विराटच्या मुलीला धमकी देणारा नराधम अटकेत

धमकी देणारा आरोपी रामनागेश अलीबथिनी सॉफ्टवेअर इंजिनीअर

    10-Nov-2021
Total Views |

Virat kohli_1  
मुंबई : काही दिवसांपूर्वी एकाने मोहम्मद शमीचे समर्थन केले म्हणून विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी सोशल मिडियावरून देण्यात आली होती. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने धमकी देणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय आरोपी रामनागेश अलीबथिनी याला पोलिसांनी हैद्राबादमधून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, हा आरोपी सुशिक्षित असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याने आयआयटी हैदराबादमधून शिक्षण घेतले असून तो फूड डिलिव्हरी अ‍ॅपसाठी काम करतो. असे लज्जास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीला मुंबईत घेऊन येण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.
 
 
काय आहे प्रकरण?
 
 
आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडून सामना गमवावा लागला. यानंतर खेळाडू टीकाकारांच्या निशाण्यावर आले. सोशल मीडियावर काही लोकांनी विरोधाची सीमा ओलांडली. या घटनेला धार्मिक रंग देत मोहम्मद शमीला टीकेचा धनी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या समर्थनात अनेकजण उभे राहिले होते. कर्णधार म्हणून विराट कोहलीनेदेखील त्त्याचे समर्थन केले होते. त्यानंतर विराटच्या मुलीला धमक्या देण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी कोहलीची मुलगी वामिकासाठी अपशब्द वापरले आणि बलात्काराची धमकी देण्याचे कृत्य त्याने केले.