समाजमाध्यमे आणि संकेतस्थळांवरून इस्लामिक दहशतवादाच्या विषपेरणीचा उघडकीस आलेला आणखीन एक प्रयोग चिंताजनक म्हणावा लागेल. यापूर्वी केवळ ‘सायबर हल्ले’ आणि मुस्लीम तरुणांची माथी भडकावून जिहादी विचारसरणीला ऑनलाईन खतपाणी घातले गेले. पण, आता ‘मुस्लीम ब्रदरहूड’ची मजल भारताची जागतिक पातळीवर आर्थिककोंडी करण्यापर्यंत गेली आहे, ज्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.
“सायबर जगतासंबंधीची जोखीम ही रक्तहीन युद्धाचा जागतिक धोका घेऊन आली आहे. जगाचा ‘सायबर युद्धा’पासून बचाव करण्यासाठी भारत जगाला एक सुरक्षा कवच प्रदान करू शकतो,” हे विचार आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. त्याअनुषंगाने गेल्या सात वर्षांत ‘डिजिटल भारता’ची सर्वव्यापी मोहीमही तितकीच गतिमान झाली. शिवाय, आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात भारताने ‘सायबर सुरक्षे’संबंधी वेळोवेळी आपली भूमिका जागतिक व्यासपीठांवरही विशेषत्वाने मांडली. परंतु, ‘इन्फॉर्मेशन वॉरफेअर’चा ‘सायबर’ धोका केवळ पाकिस्तान, चीनसारख्या शत्रूदेशांकडूनच नाही, तर इस्लामिक दहशतवाद्यांकडूनही दिवसागणिक वाढताना दिसतो.
प्रारंभी मुस्लीम युवकांची माथी भडकवण्यासाठी, ‘जिहाद’च्या प्रचार-प्रसारासाठी इंटरनेटचा अस्त्रासारखा वापर केल्याच्या शेकडो घटना समोर आल्या. केरळमध्ये मुस्लीम तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून घट्ट झालेला ‘इसिस’चा विळखा हे त्याचेच द्योतक! आता याच कडीतला धक्कादायक प्रकार म्हणजे भारताच्या जागतिक बदनामीचे षड्यंत्र. खरंतर मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच बर्याच आंतरराष्ट्रीय माध्यमांना, पत्रकारांना पोटशूळ उठला. त्यामुळे भारतात जरा कुठे काही खुट्ट झाले तरी सातासमुद्रापार त्याचे अतिरंजित तथ्यहीन चित्रण चवीने रंगवले गेले.
मग तो विषय अगदी ‘नोटाबंदी’चा असो वा उत्तर प्रदेशातील ‘कोविड’ मृत्यूंचा किंवा आताच्या लखीमपूर खिरी प्रकरणाचा. पण, एवढे सगळे कुभांड रचूनही भारतविरोधी शक्तींचे मनसुबे वेळोवेळी धुळीस मिळाले. म्हणूनच, आता भारताच्या जागतिक व्यापाराला नख लावण्याच्या हेतूने ‘मुस्लीम ब्रदरहूड’ने ट्विटरवर आपली टोळी सक्रिय केलेली दिसते. भारताविरोधी अप्रत्यक्ष व्यापारयुद्ध छेडून मोदी सरकारची आर्थिककोंडी करण्याचा हा प्रयत्न ‘डिस्इन्फोलॅब’च्या एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे.
‘डिस्इन्फोलॅब’ ही युरोपस्थित एक स्वतंत्र संस्था असून इंटरनेटवरील फेक न्यूज, प्रपोगंडा यांचा पर्दाफाश करण्यासाठी ती विशेषत्वाने ओळखली जाते. याच संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालात ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या भारतविरोधी ‘जिहादी’ अजेंड्याची पोलखोल करून भारत सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. ‘डिस्इन्फोलॅब’ने केलेल्या ‘ऑनलाईन’ सर्वेक्षणानुसार, इस्लामिक देशातील माध्यमसमूह, पत्रकारांकडून ‘बॉयकॉट इंडियन प्रोडक्ट्स’ या हॅशटॅगसह एक अप्रचाराची पद्धतशीर मोहीमच ट्विटरवर चालविली गेली. त्याचे निमित्त ठरले ते आसाममधील घुसखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर राज्य सरकारने केलेली तोडक कारवाई.
ते घुसखोर बांगलादेशी मुस्लीम असल्यामुळे लगोलग भारतात कसे मुसलमानांवर अन्याय-अत्याचार केले जातात वगैरे असत्य माहिती खोट्या द्वेषपूर्ण व्हिडिओ आणि छायाचित्रांसकट समाजमाध्यमांवर मुद्दाम पेरली गेली. फक्त पाकिस्तानच नाही तर तुर्की, इजिप्त, इराकमध्येही हाच हॅशटॅग इंग्रजी आणि अरबी भाषेत ‘ट्रेंडिंग’ झाला. ट्विटरवरील नामांकित व्यक्तींच्या आणि अन्य अशा खात्यांमधून लाखो भारतविरोधी ट्विट्स मुद्दाम लडीसारखी पेटवण्यात आली. ‘अल जझिरा’, तुर्कीची ‘टीआरटी वर्ल्ड’ ही सरकारी वाहिनी, इजिप्तमधील ‘रसद न्यूज नेटवर्क’ आणि ‘अरबी-२९’, युकेमधील ‘अल अरबी’, अरब-अमेरिकन वृत्तपत्र ‘वतन सर्ब’ अशा इस्लामिक देशातील माध्यमसमूहांनी हा हॅशटॅग डोक्यावर घेतला.
एवढेच नव्हे, तर ‘इंडियाकिलिंगमुस्लीम्स’ वगैरे इस्लामिक कट्टरतावादाला चेतवणारे हॅशटॅग्जही जोडून भारताच्या सर्वधर्मसमावेशक प्रतिमेला धक्का देण्याचेच काम या माध्यमांनी आणि पत्रकारांनी नियोजनबद्धरीत्या केले. आता हे माध्यमसमूह आणि पत्रकारांचा तर पत्रकारिता आणि नैतिकतेशी तसा दूरान्वयेही संबंध नाहीच. त्यातच या पत्रकारांच्या आणि माध्यमसमूहांचे दहशतवादी संघटनांशी असलेले साटेलोटेही अगदी जगजाहीर! म्हणजे कतारस्थित ‘अल जझिरा’च्या भारतद्वेष्ट्या भूमिका तर लपून राहिलेल्या नाहीतच. पण, या ‘अल जझिरा’चा इस्लामाबादेतील ब्यूरो चीफ अहमद जैदान हा तर ‘अल कायदा’चा सदस्यच. त्याचे नावही अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या यादीत फार पूर्वीच झळकलेले.
आता जिथे दहशतवादीच माध्यमांमध्ये पत्रकार म्हणून असे बिनबोभाटपणे वावरत असतील, तिथे सत्यकथनाची अपेक्षा ती करायची तरी कुणाकडून? म्हणूूनच अशा जिहादी मानसिकतेला थारा देणार्या ‘अल जझिरा’चे कार्यालय असलेली पॅलेस्टाईनमधील इमारतच जेव्हा इस्रायलने जमीनदोस्त केली, तेव्हा ‘जिहाद’च्या बुरख्याआड ‘माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला’ म्हणत याच मंडळींनी कांगावा केला. पण, माध्यमाच्या चौथ्या स्तंभाखाली असे ‘जिहादी’ सुरुंग पेरलेले असतील, तर त्याचा कधी ना कधी विस्फोट झाल्याशिवाय राहत नाहीच. त्यामुळे इस्लामी जगतातील माध्यमे आणि माध्यमवीरांच्या या हिंदूविरोधी प्रपोगंडाला भारतानेही त्याच स्वरूपात चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. कारण, अशा ‘ऑनलाईन’ अपप्रचारामुळे भारताच्या आखाती देशांसोबतच्या व्यापारी आणि राजनैतिक संबंधांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतातही जेव्हा अशाच प्रकारे चीनच्या अरेरावीविरुद्ध चिनी उत्पादनांवर बहिष्काराची ‘ऑनलाईन’ मोहीम राबविण्यात आली होती, तेव्हा त्याला भारतीयांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि चिनी मालाची मागणी घटल्यामुळे त्याचे परिणामही दिसून आले. भारताने तसे पाऊल उचलण्यामागे चिनी दादागिरीला तडाखा देण्याचाच उद्देश होता. पण, या जिहादी मानसिकतेच्या माध्यमांच्या अपप्रचारामुळे आखाती देशांमधील नागरिकांनी भारतीय उत्पादने, सेवा यांच्यावर असेच बहिष्कारास्त्र उगारलेच तर व्यापारीदृष्ट्या भारतालाही ते मुळीच परवडणारे नाही, हे देखील आपण ध्यानात घ्यायला हवे. कारण, केवळ आखाती देशांबरोबर चालू वर्षात भारताची निर्यात ही जवळपास ४०.५ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. म्हणूनच केंद्र सरकारने या देशविरोधी षड्यंत्रातून वेळीच बोध घेऊन सावधगिरीच्या उपाययोजनांचा अवलंब करणे, हे क्रमप्राप्त ठरावे.
आज इस्लामिक कट्टरतावादाचे असेच चटके अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांनाही सोसावे लागत आहेत. पाकिस्तानबरोबर आता अफगाणिस्तानातील तालिबानी प्रवृत्तींनी डोके वर काढल्याने समस्त जग चिंताग्रस्त आहे. जगभरातील पुरोगामी, भारतातील तथाकथित बुद्धिजीवींना मात्र त्याची ना खंत, ना खेद. तालिबान्यांचे महिलांवरील अनन्वित अत्याचार असोत वा दहशतवाद्यांनी केलेला रक्तपात, याविषयी या पुरोगाम्यांच्या तोंडातून ‘ब्र’ही निघत नाही. मात्र, हाथरस असो अथवा लखीमपूर प्रकरण, ही पुरोगामी मंडळी लगोलग आपल्या बिळातून बाहेर पडून निषेधाचे ढोल मोठ्यांदा बडवतात.
पण, लखीमपूरसारख्या घटनांमागील पूर्ण सत्य लक्षात न घेता, अर्धसत्याच्या जोरावरच ही माध्यमे, सिव्हिल सोसायटी आणि राजकीय पक्षांत उजळ माथ्याने वावरणारे पुरोगामी रान पेटवण्यातच एकाएकी धन्यता मानतात. त्यामुळे एरवी संविधानाच्या, सेक्युलॅरिझमच्या वैचारिक गप्पा ठोकायच्या अन् दुसरीकडे इस्लामिक धर्मवेडेपणा, ‘जिहाद’ याविषयी मात्र मूग गिळून बसायचे, हे कुणीकडचे पुरोगामित्व? त्यामुळे देशी-विदेशी माध्यमांमधील पत्रकारांच्या टोळ्यांनाही असेच जिहादी मानसिकतेने पछाडले असून, डोळ्यांवर हिरव्या पट्ट्या लावून ही मंडळी ‘चला जग जिंकूया’च्या वल्गना करताना दिसतात.
तेव्हा, काळाची पावले ओळखून अशा देशी-विदेशी अपप्रचाराला केंद्र सरकारनेही तितक्याच ताकदीने मुळापासून उखडून टाकणे, आज अत्यंत गरजेचे आहे. तसेच ट्विटरसारख्या समाजमाध्यमावरही असा जिहादी अजेंडा पसरवल्याबद्दल सक्त कारवाई करायला हवीच. त्याचबरोबर सामान्य भारतीयांनीही समाजमाध्यमांवर अशा प्रपोगंडाला बळी न पडता, अशा अभियानांविरोधात ‘हम सब एक हैं।’ या वृत्तीचे दर्शन घडवून ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ हे कृतिशीलतेतून दाखवून द्यावे.