नवी दिल्ली : आर्यन खानशी निगडीत ड्रग्ज प्रकरणात सोमवारी आणखी एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला. समीर वानखेडे आणि के.पी. गोसावी यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावण्यात आला. प्रभाकर साईलने केलेल्या दाव्यानुसार, एनसीबीनं त्याला तपासासाठी बोलावलंच नाही. प्रभाकर साईलचे वकील तुषार एन खंदारे यांनी सोमवारी एनसीबी ऑफिसर्सची भेट घेतली. एनसीबीच्या कार्यालयात जेव्हा बोलविले जाईल तेव्हा आम्ही पोहोचू, असेही ते म्हणाले.
प्रभाकर यांनी आपल्या वकीलाद्वारे पत्र पाठविली आहे. त्यात स्पष्ट म्हटले आहे की, एनसीबीच्या भ्रष्टाचार मुक्त विंगतर्फे त्यांना कुठल्याही प्रकारे समन्स पाठविण्यात आलेले नाही. त्यात ते म्हणाले, मला माध्यमांद्वारे समजले की, मला एनसीबीने समन्स पाठविण्यात आले आहे. मात्र, मी स्पष्ट करू इच्छीतो की मला कुठलेही समन्स बजाविण्यात आलेले नाही. मी हे स्पष्ट करू इच्छीतो की, मला कुठल्याही प्रकारे समन्स बजाविण्यात आलेले नाही. तसेच मला एनसीबीनं कुठल्याही प्रकारे संपर्क केलेला नाही. मला जर बोलविण्यात आले तर मी कार्यालयात जाण्यास तयार आहे."
प्रभाकर साईलचे आरोप काय?
आर्यन खानशी संबंधित क्रुझ ड्रग्स पार्टीत प्रभाकर साईल एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार आहे. त्याशिवाय त्याने दावा केला आहे की, छाप्या दरम्यान तोही उपस्थित होता. प्रभाकरच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडून पंचनामा म्हणून कोऱ्या कागदांवर सह्या करून घेतल्या होत्या. प्रभाकरने आरोप लावला आहे की, गोसावीने फोनवर २५ कोटींची मागणी केली आहे. त्यानंतर १८ कोटींना हा सौदा ठरला होता. त्यातील आठ कोटी वानखेडेंना द्यायचे होते, असेा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.
एनसीबी करतेय स्वतंत्र तपास
प्रभाकरच्या आरोपांनंतर आता एनसीबीच्या भ्रष्टाचार निर्मूलन विभागाने चार सदस्यांची टीम तयार करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वानखेडेंची तपास यंत्रणेपुढे सुनावणी झाली व त्यांनी आपली बाजूही मांडली. या दरम्यान, मुंबई पोलीसांना एनसीबीनं पत्र लिहून प्रभाकर साईलला एनसीबीपुढं हजर करण्याची विनंती केली आहे. त्यात एनसीबीने म्हटले आहे की, इतके होऊनही प्रभाकर साईल त्यांच्यापुढे हजर राहिला नाही.