक्के मिळाल्याने उच्च शिक्षणाकडे त्याचा कल होता. म्हणूनच 'आयआयटीएच'च्या शिकवणीला जाण्यास सुरुवात केली. सोबतच राहुरी विद्यापीठामधून 'बी.टेक अ‍ॅग्रीक्लचर इंजिनिअरिंग'चे शिक्षण सुरू ठेवले. राहुरी विद्यापीठानेच मिथिलेशच्या आयुष्याला नवे वळण दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने राहुरी विद्यापीठाची ओळख असल्याने पुढे जाऊन याच क्षेत्रामध्ये 'करिअर' करण्याचा मिथिलेशचा ओढा होता. त्यानुसार अंतिम वर्षानंतर त्याने 'केंद्रीय लोकसेवा आयोगा'च्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली गाठले. दीड वर्ष परीक्षेचा अभ्यास केला. मात्र, परीक्षेमध्ये अपयश मिळाले. दिल्लीमध्ये होणारा खर्च पाहता त्याने पुण्यात येऊन परीक्षेची पुन्हा तयार केली.
 
 
दरम्यानच्या काळात मिथिलेश दिवाळीच्या वेळी घरी कोकणात आला असताना, वडील हरिश्चंद्र देसाईंशी त्याने आपल्या भविष्याबाबत चर्चा केली. या चर्चेअंती मिथिलेशने नोकरी करायची नाही, असा निर्णय झाला. वडिलांनी भविष्याचा विचार करुन खरेदी केलेल्या शेतजमिनीवर शेती करण्याचा निर्णय झाला. मात्र, या जमिनीवर नेमके करायचे काय, असा प्रश्न पडला. त्याकाळी सौरऊर्जा निर्मितीचे क्षेत्र नवीन असल्याने या जागेवर सौरऊर्जेचा 'प्लांट' तयार करण्याचा निर्णय झाला. त्याअनुषंगाने मिथिलेशने प्रशिक्षण घेतले. मात्र, त्याला अपयश मिळाले. त्यानंतर 'स्टोन क्रशर'चे काम करण्यासाठी दोन लाखांचे यंत्र घेतले. मात्र, त्यातही यश मिळाले नाही. दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलांनी काजूची लागवड करायला सुरूवात केलीच होती. मात्र, २०१५ साली त्यांना फणस लागवडीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याची लागवड करायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने इथून 'फणस किंग'चा प्रवास सुरू झाला.
 
 
सुरुवातीच्या काळात ४०० फणसांच्या झाडांची लागवड केली. त्यावेळी इतर शेतकऱ्यांनी मिथिलेश आणि त्याच्या वडिलांची चेष्टा केली. वडिलांनी घेतलेल्या फणस लागवडीच्या निर्णयामध्ये मिथिलेश सहभागी झाला आणि एकत्रितपणे कामाला सुुरुवात झाली. मिथिलेशचा जनसंपर्क आणि संवादकौशल्य उत्तम असल्यामुळे लोकांना समजून सांगण्यामध्ये त्याचा हातखंडा होता. २०१७ साली वायनाडला झालेल्या जगातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय 'फणस महोत्सवा'ला मिथिलेशने वडिलांसोबत भेट दिली. या महोत्सवामुळे भविष्यात फणसाला मिळणाऱ्या किमतीचा त्यांना अंदाज आला. त्यामुळे लागलीच महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी फणसाच्या वेगवेगळ्या जाती गोळा करण्यास सुरुवात केली. जागतिक पातळीवर फणसाला मागणी असल्याची माहिती मिळाल्यावर मिथिलेशने फणसाचा आर्थिक बाजूने विचार करण्यास सुरुवात केली. जागतिक फणसाच्या प्रजातींची माहिती जाणून घेतली. व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर, ब्राझील, युके, अमेरिकेमधील फणसाच्या प्रजातींची लागवड करण्यास सुरुवात केली.
 
 
त्यासाठी जमिनीची साफसफाई करुन फणसाच्या वेगवेगळ्या प्रजातीची लागवड करण्यास सुरुवात केली. त्याला 'फणस बाग' असे नाव दिले. लोकही या फणस बागेत लागवड पाहण्यासाठी येऊ लागले. 'फणस बागे'ला प्रसिद्धी मिळाली. पूर्वी फणसाची लागवड केली म्हणून सुरुवातीला नाक मुरडणारी लोकं आता मिथिलेश आणि त्याच्या वडिलांकडे फणसाच्या वेगवेगळ्या प्रजातीची रोपं मागू लागली. त्यामुळे रोपवाटिका तयार करण्यासाठी त्यांनी परवाना घेतला. रोपवाटिकेसाठी खर्च केला. पहिल्याच वर्षी तीन हजार रोप विकायचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या महिन्यातच ही तीन हजार रोप विकली गेली. यामुळे मिथिलेशला नवउद्योग म्हणजे काय, याची समज आली. याच काळात केरळने फणसाला राज्य फळ म्हणून घोषित केले. त्यानंतर केरळ, तामिळनाडू, मेघालय येथे 'जॅक फ्रूट मिशन' सुरू झाले. यामध्ये मिथिलेशने सक्रिय सहभाग घेतला.
 
 
या सर्व कामांबरोबर फणसाची लागवड वाढवली. मिथिलेश आणि त्याच्या वडिलांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रसिद्धी मिळत गेली. त्यामुळे उद्योगही वाढत गेला. जगात फणसांच्या १२८ प्रजाती सापडतात. त्यापैकी मिथिलेशच्या लांजा येथील फणस रोपवाटिकेमध्ये ७६ प्रजातींची रोप मिळतात. भविष्यात त्याला हा टप्पा १०० प्रजातींपर्यंत पोहोचवायचा आहे. तसेच सद्यपरिस्थितीत त्याने १८० एकरावर फणसांची लागवड केली आहे. ही लागवड त्याला ३०० एकरपर्यंत वाढवायची आहे. महाराष्ट्रातील एकमेव फणसाची रोपवाटिका सुरू केलेली असताना मिथिलेश येत्या काळात 'फणस संशोधन केंद्र' सुरू करण्याच्या तयारीत आहे. सोबतच फणसासंबंधी 'फूड प्रोसेसिंग युनिट' सुरू करण्यासाठी तो काम करत आहेत. तसेच त्याला फणसाचे जंगल तयार करुन त्याठिकाणी पर्यटनही सुरू करायचे आहे. फणसाचे लौकिक जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी मिथिलेशने केलेल्या प्रयत्नांना सलाम आणि पुढील वाटचालीकरिता त्याला शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@