अमेरिकेत हा ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ अर्थात ‘हिंदू वारसा मास’ म्हणून साजरा केला जात असल्याचे आपण जाणतोच. अमेरिकेतील दहा राज्यांत हा ‘हिंदू वारसा मास’ साजरा केला जातो आहे. खरं तर जगात जिथे-जिथे हिंदू माणूस आपला हिंदू धर्म घेऊन पोहोचला, त्या प्रत्येक देशात अशा प्रकारचा ‘हिंदू हेरिटेज मंथ’ किंवा समारोह होणं गरजेचं आहे. अगदी भारतातसुद्धा; पण यानिमित्ताने ‘हिंदू वारसा’ म्हणजे नेमके काय, असा प्रश्न याच देशात अनेकांना पडला आहे. आमच्या समाजाला आत्मग्लानीने इतके घेरले आहे की, आपला वारसा काय आहे, कोणता वारसा आम्ही अभिमानाने जपायला हवा, या विषयीदेखील संभ्रम निर्माण झाला आहे.मुळात वारसा म्हणजे काय, हा प्रश्न अनेकांना पडतो. आमच्या हिंदू धर्मात जीवनभर ज्यांचे पालन करावे अशी अनेक तत्त्वे सांगितली आहेत. पातंजल योग सूत्र यम, नियम आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे आठ भाग सांगते. पातंजल योग सूत्र हा आमचा वारसा आहे आणि या आठ भागांचे आपल्या जीवनात पालन करण्याचा सजगपणे, अव्याहतपणे प्रयत्न करणं म्हणजे आपला हिंदू वारसा जपणं होय. अर्थात, हे सगळं आपल्या जीवनात पालन करणे अतिशय कठीण काम आहे. सामान्य माणूस याचा विचारही करू शकत नाही. पण, आपण त्या दिशेने प्रयत्न करीत राहणे सहज शक्य आहे. योगविद्या हा हिंदू वारसा आहे.शास्त्रीय संगीत हादेखील हिंदू वारसा आहे. हा वारसा जपायचा तर हिंदुस्थानी संगीत मनोभावे ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. या देशात आजही अनेक ठिकाणी शास्त्रीय संगीत महोत्सव होतात. पण, दुर्दैवाने या देशातील तरुण पिढी पाश्चात्त्य संगीताचे गोडवे गाते आहे, पाश्चात्त्य संगीताच्या पार आहारी जात आहे.संस्कृत भाषा हा आम्हाला मिळालेला वारसा आहे. संस्कृत भाषा सर्वाधिक वैज्ञानिक भाषा असल्याचे दाखले पाश्चात्त्य भाषाशास्त्रज्ञदेखील देतात. परंतु, येथील तरुण पिढीला संस्कृत अभ्यासावी वाटत नाही. आमची विद्यापीठं स्वातंत्र्योत्तर काळात या भाषेच्या संवर्धनासाठी विशेष काही करताना दिसत नाहीत. सरकारचा दृष्टिकोनही चुकीचा असल्याने आमच्या शालेय अभ्यासक्रमात संस्कृत भाषा वैकल्पिक असते, अनिवार्य नसते. सर्व दृष्टीने अत्यंत संपन्न असलेली ही भाषा त्यामुळेच आमच्या देशांतच अभ्यासली जात नाही. अलीकडच्या काळात संस्कृत भाषा संवर्धनासाठी काही प्रयत्न शासनाद्वारे केले जात आहेत, समाजाद्वारे नाही, हे दुर्दैव होय.
हिंदू स्थापत्यशास्त्र हा आम्हाला मिळालेला वारसा होय. हिंदू स्थापितींनी उभारलेली अनेक मंदिरे आजही हिंदू स्थापत्य शास्त्राच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची साक्ष देत दिमाखात उभी आहेत. पण, आज भारतीय स्थापिती मात्र त्याचा अभ्यास करताना दिसत नाहीत.आमची शिल्पकला हा आम्हाला मिळालेला वारसा आहे. अनेक सुरेख अशा मूर्तींची आजही भारतातून तस्करी होते आहे हे खरे दुर्दैव होय. ही शिल्पकला, मूर्तिकला आमच्याच देशात आज जपली जाताना दिसत नाही.क्रीडा क्षेत्रात अनेक हिंदू वा भारतीय खेळ एक तर मागे पडले आहेत किंवा लुप्त होत आहेत. ‘आट्यापाट्या’ हा खेळ आज भारतात खेळला जात नाही, हे इथे खेदाने नमूद करावे लागेल. ‘गडगा फळी’ किंवा ‘वेत्रचर्म’ या खेळाविषयी आज फक्त पुस्तकातून ओळख करून घ्यावी लागते. ‘खो-खो’ हा जरी अजून काही प्रमाणात तग धरून असला, तरी फार कमी तरुण हा खेळ खेळतात आणि फारच कमी प्रेक्षक हा खेळ बघायला जातात. अस्सल भारतीय खेळ हा आमचा वारसा आहे हेही समाजाच्या आज ध्यानी येत नाही. कारण, आमचा समाजच क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनीस यासारख्या परकीय खेळांच्या जलजलाटात हरवून गेला आहे.मल्लखांब, सूर्यनमस्कार यासारखे भारतीय व्यायामाचे प्रकारदेखील या देशातच मागे पडताना दिसत आहेत. सूर्यनमस्कार तर सर्वांग सुंदर व्यायाम आहे. या व्यायामाच्या आणि योगासनांच्या साहाय्याने अनेक लोक घरातच राहून ‘कोविड’च्या काळातदेखील स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकले, हे एक उघड गुपित आहे. पण, ज्यांना जिममध्ये जाऊनच व्यायाम करता येतो, त्यांना हे समजणे जरा कठीणच असते, तर वारसा म्हणून अभिमानाने मिरवणे दूरच राहिले. असा अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत प्रगत आणि प्रगल्भ असा हिंदू वारसा आपल्याला मिळाला आहे. सगळ्या क्षेत्रांची नावं घेणही इथे शक्य नाही.
आज कधी नव्हे इतकी श्रीकृष्ण, चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याची गरज निर्माण झाली आहे.
भगवान कृष्णाचा वारसा चालवणे म्हणजे भविष्यातील घटनांचा अचूक अंदाज बांधणे, त्या घटनांसाठी योग्य ते नियोजन करणे, केलेले नियोजन सुव्यवस्थितपणे अमलात आणणे, वर्तमानात जगताना विहित कर्तव्य पार पाडणे आणि आपण केलेल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वीकारून परिणामांना सामोरे जाणे होय. जीवनातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करीत राहणे होय. कृष्णाची प्रत्येक कृती ही जीवनाचा महोत्सव करणारी आहे. साम, दाम, दंड आणि भेद हे वापरण्याचा वस्तुपाठच श्रीकृष्ण आपल्या चरित्रातून देत असतात. सामोपचाराने, स्थलांतर करून, लढाई करूनही जरासंध ऐकत नाही, हे पाहिल्यावर प्रत्यक्ष द्वंद्व युद्धाच्या वेळी भेद करून भगवंताने जरासंधास भीमाच्या हाते मारवला. पण, म्हणून जरासंधाचे राज्य ताब्यात घेतले नाही, तर जरासंधाच्याच मोठ्या मुलाचा राज्याभिषेक केला. श्रीकृष्णाचे चातुर्य, प्रसंगावधान, नेतृत्व गुण, शौर्य, आपला मुद्दा पटवून देण्याची हातोटी, बांधिलकी असे अनेक गुण प्रथम समजून घेऊन आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे श्रीकृष्णाचा वारसा चालवणे होय.चाणक्याची ज्ञानलालसा, तर्कशुद्ध विचार करून सगळ्यांना एकत्र आणण्याचे संघटन कौशल्य, वैराग्य आणि परखडपणा, राज्यशकट चालण्यासाठी ज्ञानाधिष्ठित राजकारण, मुत्सद्दीपणा, तसेच राज्यहितासाठी कूटनीती हे गुण समजून घेतले पाहिजेत. एखादा माणूस घडवणे हे अत्यंत अवघड काम असते, तर सुयोग्य आणि सक्षम राजा घडवणे, त्याहूनही कठीण. चाणक्याने चंद्रगुप्तासारखा सम्राट घडवला. केवळ एवढेच नव्हे, तर परकीय आक्रमणापासून या देशाचं संरक्षण करणारी अनेक जनपदांची एकसंध अशी फळी चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली उभी केली. हा वारसा समजला पाहिजे. आपसातील मतभेद, सत्ता स्पर्धा, राजकारण, हेवेदावे विसरून परकीयांसमोर एक होऊन उभे ठाकले पाहिजे. पी. व्ही. नरसिंहराव यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठवले होते आणि अटलजींनीदेखील ते राष्ट्रकारण यशस्वी करून दाखवले होते, हे येथे नमूद करावेसे वाटते. याला वारसा म्हणून जपणं आवश्यक आहे. दुर्दैवाने आज विरोधी पक्ष हे करताना दिसत नाहीत.
भारतीय समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा समजून घेऊन जपला पाहिजे. छत्रपतींचा मुत्सद्दीपणा, नेतृत्व, चातुर्य, धडाडी, धैर्य, शौर्य, स्त्रीदाक्षिण्य, संघटन कौशल्य, योग्य त्यावेळी प्रहार करण्यासाठीचा संयम, नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याची हातोटी, संकटात न डगमगता विचारपूर्वक मार्ग काढणं हा सगळा वारसा आहे. छत्रपतींचे फक्त नाव घ्यायचे आणि कोणताही उद्यमशील, सर्जनशील विचार न करता हातपाय गाळून दुसरा कोणीतरी येऊन आपला उद्धार करील, मदत करेल, या आशेवर बसून राहणं, म्हणजे वारसा चालवणे नव्हे. फक्त मिशीवर हात फिरवत सतत बाह्या मागे सरसावत राहणं, म्हणजेही छत्रपतींचा वारसा चालवणे नाही. मुत्सद्दीपणे जीवनात यश मिळवणं आणि जीवन जनतेसाठी समर्पित असणं म्हणजे छत्रपतींचा वारसा होय. हिंदू वारसा हा जीवन जगण्याची कला सांगणारा, जीवनाची इतिकर्तव्यता सांगणारा, जीवनाचं सार्थक करणारा वारसा आहे तो समजून घेणे, त्याचं संवर्धन करणे प्रत्येक हिंदू व्यक्तीचे (हिंदू म्हणजे, जो हा देश आपला मानतो, अशी प्रत्येक व्यक्ती) कर्तव्य आहे.आजचं आमच्या समाजाचं चित्र मात्र विपरीत आहे. ‘फिल्ड मार्शल’ मॉन्टगोमेरी सारखा अभ्यासू सेनापती आपल्या पुस्तकात थोरले बाजीरावाचं वर्णन एक जागतिक पातळीवरील निष्णात सेनापती म्हणून करतो आणि आम्ही मात्र बाजीरावाच्या ओजस्वी रणकौशल्याकडे, कल्पक सेनापतीत्वाकडे पाठ फिरवून, कुण्या फडतूस कादंबरीकाराने रंगवलेली बाजीराव मस्तानीची प्रणयकथा चिवडत बसणारे असू, तर वारसा समजून घेणं, त्याचं संवर्धन करणं, या गोष्टींनाच काय, पण या लेखाचंही प्रयोजन उरत नाही हे आवर्जून सांगावेसे वाटते.
- डॉ. विवेक राजे