‘कीर्तिमती कीर्ती’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2021   
Total Views |

Kirti_1  H x W:
 
 
‘सड्.गीत साहित्यकलाश्च क्रीडा नाट्यप्रयोगाश्च तन्वन्ति कीर्तिम्।’ अर्थात संगीत, साहित्य, कला, क्रीडा आणि नाट्य या गोष्टी माणसाची कीर्ती सर्वत्र वाढवतात. अशा कीर्तिमती प्रा. डॉ. कीर्ती आगाशे यांच्याविषयी...
राष्ट्रनिर्माणात शिक्षकांची भूमिका नेहमीच मोलाची ठरली आहे. परंतु, अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची प्राप्ती करून देणे हे गुरूचे परमकर्तव्य होय. गेली तीन दशके भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पण वृत्तीने आणि सर्जनशीलपणे शैक्षणिक क्षेत्रासह लेखन, संगीत, निवेदक आदी कलाक्षेत्रातील नवनवीन सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या ठाण्यातील प्रा. डॉ. कीर्ती सतीश आगाशे या यासम याच! सध्या त्या ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये ‘इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक’ विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
 
कृष्णाकाठी वसलेल्या सांगली जिल्ह्यात कीर्ती आगाशे यांचा जन्म झाला. संगीताचा वारसा लाभलेले माहेरचे पाटणकर कुटुंब आणि नातेवाईक बोडस कुटुंब यांचे संगीत आणि कलाक्षेत्रात मोठं योगदान! ज्येष्ठ गायिका आशाताई खाडिलकर आणि भजनभूषण नलिनीताई जोशी या त्यांच्या आत्या. त्यामुळे संगीत व कलेचं बाळकडू बालपणी घरातच मिळाल्याचे त्या सांगतात.लहानपणापासूनच संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घरातील कलाकारांकडून मिळाले. पुढील संगीताचे धडे पंडित चिंतुबुवा म्हैसकर, मंगलाताई जोशी, पंडित देविदास टीके, राजेंद्र मणेरीकर यांच्याकडे गिरवले. पण, वडिलांच्या नोकरीमुळे काही काळ सांगली सोडून पुणे, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी जावे लागले. लहानपणापासूनच शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचे ठरले होते. शिक्षणाबरोबरच संगीताची आणि कलाक्षेत्राची आवड असल्याने ‘मास्टर ऑफ इंजिनिअरिंग’ होताच त्यांनी ‘संगीत विशारद’ ही पदवीदेखील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून प्राप्त केली. अभियांत्रिकी शिक्षण घेताना संगीत स्पर्धा, प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभाग अशी धडपड करणारे अनेक मित्र-मैत्रिणी त्यांना लाभले. याच मित्रमंडळीत अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या हरहुन्नरी आणि कलेची आवड असणाऱ्या सतीश आगाशे यांच्याशी त्यांचे सूर जुळले अन् लग्नाच्या बेडीत अडकल्याने १९९० साली त्या ठाणे या सांस्कृतिक नगरीत आल्या. सासरे रा. वा. आगाशे (भाऊ) म्हणजे ठाणे जनता सहकारी बँकेच्या संस्थापक मंडळातील एक आदरणीय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व! बँक, भारतीय जनता पक्ष, संघ परिवार, अनेक कलाकार स्नेही यांचा अखंड राबता घरी असायचा. कै. रामभाऊ म्हाळगी आणि आ. रामभाऊ कापसे या मंडळींसोबत जेवणाच्या टेबलावरच गप्पांचे फड जमायचे. सामाजिक बांधिलकी, शिस्त, काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन हे संस्कारांचे विचारधन आगाशे कुटुंबीयांनी आणि ठाणे शहरानेच दिल्याचा कृतज्ञपणा त्या आजही व्यक्त करतात. सहकाऱ्यांबरोबर संगीत कार्यक्रम, संहिता लेखनापासून, संगीत आणि नाट्यसृष्टीतील प्रथितयश कलाकारांबरोबर सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यातून संघटन कौशल्य आपोआप विकसित झाल्याचे त्या मानतात.
 
 
अनेक शास्त्रीय आणि सुगम संगीत स्पर्धेत त्यांनी बक्षिसे मिळवली आहेत. संगीत साधनेसाठी पं. विनायकबुवा काळे आणि त्यांच्या शिष्य विदुलाताई भागवत हे गुरू लाभल्यामुळे अनेक संगीतप्रेमी आणि जाणकारांशी मैत्री झाल्याचे त्या सांगतात.‘नांदी गुणगान’, ‘ओडव रंग’, ‘व्हायोलिन द स्ट्रिंग मेलडी’, ‘मल्हार रंग’ अशा वेगळ्या विषयांवरील संगीत कार्यक्रमांचे संहिता लेखन, सूत्रसंचालन आणि गायन त्यांनी केले. संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार यांच्यासमवेत त्यांनी कारागृहातील कैद्यांसाठी राष्ट्रभक्ती गीतांचे कार्यक्रम ‘संस्कार भारती’ संस्थेतर्फे सादर केले आहेत. संगीत जाणकार आणि कलाकारांच्या मुलाखती ही त्यांची खासियत. पं. हृदयनाथ मंगेशकर, पद्मजा फेणाणी, श्रीधर फडके, अच्युत गोडबोले यांसारख्या मुलाखती चिरकाल स्मरणात राहतात. याबरोबरच ‘संस्कार भारती’ने त्यांची ठाणे समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. ‘इंद्रधनू’, ‘रामभाऊ म्हाळगी’, ‘अल्मेडा लायब्ररी’ या संस्थांमधून त्या कार्यरत आहेत. ‘रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला समिती’मध्ये गेली अनेक वर्षे त्या काम करत असून ‘कोविड’काळात पार पडलेल्या म्हाळगी व्याख्यानमालेत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या संकल्पनेतून उद्योजक कोल्हटकर यांना बोलतं करून त्यांनी ‘अथ ते इती’पर्यंत उद्यमशिलतेचे पैलू अगदी सहजगत्या उलगडले होते. वृत्तपत्र, मासिक यांतील लेखनप्रवास सुरू असताना ‘साऊंड ऑफ म्युझिक’ ही लेखमाला तब्बल दोन वर्षे (१०० लेख) चालली.
 
 
केवळ कलाक्षेत्रच नाही तर उद्योग आणि शिक्षण यांची सांगड घालण्यासाठी प्रा. डॉ. कीर्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय संशोधनात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा. डॉ. कीर्ती आगाशे यांना पीएचडीसाठी आयआयटी मुंबईच्या नॅनो टॅक्नोलॉजी लॅबमध्ये काम करण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली आहे. तसेच भाजपच्या ‘इंडस्ट्री सेल’मधील २५ प्रतिनिधींमध्येही त्यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर ‘उद्योग अनुभव प्रतिष्ठान’ संस्थेत कार्यकारी मंडळात मागील वर्षीपासून त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या या चतुरस्र प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
@@AUTHORINFO_V1@@